देवपूजा कशी करावी?

 देवपूजा कशी करावी?

लहानपणी आजी देवपूजा करत असायची तेव्हा तिच्याजवळ बसून लुडबुड करायला फार मजा यायची. आजीचं आखीव रेखीव काम, मूर्त्यांना लहान बाळाप्रमाणे नाजूकपणे त्यांची अंघोळ घालणं, मग त्यांना नक्षीदार कपडे चढवनं, सगळं अगदी मन लावून मी बघायची…देवांच्या जागा अगदी फिक्स होत्या, गणपती उजव्या बाजूला, देवी मध्यभागी आणि शंकराची पिंड डाव्या बाजूला..आजीला सहज विचारलं, आजी यांच्या जागा बदलल्या तर??

“जागा बदलली तर भांडतील ते..”

लहान मुलीच्या प्रश्नाला लहान मुलीसारखच उत्तर आजीने दिलं..पण मी मात्र धसका घेतला..

“चुकून चुकीने जर एखाद्या देवाची जागा बदलली तर?? पिंडीच्या जागी कृष्ण, आणि कृष्णाच्या जागी पिंड ठेवली तर? कृष्ण आणि शंकर युद्ध करणार?? एक तर तेव्हा tv वरील रामायण महाभारतातील युद्ध पाहून डोक्यात बरंच काही फिरायचं…इथे माणसांच्या भांडणाला घाबरून जायला होतं, जर देवांच्या अश्या भानगडी लागल्या तर कुठे उपात.

तेव्हापासून देवपूजा म्हटली की भीतीच वाटायची.. समज आल्यावर जरा कुठे भीती पळाली..पण आज मी सांगणार आहे की देवपूजा कशी करायची..

देव्हारा, देवांच्या मुर्त्या, कलश, सुपारी यांच्या जागा याबद्दल कितीतरी नियम ऐकिवात आहेत, अमुक एक मूर्ती उजवीकडेच हवी, अमुक एक वस्तू देवघरात नको, ही दिशा ती दिशा…अरे बापरे..!!! काहीही करायला भीती वाटते..पण मी एक पद्धत तुम्हाला सांगते, ज्याला कसलेही नियम नाहीत आणि देवही कोपनार नाही..

आपल्याकडे 33 कोटी देव आहे असं म्हणतात, खरं तर देव म्हणजे तत्व, गुणांचं श्रेष्ठ स्थान, गुणांचं प्रतीक…

देवघरात गणपतीची पूजा करतो तेव्हा ध्यान करा, मनन करा…गणपती विद्येची देवता..बुद्धीची देवता, त्याची उपासना करा. म्हणजे काय? माझ्याकडे किती ज्ञान आहे, त्याचा मी वापर करते का, माझं ज्ञान मी कसं वृद्धिंगत करेन, वाचन कसं वाढवू शकेल याचा विचार करा आणि हे सगळं करण्याची ताकद माझ्यात दे असं गणपती ला सांगा…

शंकराच्या पिंडीची पूजा करताना मनन करा, शिव म्हणजे वैराग्याचं प्रतीक. आयुष्यातल्या कितीतरी क्षुल्लक गोष्टींसाठी आपण धडपडत असतो, चिंता करत असतो..पण जीवन हे क्षणभंगुर आहे..याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घेता येईल याचा विचार करा. ईच्छा अपेक्षांना दुय्यम स्थान देण्याची बुद्धी शंकराकडे मागा.

लक्ष्मीची पूजा करताना केवळ मला पैसा मिळू दे अशी मागणी न करता मला अर्थार्जनाच्या संधी मिळू दे किंवा अर्थार्जनाच्या वाटा मला स्वतःलाच तयार करू दे, येणारी लक्ष्मी चांगल्या मार्गानेच येईल याची काळजी असू दे, आलेली लक्ष्मी योग्य वाटेनेच व्यतीत होईल अशी जाणीव आई लक्ष्मीकडे मागा.

अष्टभुजा देवीची मूर्ती बघून तर तुम्ही स्वतःचच रूप तिच्यात पाहाल, एकाच वेळी असंख्य कामं करणारी गृहिणी हीसुद्धा एक अष्टभुजाच..पण इतकी कामं समर्थपणे पेलण्याची आणि प्रत्येक कामात सचोटी आणण्याची ताकद देवीकडे मागा.

बालकृष्णाची पूजा करताना कृष्णा सारखं विविधरंगी पैलू असलेलं व्यक्तिमत्त्व साकारण्याचा आशीर्वाद मागा.

प्रत्येक देवाचं तत्व अंगिकरण्याचा संकल्प करा..शाळेत जसे रोज पाढे म्हणायचो ज्यामुळे आजही ते तोंडपाठ आहेत, तसंच अशी देवपूजा रोज केली तर आपल्यासारख्या ‘वाल्याचा’ ‘वाल्मिकी’ नक्कीच होऊ शकतो.

 

Leave a Comment