दिल तो बच्चा है जी ..(भाग 1) ©संजना इंगळे

वर्ष: 2000

आदेश नेहमीप्रमाणे सकाळी उठून फ्रेश होऊन ब्रश घेऊन गच्चीवर गेला..त्याची ही नेहमीचीच सवय होती, सहज म्हणून? नाही, समोरच्या गच्चीवर साधना नेमकी त्याच वेळेस कपडे वाळत टाकायला येई, दोघांची नजरानजर हीच त्या काळातली so called डेट होती…पण आज मात्र साधना आदेश कडे टक लावून पाहत होती, 1 मिनिटं नीट निरखून पाहिलं आणि पुढच्याच क्षणी ती पोट धरून हसायला लागली…आदेश ला कळेना, आज हिला काय झालं?? तो वरमला आणि खाली गेला..जिन्यातून आजी भर उन्हाळ्यात डोक्याला रुमाल बांधून चढत होती…तीही आदेश ला पाहून हसायला लागली…खाली बाबा एकाशी हुज्जत घालत होते, आणि आई देवाजवळ बसून पोथी वाचत होती..आदेश ला सर्वजण असे पाहत होते जसं पहिल्यांदा पाहिलंय…
आदेश तोंड धुवायला जातो, चुळ भरून समोरच्या आरशात पाहतो… आणि मोठ्याने ओरडतो..

“शांती……”

वर्ष: 2020

जयराम नेहमीप्रमाणे सकाळी उठून ब्रश करायला घेतो, खोलीत झाडू मारायला आलेली कमलाबाई जयरामकडे पाहून पोट दुःखेस्तोवर हसते… खाली जयराम ची आई डोक्याला हात लावून बसलेली असते, जयराम चे बाबा शेजारच्यांची समजूत घालत असतात…जयराम आरशात बघतो आणि मोठ्याने ओरडतो…

“शांती…..”

वरच्या सर्व प्रसंगांना शांती एकमेव कारणीभूत होती…लहानपणी खोडकर स्वभाव म्हणून आई वडिलांना कौतुक होतं, पण वय वाढत गेलं तसा हा खोडकरपणा अधिकच वाढू लागला..आता शांती जसजशी शिकू लागली तसतसं तिला खोड्या काढायचे नवनवीन प्रकार येऊ लागले…

बरं वरची दोन्ही मंडळी का ओरडली?? पहिल्या प्रसंगात शांतीने झोपेत आपल्या भावाच्या, आदेश च्या तोंडावर काजळ रंगवून त्याचा चेहरा भुतासारखा बनवला होता..
आदल्याच दिवशी आपल्याला रागवत असलेल्या आजीची झोपेत बॉयकट केलेली, आणि भूक लागली म्हणून रात्री केळी खाऊन सालं रस्त्यावर फेकलेली..रस्त्यावरची लोकं वडिलांशी हुज्जत घालत होती…

आणि दुसऱ्या प्रसंगात तिच्या याच खोड्यांना आता सासरची मंडळी भोगत होती…

“शांती…” नावाच्या अगदी विरुद्ध…तिच्या खोडकरपणा साठी सगळ्या शांत्या करून झाल्या पण सगळं व्यर्थ… अखेर तिचं लांबच्या एका गावात लग्न करून दिलं आणि ते गावही लवकरच हादरलं…

“मेलं काय पाप केलं आणि पोराच्या पदरात अशी अर्धवट बायको पडली, देवा…उचल रे बाबा मला..”

शांतीची सासू देवासमोर बसून बोटं मोडत होती…देवघराच्या मागच्या भिंतीवरील फोटोला कुंकू लावायला सासू उठली, कुंकू लावून खाली बसली अन..

“आआआआआ…शांते…”

देवसमोरच्या अगरबत्त्या शांतीने 2 सेकंदात बुडाखाली ठेवल्या होत्या…

ही कथा आहे अश्याच एका शांतीची, जिचा खोडकरपणा तुम्हाला पोट धरून हसायला भाग पाडेल…

क्रमशः

Leave a Comment