दाजी

 पदवीदान समारंभ झाल्यानंतर काही कागदपत्रे घेण्यासाठी अदिती कॉलेजच्या अकाउंटंट ऑफिस मध्ये गेली, अकाउंटंट ने आधी तिचं अभिनंदन केलं. का नाही करणार? इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ती अव्वल आली होती आणि पूर्ण कॉलेज तिला ओळखत होतं. 

“अभिनंदन अदिती, तूच पहिली येणार हे माहीत होतं..गेले चार वर्षे बघतोय तुला, तुझ्यासारखी प्रामाणिक आणि अभ्यासू मुलगी म्हणजे कॉलेजची शान आहे..आता तुमचं कॉलेज संपलं खरं, पण आम्हाला तुमच्या बॅच ची आणि खासकरून तुझी आठवण नक्की येत जाईल..”

“मॅडम मलाही तुम्हा सर्वांची खूप आठवण येईल, कॉलेज मध्ये मिळणाऱ्या स्कॉलरशिप मुळे मी शिकू शकले, नाहीतर माझ्या घरचे बारावी नंतर लग्न लावून देणार होते माझे..”

“स्कॉलरशिप? एक मिनिट..” मॅडम कॉम्प्युटर वर डिटेल्स चेक करतात..

“कसली स्कॉलरशिप म्हणतेय तू? दरवर्षी पूर्ण फी जमा असल्याचं दिसत आहे इथे..”

“कसं शक्य आहे??”

“म्हणजे? तू फी भरली नव्हती?? कुणी भरली मग??

अदिती एकदम चमकली, धावत जाऊन कॉलेजच्या बाकड्यावर जाऊन बसली, चार वर्षांपूर्वी घडलेली घटना तिला आठवली..तिची मोठी बहीण कांता आणि तिच्यात वयाचं बरंच अंतर होतं, घरची परिस्थिती वडिलांच्या कपड्यांच्या व्यवसायामुळे चांगली होती. कांताचं शिक्षण चांगलं झालं आणि ती चांगल्या नोकरीला लागली. तिला साजेसा मुलगा पाहून तिचं लग्नही झालं. सचिनराव कडक शिस्तीचे पण शांत स्वभावाचे होते. लग्नात अदिती लहान होती, सचिन दाजींची साली वरून केलेली चेष्टा त्यांना अजिबात आवडत नसे. ताईचं लग्न थाटामाटात झालं, काही महिन्यातच घरच्या दुकानाला शॉर्ट सर्किटने आग लागली आणि खूप नुकसान झालं होतं, त्यातून सावरत असताना खूप हाल झाले होते, पैशाची चणचण जाणवू लागली, कांताच्या वाडीलांचीही चिडचिड होऊ लागली. अदिती हुशार होती, बारावीला तिला चांगले गुण मिळाले होते आणि तिला पुढे इंजिनियर व्हायचे होते. पण वडिलांसमोर हा विषय काढला अन वडील कडाडले, 

“जेवढं शिक्षण घेतलं तेवढं पुरे, आता तुझं लग्न लावून मी मोकळा होतो..”

अदितीला रडू आलं, तिची स्वप्न खूप मोठी होती, पण परिस्थिती पुढे तीही हतबल होती. 

एकदा ताई आणि सचिन दाजी जेवायला घरी आले होते, त्यांनी मला बारावीनंतर काय म्हणून विचारलं होतं. तेव्हा वडिलांनी स्पष्ट सांगितलं होतं..

“जावईबापू, कितीही झालं तरी पैशाचं सोंग नाही घेता येत.. आम्हाला कितीही वाटलं तरी पुढे नाही शिकवू शकत तिला..”

सचिन दाजी विचारात पडले, वडिलांच्या चेहऱ्यावर जी काळजी आजवर होती ती आज सचिन दाजींच्या चेहऱ्यावर दिसत होती.

“माझ्या ओळखीतलं एक कॉलेज आहे..बारावीला चांगले गुण असलेल्या विद्यार्थ्यांना तिथे मोफत शिक्षण आहे.”

“खरंच असं आहे? मी तर आजवर कधी अशी योजना ऐकली नाही..”

“नवीनच सुरू झालीये, अदिती..उद्या सगळी कागदपत्र घेऊन चल माझ्यासोबत.. ऍडमिशन घेऊन टाकू..”

आदिती खुश झाली होती. सचिन दाजी नेहमी अकाउंटंट कडे काम असताना अदितीला मुद्दाम बाहेर उभं राहायला सांगायचे…त्याचं कारण तिला आज समजलं..

अदितीचे डोळे पाणावले, इतकी वर्षे दाजी माझी फी भरत होते.. समाजात जीजा सालीच्या नात्यावर विनोद चालतात फक्त, पण याच दाजीमध्ये वडिलांसारखी एक सुप्त जबाबदारी असते, आपल्या सालीचा यांना अभिमान असतो, तिच्या प्रगतीसाठी हेच जिजाजी पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, वेळोवेळी खुशाली विचारत असतात, लग्न जमवताना मुलाची पूर्ण पारख केल्याशिवाय त्याचा हाती देत नाहीत, प्रेमविवाहात मुलगा योग्य असेल तर घरच्यांना सालीच्या सुखासाठी हेच पुढाकार घेऊन समजावत असतात.

दाजी नावाच्या व्यक्तीमध्ये अदितीला वडिलांची सावली दिसली..तुम्हालाही नक्कीच दिसली असेल. एक कृतज्ञता..दाजी नावाच्या पितृहृदयाप्रति…

(आपल्या लाडक्या जिजाजींना नक्की पाठवा)

Leave a Comment