देवमाणूस

मुलीचं प्रेमप्रकरण समजताच दळवी अण्णा रागरागात आपल्या खोलीत दार बंद करून बसले..मनात प्रचंड घालमेल होती, फुलासारखं जपलेल्या मुलीने बाहेर असं माझं नाक कपावं? काय कमी केलं तिला? लोकांना हे समजलं तर गावात काय इज्जत राहील माझी? सरपंच पदाचा मान मिरवत मोठ्या मिजासीने जगत होतो…आता कुठल्या तोंडाने लोकांसमोर जाऊ??
गावातील प्रतिष्ठित सरपंच दळवीं अण्णा आज भावुक झाले होते…हातात येईल ती वस्तू आदळून आपटून संताप करत होते…
रुपालीने दार वाजवलं…अण्णांना समजलं आहे याची तिला कल्पनाही नव्हती…
“अण्णा…चला जेवून घ्या…वेळ चुकली तर त्रास होतो तुम्हाला..”
“मला भूक नाही…”
“अण्णा??”
“तू जा इथून…”
रुपाली निघून जाते.
अण्णा न जेवताच घराबाहेर पडतात..नुसती पावलं टाकीत..कुठे जाणार काय करणार कसलाच पत्ता नाही..तणाव दूर करण्याचा त्यांचा हाच एक मार्ग असायचा…
बरंच चालून झाल्यावर एका दूरच्या टेकडीवर एक कंदील दिसतो..रात्र बरीच झालेली असते…ते त्या कंदिलाच्या दिशेने जातात…
तिथे एक हॉटेल होते.. एक अविवाहित जोडपं तिथे लाजत मुरकत जेवण करत होतं…
“इतक्या रात्रीची ही पोरं असली थेरं करायला येतात? लाज वाटत नाही का यांना?”
अण्णा मनाशीच बोलतात, पण भानावर येतात..आपली मुलगीही त्यातली…कोणत्या तोंडाने बोलतोय आपण..
इतक्यात हॉटेल मधला माणूस पाणी घेऊन येतो..
“साहेब दूरवरून आलेले दिसताय..”
“हो..पलीकडच्या गावातून..”
अण्णा त्या मुलांकडे बघतच या माणसाशी बोलत असतात…
तो माणूस अण्णांच्या मनातलं ओळखतो..
“जाऊद्या साहेब…त्यांचा आई बापाला नाही त्यांची काळजी..आपण कशाला रक्त जाळायचं? पण सगळी पोरं अशी नसतात बरं का..नुकताच एक पोरगा आणि पोरगी इथे आलेले…पोरगी म्हणाली…माझ्या आई बापाने 20 वर्ष मला सांभाळलं…त्यांचा शब्दाबाहेर मी नाही…योग्य वेळ आली की त्यांना सांगू..आपण एकमेकांवर प्रेम केलं, पण या प्रेमाला आपण काळिमा फासायचा नाही..आपलं प्रेम पवित्र आहे..एकत्र आलो तर चांगलंच, पण नाही आलो तर नशीब समजून खुश राहायचं…माझ्या अण्णांना मी अजून अंधारात ठेवणार नाही..आजच जेवायला बोलवायला जाताना त्यांना आधी सांगेन सगळं…त्यांचा जो निर्णय असेल तो मान्य…आज पहिल्यांदा आपण असे भेटलोय..यापुढे नको भेटायला..अण्णांना समाजात प्रतिष्ठा आहे..कुणी पाहिलं तर…”
अण्णा हा शब्द ऐकताच त्यांना समजलं की ही आपलीच पोर..कितीही झालं तरी मुलगी आपल्या बापाचाच विचार करत होती..अण्णा शांत झाले…त्यांना हायसं वाटलं..काहिही विचार न करता आपण पोरीवर आरोप केले…त्यांना वाईट वाटलं..प्रेम करणं चुकीचं नाही…पण पोरीने या प्रेमालाही पवित्र बनवून आई बापाला पहिलं स्थान दिलं…
अण्णा घरी गेले..
रुपाली अण्णांजवळ आली..
“अण्णा…तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे..”
“पोरी….माझे संस्कार विसरली नाहीस..कोण आहे तो मुलगा त्याला भेटवं ..”
रुपाली ला आश्चर्य वाटतं..
मुलाला बोलावलं जातं..
अण्णांना शोधूनही असं स्थळ मिळालं नसतं.. मुलगा उच्चशिक्षित, प्रतिष्ठित सरकारी नोकरीवर असतो…
अण्णा आनंदाने लग्न लावून देतात..
“त्या दिवशी हॉटेल वर त्या माणसाने सत्य सांगितलं नसतं तर..कुणाच्याही गळ्यात पोरीला मारून मोकळा झालो असतो…त्या माणसाच्या रूपाने देवच आला धावून…”

अक्षता टाकता टाकता अण्णा त्या माणसाला लाखो धन्यवाद देतात..

368 thoughts on “देवमाणूस”

Leave a Comment