थेंबभर तेल

 इतर बायकांप्रमाणे आपणही काहीतरी करावं असं केतकीला नेहमी वाटे. आजूबाजूला असलेल्या आणि ओळखीतल्या बायका काहीना काही काम करतच असायच्या, कुणी केक च्या ऑर्डर्स घ्यायच्या, कुणी शिवणकाम करायचं, कुणी जॉब करायच्या, कुणी रिसेलिंग ची कामं करायच्या. त्यांची धडपड पाहून केतकीलाही वाटायचं आपणही असं काहीतरी करावं. पण हे तात्पुरतच बरका, घरी आल्यावर पुन्हा तेच आपलं काम, मग tv, मग झोप. तिचा नवरा आकाश तिला पूर्ण पाठिंबा द्यायला तयार होता पण हिला मात्र तिचा सेफ झोन आवडे. काही काम घेतलं अन काही चुकलं तर? आपल्याला कुणी हसलं तर? आपल्याला जमलं नाही तर? असे नकारात्मक विचार करत करत ती अगदी निष्क्रिय बनली होती अन काही न करण्यातच तिला समाधान वाटायचं, अधूनमधून मनात विचार यायचा काम करण्याचा पण लगेच मन वळायचं. 

आकाश तिच्या या स्वभावाला खरं तर कंटाळला होता, मागे एकदा मुलांच्या ट्युशन्स घ्यायचं तिने आकाशला सांगितलं, आकाशने उत्साहाने ऑफिस मधून डिजिटल ऍड बनवली, बोर्ड, मार्कर बुक केलं अन संध्याकाळी घरी येईस्तोवर केतकीचा निर्णय बदलला होता. एके दिवशी तिची बहीण तिच्याकडे आलेली, तिनेही समजावलं की तू काहीतरी करायला हवं, तुझ्याकडे वेळ आहे, स्किल आहे..काहीतरी धडपड कर.. यावेळी मात्र तिने मनावर घेतलं ते एक पूर्ण दिवस. हा काळ खरं तर खूप मोठा होता पण पुन्हा येरे माझ्या मागल्या.बहीण गेली अन लगेच दुसऱ्या दिवशी ती विसरलीही. 

आकाशने मात्र आता तिला समजवायचं ठरवलं. सुट्टीचा दिवस होता, कामं अगदी आरामशीर चाललेली, केतकी देवपूजा करत होती. आकाश तिच्याजवळ येऊन बसला. पूजा आटोपून केतकी निरांजन पेटवत होती. चांगलं दोन चमचे तेल तिने टाकायला घेतलं तोच आकाश म्हणाला, 

“अगं इतकं तेल कशाला? थेंबभर टाक फक्त..”

“थेंबभर तेलाने तो दिवा 10 मिनिटात विझेल..दिवसभर तरी निदान चालायला हवा ना??”

“कशाला? 10 मिनिटं पुरेसे आहेत की..”

“तुम्ही कधीपासून इतके कंजूस झाले??”

“कंजूस नाही गं, पण कशाला दिवसभर हवाय दिवा??”

“अहो अग्नी म्हणजे देवाचं मुख, घरात चैतन्य टिकून राहतं याने..”

“मग मी काय सांगतो ते ऐक, आम्हालाही वाटतं की तुझ्या चैतन्याचा, क्रियाशीलतेचा दिवा नेहमी तेवत असावा, आम्ही वेळोवेळी तो पेटवायचा प्रयत्न करतोच, पण मुळात त्यात आधी पुरेसं इंधन असणं महत्वाचं..आणि हे इंधन तुझ्या हातात आहे..

इतर कुणाचं पाहिलं की अगदी थेंबभर इंधन तुझ्यात तयार होतं अन काही क्षणात ते विझूनही जातं, 

थेंबभर तेलाने तुझा उत्साह अगदी क्षणभर टिकतो, हे इंधन म्हणजे तुझ्यातली इच्छाशक्ती, केवळ दुसरे करताय म्हणून आपणही करावं हा विचार न करता आपल्याला कार्यशील बनायचं आहे ही इच्छाशक्ती म्हणजे आपल्या आतलं इंधन..देवासमोर हीच प्रार्थना करतो की तुझ्यात हे इंधन सदैव तत्पर असावं ज्याने तुझ्या क्रियाशीलतेचा दिवा अखंड तेवत राहील..”

केतकीला जे समजायचं ते समजलं, आता आतून हे इंधन निर्माण करायचं काम तिने मनावर घेतलं..

Leave a Comment