दुसरं बालपण

 सुहास ऑफिसमधून थकून आला होता. आता गरमा गरम चहा घेऊन जरा पडायचा त्याचा विचार होता. त्याचा अडीच वर्षाचा मुलगा अविर रेंगाळत त्याच्याजवळ आला आणि त्याच्या अंगावर खेळू लागला. मुलाला बघून सुहासचा थकवा कुठल्या कुठे पळाला, सुहास सगळा थकवा विसरून मुलासोबत खेळू लागला. अविर नुकताच बोलू लागला होता. त्याचे बोबडे बोल कानाला सुखावत असत. तो त्याच्या बोबड्या वाक्यांनी वडिलांशी बोलू लागला..

“‘पपा..गाली पाहिजे नवीन..”

“हो रे बाळा, आणू हा तुला नवीन खेळणी..”

अविर काही वेळाने पुन्हा तेच बोलू लागला..

“‘पपा गाली पाहिजे..”

“हो बाळा आणू हा..”

लहान अविर, त्याच्या बालबुद्धिप्रमाणे सतत तेच तेच विचारत होता, पण सुहास प्रत्येकवेळी उत्तर देताना खुश व्हायचा, त्याला सारखं सारखं उत्तर द्यायला कंटाळाही येत नव्हता..

“अरे तुला म्हटलं ना पप्पा घेऊन देणारे ते?”

आई येऊन बोलू लागली..

“अगं लहान आहे तो, लहान मुलं एकच गोष्ट सतत घोळत असतात..”

“बरं ते जाऊद्या, आज गावावरून माणसं येणारेत…सासूबाईंना भेटायला..बहुतेक त्यांनीच सांगितलं असावं की भेटून जा असं..”

“अरे देवा, मी म्हटलं आज मस्त आराम करू..”

“नंतर करा, आता थोडावेळ अविर ला सांभाळा, मी जेवणाचं बघते..”

“बरं…”

सुहास नाखुषीनेच तयार झाला. काही वेळाने पाहुणे आले..सुहासने त्यांची विचारपूस केली आणि आजींना भेटायला सुहास सर्वांना वरच्या खोलीत घेऊन गेला. आजीबाई खूप खंगत चाललेल्या, वेगवेगळे आजार, उपचार आणि औषधं यामुळे त्यांचा मेंदूवरचा ताबा सुटत चालला होता.त्यांना लक्षातही राहत नसे आणि त्या काहीही बरळत बसत. भेटायला येणाऱ्या व्यक्तीला त्यांच्याबद्दल तळमळ वाटे, पण सुहास अन त्यांच्या बायकोला सवय झालेली..

नातेवाईक आजीबाईंना विचारत होते, 

“काय मावशी, बरी आहे का तब्येत?”

आजीबाई प्रश्नार्थक नजरेने सर्वांकडे बघत होत्या. त्यांना कुणीही ओळखू येत नव्हतं. सुहासकडे त्यांनी “कोण आहेत?” असा प्रश्न खुणेनेच विचारला..

“माई हे आपल्या शारदाचे जेठ जेठाणी आहेत…पिंपळगाव ला राहतात, आठवलं का?”

अजीबाईंनी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला, आजीबाईंना ओळखू आले नव्हते पण कुणीतरी मायेने चौकशी करायला आले आहेत एवढंच त्यांना माहीत होतं. थोड्या वेळाने आजी पुन्हा सुहासला विचारे..

“कोण आहेत हे?”

“अगं शारदाचे जेठ आहेत..”

आजीबाई केविलवाण्या बनून नुसत्या बघत होत्या, काही वेळाने सुहासच्या बायकोने सर्वांना चहा दिला..आजीबाईंनी चहा घेऊन कप बाजूला ठेवला. सुहास आणि आलेले पाहुणे गप्पा मारत होते, आजीबाईंनी पुन्हा सूर काढला..

“चहा झाला नाही का अजून?”

“अगं माई आत्ता तर घेतला चहा, तो बघ शेजारी कप आहे अजूनही..”

आजीबाई कप कडे बघतात आणि ओशाळतात..काही वेळाने पुन्हा सुहासला विचारतात..

“कोण पाहूणे आहेत?”

सुहास आता वैतागतो, पाहुण्यांना घेऊन खालच्या खोलीत येतो.. त्यांचा इतर गप्पा होतात, शारदा म्हणजे सुहासची मोठी बहीण..त्यांचं एकत्र कुटुंब, त्यामुळे शरदाच्या माहेरी तिच्या जेठ जेठाणीचं सतत येणं जाणं असायचं..अविर तिथेच खेळत होता, त्याच्या बाललीलांचं कौतुक सुरू होतं..

“सुहास भाऊ, शारदा नेहमी सांगत असायची बरं का…तुम्ही लहान होतात तेव्हा शारदा ताई तुम्हाला सांभाळत, तुमच्यात आणि अविर मध्ये काहीही फरक नाही, तुम्हीही अगदी त्याच्यासारखे खोडकर.. असेच सारखे प्रश्न विचारायचे, खूप डोकं खायचे..शारदा ताई खूप वैतागून जायच्या, पण माई मात्र जवळ घेऊन तुमच्याशी बोलायच्या, तुम्हीही अविर सारखे शंभर प्रश्न विचारायचे म्हणे, पण माई कधीही वैतागत नसत..दहा वेळा जरी उत्तर द्यावं लागलं तरी देत..”

“अगदी बरोबर… आमचा अविर अगदी तसाच..मीही कधी वैतागत नाही त्याला उत्तरं द्यायला..लहान आहे तो..मेंदू पूर्ण विकसित नसतो.. चांगलं वाईट, खरं खोटं काय समजणार त्यांना..”

“होना..आणि म्हातारपणही म्हणजेच दुसरं बालपणच..फरक एवढाच की बालपणी मेंदू पूर्ण विकसित नसतो आणि म्हातारपणी विकसित मेंदूची झीज झालेली असते..त्यामुळे दोन्हींचं वागणं सारखंच..”

सुहासला एकदम कसंतरी वाटू लागलं..ज्या आईने लहानपणी आपल्या प्रत्येक प्रश्नाला दहा वेळा तीच तीच उत्तरं दिली, तीही न वैतागता..तिलाच आज आपण तिच्या दुसऱ्या बालपणात उत्तरं द्यायला वैतागतोय…पाहुण्यांना निरोप देऊन तो माईकडे गेला..माई बडबडत होत्या..

“शारदे..सुहासकडे लक्ष दे…रस्त्याकडे पळतो तो…”

“माई…सुहास आता मोठा झालाय..”

आजी केविलवाण्या नजरेने सुहासकडे बघू लागली. आजी भानावर यायची तेव्हा तिलाच स्वतःची लाज वाटायची.

 चार वेळा चहा आणि दोन वेळा जेवणाचीही ऑर्डर दिली गेली..जेवणानंतर तासाभरात माईने पुन्हा जेवण आणायला लावलं..जेवण झालंय हेही ती विसरली होती…

पण यावेळी सुहास वैतागत नव्हता..त्याने दुसऱ्यांदा जेवण आणून दिलं.. ताट पुढे करताच माई त्याच्यावर खेकसली..

“डोक्यावर परिणाम झाला की काय तुझ्या?”

“काय गं माई काय झालं?”

“आत्ताच तर जेवले ना मी? हे बघ, पाण्याचा ग्लास अजून इथेच आहे..”

“अर्रर्रर्रर्र…विसरलोच बघ…लक्षात रहात नाही आता माझ्या..वय झालंय ना..”

माई खूप दिवसांनी खुदकन हसली..आवाज ऐकून सुहासची बायको धावत आली..

“काय हो काय झालं??”

“काही नाही, माईचं दुसरं बालपण साजरं करतोय..”

1 thought on “दुसरं बालपण”

Leave a Comment