रोज आपला एका तरी दुकानदाराशी हमखास संबंध येतो, दुकानदार अशी एक व्यक्ती की त्याची छबी आपल्या डोक्यात पक्की बसलेली असते. पण या दुकांदारांच्याही अजब तऱ्हा असतात बरं का. वेगवेगळ्या स्वभावाचे दुकानदार आपल्याला भेटतात, प्रत्येकाची बोलण्याची पद्धत, व्यवहाराची पद्धत ही वेगवेगळी.
पहिला प्रकार म्हणजे ‘आम्हाला तुमची गरज नाही वाले दुकानदार’
एकदा प्रिंटिंग च्या कामासाठी एका ओळखीतल्या प्रिंटिंग ऑफिसमध्ये पहिल्यांदाच गेलो होतो. बाहेरून छानसं सजवलेलं, आतून छान इंटेरिअर केलेलं असं ऑफिस त्याने बनवलेलं. आम्ही दार उघडून आत गेलो, एक ग्राहक म्हणून, पण समोरचा इतका ढिम्म की आलेल्या ग्राहकाशी काय बोलावं त्याला सुचेना. एकदा त्याने आमच्याकडे फक्त पाहिलं अन वैतागलेल्या सारखी नजर फिरवत पुन्हा त्याच्या स्क्रीनकडे तो वळला. ते पाहूनच मी अन माझ्या मिस्टरांची खटकी पडली, पण काम अर्जंट असल्याने आम्हीच स्वतःहून विचारलं..
“दादा अमुक असं काम आहे..”
त्याने ते ऐकलं, मोठ्या मुश्किलीने हातातलं काम बाजूला ठेवलं अन काय काय हवंय याची माहिती घेतली. त्याने काम चांगलं केलं पण त्याच्या एकंदरीत वागण्यामुळे पुन्हा याच्याकडून काही करवून घ्यायचं नाही असं मनाशी पक्क केलं.
दुसरा प्रकार म्हणजे ‘आळशीपणाचा कळस असलेले दुकानदार’
एकदा रांगोळी घेण्यासाठी एका दुकानात गेलेले, दुकानाची अवस्था पाहून दुकानदार तसा गरीबच वाटत होता. मला चांगली 200 रुपयाची रांगोळी घ्यायची होती, आपल्यामुळे त्याचा फायदा होईल अन बिचारा खुश होईल याचं मलाही समाधान वाटू लागलेलं. त्याने काय हवंय विचारलं, मी सांगितलं की रांगोळीचे रंग हवेत. खुर्चीवरून उठायला त्याचं फार जीवावर आलेलं, कसाबसा धीर करत तो उठला अन एका कोपऱ्यात एकावर एक रचलेल्या सामानात तो पाहू लागला. रंगांच्या गोण्या मला माझ्या जागेवरून स्पष्ट दिसत होत्या, त्या काढण्यासाठी फक्त पुढे रचलेलं काही सामान बाजूला करायचं होतं. दुकानदाराने डोकं खाजवलं, माझ्याकडे पाहिलं अन म्हणाला ..
“नाहीये ताई रंगोळीचे रंग..”
“अहो मला भरपूर रंग घ्यायचेत..”
“नाहीये ना ताई शिल्लक..काय करू..”
समोर रांगोळी दिसत असतानाही तो देत नाहीये हे पाहून मला राग तर आलाच, पण तो दुकानदार गरीबच का राहिला याची दया येण्याऐवजी त्याची हीच लायकी आहे असं वाटू लागलं.
तिसरा प्रकार म्हणजे ‘अपमान करणारे दुकानदार..”
ग्राहकांचं काही चुकलं तर सरळ सरळ अपमान करणारे दुकानदार काही कमी नाहीत. व्यवसायात ग्राहक हेच दैवत हे विसरणारा हा प्रकार. व्यवहार चुकला, एखाद्या वस्तूचं प्रमाण उलटं सांगितलं तर सपशेल आपला अपमान करून ही मंडळी खुश होतात.
चौथा प्रकार म्हणजे “साखरेचं पोतं”
ही दुकानदार ग्राहकांशी इतकं गोड, इतकं मधुर बोलतात की हे बोलणं कृत्रिम आहे हे ग्राहकाला लगेच लक्षात येतं. मग असं कृत्रिम बोलणं ऐकायला नको नको होतं. आत्यंतिक बडबड, आपली काळजी दाखवण्याचा निष्फळ प्रयत्न आणि सांगितलेली एक वस्तू गपचूप देण्याऐवजी चार जास्तीच्या वस्तू दाखवून आपल्याला संकटात पाडणारा हा प्रकार.
पाचवा अन सर्वांचा आवडता प्रकार “आपण भलं आपलं काम भलं..”
ही लोकं आलेल्या ग्राहकाला अदबीने काय हवं ते विचारतात, वस्तू समोर ठेवतात अन सुट्टे वगैरे न मागता सरळ हिशोब करतात. वायफळ बडबड नाही ना ग्राहकांचा अपमान. अश्याच लोकांच्या दुकानात जास्त गर्दी असते.
50% लोकं ही वस्तू कुठल्या दुकानात चांगली मिळते यापेक्षा कुठल्या दुकानात व्यवहार सोपा होतो तिथे जात असतात. दुकानातल्या वस्तू आपल्या हातात देऊन त्याचा अचूक व्यवहार करणारा दुकानदार, त्याचं बोलणं, त्याचं व्यक्तिमत्त्व हे कायम आपल्या लक्षात राहतं. तुमच्या माहितीत आहे का अजून कुठला वेगळा प्रकार??