दैवलेख (भाग 14)

 #दैवलेख (भाग 14)

देवांगने वैदेहीचा साखरपुडा मोडला, तत्क्षणी तो तिच्याशी साखरपुडा करायला तयार झाला. आजूबाजूला असलेली माणसं सगळं बघत होती, कुजबुजत होती. वैदेहीच्या आईने डोळे पुसले..तिने देवांगचा हात धरून वैदेहीसमोर आणलं आणि म्हणाली,

“तुझं मत बदलायच्या आत घाल तिला अंगठी..”

देवांगने क्षणाचाही विचार न करता तिला अंगठी घातली. गुरुजींनी इतर विधी पूर्ण केले आणि वैदेही व देवांगचा साखरपुडा पार पडला. वैदेही आतून सुखावली होती, देवांगशी साखरपुडा झाला म्हणून नाही..तर रजतपासून सुटका झाली म्हणून. 

देवांगचे आई वडील बघतच राहिले, हे सगळं अगदी अनपेक्षित होतं..

****

देवांग आणि आई वडील घरी आले. तिघेही एकमेकांशी काहीही बोलत नव्हते, काय बोलावं कुणालाच काही कळेना. आजीला ही गोष्ट आईने जाऊन सांगितली. आजीला अतिशय आनंद झाला..

“शेवटी दैवलेख गं.. नवरा बायकोच ना ते. अशी कशी एकमेकांची साथ सोडतील?”

देवांगने स्वतःला खोलीत बंद करून घेतलं. सुन्न झालेला तो. सईचे फोनवर फोन येत होते. त्याने सगळं बाजूला ठेवलं आणि कॅनव्हास वर चित्र काढायला सुरवात केली. तो त्यात इतका रंगला की पहाटे 4 पर्यंत पूर्ण करत होता आणि हातात कुंचला घेऊनच झोपी गेला. 

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलाच नाही. आई वडिलांनीही त्याला उठवलं नाही. 10 वाजले तेव्हा त्याच्या खोलीत पावलांचा आवाज आला. वैदेही त्याच्या खोलीत आलेली. त्याच्या हातातला ब्रश तिने काढून बाजूला ठेवला, आणि ती चित्र बघत बसली, 

चित्रातील तो मुलगा, हातातून निसटलेली चाफ्याची फुलं ओंजळीत भरत होता. चेहऱ्यावर समाधान होतं.. दुसरी वाट धूसर होत होती… एक अदृश्य शक्ती त्याच्या ओंजळीला ओंजळ देत होती…अदृश्य शक्ती चित्रात चितारणं अवघडच..पण त्याच्या हातातून ते आपसूकच झालेलं..कोमेजत चाललेली ती चाफ्याची फुलं ओंजळीत येताच मोहरून येत होती…

ती ते बघत असताना देवांगला जाग आली, वैदेहीला बघून तो दचकला आणि ताडकन उभा राहिला..

“घाबरू नकोस, मी आहे..”

“घाबरलो नाही, पण तू अशी अचानक?”

“काल जे काही केलंस ते स्वप्नात घडलंय असं वाटतंय का तुला?”

देवांग भानावर आला..काय बोलावे सुचेना..धीर करून तो म्हणाला..

“माझ्या नकळत ते घडलं, मी काय करत होतो काय बोलत होतो माझं मलाच समजेना, पण जे केलं ते योग्य होतं हे मात्र नक्की..”

“तुला स्पष्टच सांगते, तुला सई सोबत लग्न करायचं होतं म्हणून मला नकार दिलास. पण काल जे काही केलंस त्यावरून मला असं वाटतंय की गर्दीच्या आणि घरच्यांच्या दबावाखाली येऊन तू हे कृत्य केलंस”

“नाही वैदेही, तो रजत चांगला माणूस नव्हता..तुला त्याने खुश ठेवलं नसतं, तुझं आयुष्य बरबाद केलं असतं त्याने..”

“माझं आयुष्य, माझं सुख, माझा आनंद…तुला काय घेणं आहे? मी कशीही राहीन, काहीही करीन… तुला काळजी करायचं कारण काय? सांग ना देवांग ..का माझी इतकी काळजी? काय समजू मी याला? प्रेम समजू की आणखी काय?”

वैदेही भावनिक झालेली. आयुष्यातले चढ उतार बघत असतांना तिला देवांगच्या रूपाने एक आशा पल्लवित झालेली पण वेळोवेळी तिचा भ्रम तुटला..पण तरीही प्रत्येकवेळी देवांग समोर येतच राहिला..”

“आणखी कितीवेळा मला आशा दाखवणार आहेस? साखरपुडा केलास, लग्न करशीलच की नाही मला शक्यता वाटत नाही..काय ते एकदा मला सांगून टाक..”

त्यांचं हे बोलणं सुरू असताना खालून कसलातरी आवाज आला..

“देवांग…सरप्राईज..”

“सई? सईचा आवाज?”

देवांग खाली पळाला, मागोमाग वैदेही..

सईने देवांग समोर दिसताच त्याला मिठी मारली, आजूबाजूला आई वडील आहेत, माणसं आहेत याची काहीही जाणीव नाही..वैदेही बघतच राहिली..देवांग ओशाळला.त्याने तिला मिठीतून सोडवलं आणि म्हणाला,

“तू इथे?”

“हो देवांग,एक खुशखबर आहे..माझ्या बाबांनी आपल्या लग्नाचा मुहूर्त काढला आहे..पुढच्या महिन्यात..cool ना? आता आपण लवकरच नवरा बायको होणार..”

देवांग मागे झाला..आई वडील गप होते..आणि वैदेही? डोळ्यात पाणी आणून आपल्या अधांतरी आयुष्याकडे बघत होती…

क्रमशः

1 thought on “दैवलेख (भाग 14)”

Leave a Comment