दैवलेख (भाग 12)

 #दैवलेख (भाग 12)

वैदेहीने परत एक तयारी केली, तडजोड करण्याची. पण एरवी एक समाधान असे, हेही दिवस जातील म्हणत ती सामोरं जायची. पण आता आयुष्यभराची तडजोड, रजत सोबत. नाईलाज असला तरी ती आशावादी होती. रजतला आपण बदलू, प्रेम करण्यालायक माणूस बनवू असा विचार तिने केला. 

विचार करत असतांनाच वैदेहीची आई तिच्याजवळ आली,

“वैदेही, बाळा…तुझा होकार समजू ना मी?”

“हो आई..”

कितीही झालं तरी आई होती ती, वैदेहीच्या डोळ्यातलं तिने बरोबर वाचलं होतं. 

“तुला नकार द्यायचा असेल तर…तसं सांग..”

“नाही आई, तसं काही नाही..”

आईने दीर्घ श्वास घेतला, तिला जवळ बसवलं आणि सांगितलं,

हे बघ बाळ, आपण आयुष्यात इतके चढ उतार पाहिलेत की एक गोष्ट तुला आणि मलाही माहीत झालीये. माणसाकडे नुसतं प्रेम, माणसं आणि धैर्य असून चालत नाही..गाठीशी पैसा असला की दुःखं थोडं बहुत सुसह्य होतं. आपल्याकडे सगळं होतं, तुझे वडील..छानसं कुटुंब, प्रेम, जवळची माणसं…तुझे वडील गेले आणि पैशाची चणचण भासू लागली. त्यांच्यासाठी रडून झालं, जीवाला कोसून झालं पण हे शरीर? ते त्याच्या नैसर्गिक गरजा कसं थांबवेल? अन्नाची भूक, राहण्यासाठी बऱ्यापैकी सुविधा, आजारपणात योग्य उपचार, भविष्यासाठी लागणारा पैसा हे त्या दुःखाकडे बघून मागे सरणार तर नव्हतं ना ! हेच जर आपण श्रीमंत असतो, आपल्याकडे पुरेसा पैसा असता तर कदाचित जीवन थोडं चांगलं झालं असतं. पैसा महत्वाचा नाही असं बोलून चालत नाही, ते पुस्तकात वाचायला छान वाटतं”

“पैसा म्हणजे सगळं नाही पण बरंच काही आहे…कळतंय मला. पण कोणता पैसा? मी त्याची बायको म्हणून गेले तर तो पैसा माझा कसा? मी त्याची बायको झाले म्हणून तो दरमहा पगार नाही देणार मला”

“पण तुझं जीवनमान तर सुखकर असेल ना? या दोन खोल्यातून निघून मोठया घरात जाशील, चांगल्या सुखसुविधा अनुभवशील, चांगलं खायला प्यायला मिळेल…जे मी तुला देऊ शकले नाही ते सगळं तुला मिळेल..”

“असं बोलू नकोस आई, तू काय कमी केलं आहे मला? आणि मी लहान बाळ होते का सगळं मागायला? उलट मला अभिमान आहे की मला जे हवं ते स्वतःच्या कर्तृत्वावर मी मिळवलं”

दोघी मायलेकींचा तो हृदयस्पर्शी प्रसंग होता. 

दोन्हीकडून होकार कळला तसे सर्वजण साखरपुड्याच्या तयारीला लागले. तारीख ठरली, जवळच्या लोकांना निमंत्रण देण्यात आलं. 

______

देवांगची आई आणि बाबा देवांगच्या काळजीत असतात, सई त्यांना योग्य मुलगी वाटत नव्हती. वैदेहीला बघून त्यांना अजूनच वाईट वाटलं, इतक्या चांगल्या मुलीला देवांगने नाकारलं म्हणून. 

“अहो, काही होऊ शकेल काय?”

“देवांगने मनात आणलं तरच काहीतरी होईल, पण तो ऐकायला तयार नाही. वैदेहीला नकार कळवला त्याने. आणि वैदेहीच्या घरचेही दुसरं स्थळ बघत होते म्हणे, कदाचित जमलंही असेल..”

“यावेळी देवांग घरी आला की परत बोलून बघते त्याच्याशी”

_____

देवांग ऑफिसमध्ये झालेले सगळे प्रोजेक्ट बघतो. ते बघून हैराण होतो. कारण या सर्व आयडियाज त्याने फोनवर सईला सांगितलेल्या असतात, आणि विशेष म्हणजे ज्याला डिझाइन मधला ड माहीत नाही त्याने हे केलं, देवांगला संशय येऊ लागला. त्याने सईला बोलावून घेतलं.

“सई, या डिझाइन …काय आहे हे?”

सईला घाम फुटला, आता आपली चोरी पकडली जाणार…

“मी तुला फोनवर हे सगळं सांगत होतो, आणि अगदी तसंच या डिझाइन्स मध्ये दिसतंय.. म्हणजे तू राजेशला??”

बस..हेच ऐकायचं होतं मला. माझ्यावर विश्वास नाही ना तुझा? हेच पांग फेडलेस तू माझ्या प्रेमाचे. इतकी वर्षे तुझ्यावर प्रेम करत आले त्याचं हे फळ दिलं तू..वा..बस आता काही बोलू नकोस..”

चोर तर चोर वर शिरजोर अशी ती वागू लागली..देवांगला कळेना काय करावं..

“बरं जाऊदे रडू नकोस, मी फक्त विचारलं तुला..लगेच रडायला काय झालं..”

सई तिथून निघून गेली. देवांगने विचार केला की जाऊ द्यावं..कशाला क्षुल्लक गोष्टीमुळे वाद ओढवून घ्यायचा..

____

नंतर बरेच दिवस गेले. विकेंडला देवांग घरी आला. त्याचे आई वडील एका कार्यक्रमाला जात होते. ते निघाले तेव्हा लक्षात आलं की गाडी बंद आहे. 

“अरे देवा, गाडी बंद पडलीये..चारचाकी असून चालवता येत नाही मला नाहीतर गेलो असतो..”

“कितीदा सांगितलं की शिकून घ्या, किती दिवस या दुचाकीवर फिरणार.. देवांग आला तेव्हाच काय ती गाडी सुरू होते. देवांगला म्हटलं घेऊन जा तर तेही ऐकत नाही तो..”

देवांग सगळं बघत होता, तो म्हणाला मी सोडतो..

“अरे तू आराम कर, आत्ताच आला आहेस..आम्ही करतो काहीतरी सोय..”

पण देवांगने ऐकलं नाही. त्याने चारचाकी काढली आणि आई बाबांना सोडायला गेला. कार्यक्रम स्थळी त्याने आई बाबांना सोडलं आणि परत निघाला. त्याच्या लक्षात आलं की बाबांचा फोन गाडीतच राहिलाय..

“हे बाबा पण ना..”

तो फोन द्यायला आत गेला. बाबांना शोधू लागला. आजूबाजूला बरीच गर्दी होती. गर्दीतून वाट काढत तो जात होता. एक तर आई मोबाईल जवळ ठेवत नाही, त्यात बाबांनीही मोबाईल ठेवला नाही तर मला घ्यायला कसं जमणार..!!

गर्दीतून वाट काढत अखेर तो स्टेज समोर येतो. समोर साखरपुडा चालू असतो..त्याचं लक्ष नवरीकडे जातं आणि तो हादरतोच..!!!

“वैदेही???”

क्रमशः

3 thoughts on “दैवलेख (भाग 12)”

Leave a Comment