देव तर सर्वांमध्ये असतो ना?

 रेल्वेच्या डब्यात बसायला कशीबशी जागा मिळाली, सर्वांनाच घाई होती. डब्यात गर्दी शिरत होती आणि मिळेल तिथे जागा पकडत होती. अश्यातच एक भाजीपाला विकणारं कुटुंब तिथे आलं. आपला पसारा त्यांनी जागा मिळेल तिथे कोंबला आणि खाली पाय आखडत ती मंडळी बसली. एक वृद्ध स्त्री, तिची सून आणि मुलगा असं ते कुटुंब… गाडी सुरू झाली तशी ती सून तोंडाला पदर लावून शून्यात बघत होती. तिचा नवरा पैशांची मोजामोज करत होता आणि ती वृद्ध स्त्री चेहऱ्यावर दुखण्याचे भाव आणून कण्हत होती.

मी उठून त्यांना जागेवर बसायचा आग्रह केला, थोडं ओशाळत त्या उठल्या…उठताना सुनेला त्यांचा पाय लागला…सुनेने पटकन अंग चोरलं…आजीबाई एक शिवी हासडत माझ्या जागेवर बसल्या..मला हसू आलं, म्हटलं कुणाला पाय लागला तर पटकन नमस्कार करतो आपण, पण ही आजी ?? असो…

काही वेळाने आजी बाथरूम ला जायला निघाली…पुन्हा एकदा सुनेला पाय लागला…काही झालंच नाही अश्या आवेशात आजी झरझर पुढे चालत गेली…

येताना एक लहान मुलगा पायाजवळ आला आणि त्याला चुकून पाय लागला…म्हटलं आजीने आज लाथा मारायचा ठेकाच घेतलाय वाटतं…

पण त्या परक्या मुलाला पाय काय लागला..आजीबाई दोन्हीं हातांनी त्याच्या पाया पडू लागली…

“पोरा…लागलं नाय नव्ह…”

मी अवाक झाले…

मनात विचारांचं काहूर उठलं…

दुसऱ्यात देव असतो या भावनेने आपण कुणाला पाय लागला की चटकन त्याचं पाय पडतो…मग त्या सुनेत देव नव्हता का? वयाने कितीतरी लहान मुला मध्ये आजीला देव दिसला..मग सुनेच्या ठिकाणी आजीला काय दिसत होतं? आजीची सून म्हणजे आजीसाठी कोण होती? आपल्या हातातली कटपुतली? की हक्काची गुलाम? काय स्थान होतं तिचं? आपली चूक असताना तिचा पाया पडायला आजीला काय कमीपणा वाटला? सासू म्हणून मोठेपणा एका व्यक्तीच्या आदराहून मोठा झाला?

या प्रश्नांची उत्तरं कुणाकडूनही मिळणार नव्हती…

गाडी थांबली…मुलगा आई आणि बायकोला मागे सोडून झरझर चालत खाली उतरला…पण ती सून?? एका हातात जड सामान घेत आणि दुसऱ्या हाताने म्हातारीचा हात पकडून गर्दीतून तिला वाचवत बाहेर काढत होती…

आजीला सुनेत देव दिसला नसेल..मला मात्र तो आता दिसला..

_____

Leave a Comment