त्यानेही पायमल्ली केली स्वप्नांची

 आज घरी जातांना घुंगरू घेऊनच जायचे असा निर्धार करत राघव झपाझप पावलं टाकत होता. घरी कडक शिस्तीचं वातावरण, मुलीलाही कधी नृत्य शिकू दिलं नाही अश्या घरात आपल्या बायकोचा हट्ट पूर्ण करायचा त्याने निर्धारच केला होता. 

घरी जाताच आईने पिशवी घेतली अन त्यात तिला घुंगरू दिसले, तिची तळपायाची आग मस्तकात गेली. 

“वाटलंच..तरी मी सांगत होते, ती मुलगी नाचगण्यात पारंगत आहे असं तिच्या घरचे म्हणताच मी नकार द्यायला लावलेला..पण तुम्हाला फार पुळका ना त्या लोकांचा, म्हणे लग्नानंतर नाचणं सोडून देईल, तुला चांगलंच पढवलं तुझ्या बायकोने. मला माहीतच होतं लग्नानंतर ही पोर हट्ट करेल म्हणून..पण तू बिचारा भोळा भाबडा, बायकोचं ऐकत बसलास..”

राघवला मान खाली घालून ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. राघव होताच मुळात मितभाषी, फार कमी बोलायचा. पण ही मितभाषी मंडळी फार कठीण असतात, वरवर वाटणाऱ्या शांत डोहाच्या तळाशी असंख्य वादळं घुमत असतात. 

कल्याणी आतून सगळं ऐकत होती, राघव खोलीत जाताच तिच्या अश्रुधारा सुरू झाल्या..

“मला माहित होतं हे असंच होणार, तिकडे आई वडिलांनी लवकर लग्न लावून दिलं.. आणि इकडे हे असं..बाईने स्वप्नच पाहू नये खरंच. उगाच ती मोडली की मरणयातना होतात. कॉलेजमध्ये असताना सर्वजण मला म्हणायचे, एक दिवस तू मोठी डान्सर होणार म्हणून, पण कसलं काय. आता कशाला आणलेत हे घुंगरू? काय उपयोग याचा? नुसतं तुम्हाला वाटून काय उपयोग? घरात सर्वांचा पाठिंबा नको? की मला फक्त उष्टी खरकटी काढायला आणलंय?”

कल्याणीने एका दमात सगळा राग बाहेर काढला. आज तिचा संताप अनावर झालेला, मितभाषी राघवने तिच्यासमोर फक्त घुंगरू ठेवले आणि निघून गेला. पण कल्यानीने मात्र ठरवलं, पंधरा दिवस माहेरी जायचं, कुणाचीही परवानगी न घेता. म्हणजे यांना माझा राग कळेल आणि माझी किंमतही. 

कल्याणी बॅग भरायला घेते,कपाटातून पंधरा दिवस पुरतील एवढे कपडे ती घेते. राघवने आणलेले घुंगरूही ठेवते. तिच्या काही जुन्या साड्या शोधत असतांना तिला राघवची एक जुनी फाईल दिसली. तिने कुतूहल म्हणून सहज पाहिलं तर त्यात राघवचे कॉलेजमधले फोटोज दिसले. राघव कॉलेजच्या क्रिकेट संघात होता. कर्णधार होता, राघवने याबाबत कधी सांगितलं नव्हतं. तिने पुढची पानं चाळली, त्यात राघवचं वर्तमानपत्रात नाव आलेली कात्रणं होती. आंतरशालेय, कॉलेजस्तरीय, विद्यापीठ स्तर, जिल्हा स्तर, राज्यस्तर अश्या सर्व संघात राघव पुढे गेलेला. ती कात्रणं दाखवत होती की राघव किती उत्तम क्रिकेट खेळत होता. एका बातमीत तर असं म्हटलेलं की राघवची रणजी संघात निवड झाली आहे. कल्याणीला धक्काच बसला. रणजी संघात? मग आज राघव कुठे असायला हवा होता? त्याने याबद्दल काही सांगितलं का नाही? आणि क्रिकेट सोडून एका लहानश्या प्रिंटिंग प्रेस मध्ये कामाला का जातोय? अनेक प्रश्नांनी कल्याणीला भंडावून सोडलं होतं. अखेर तिला लक्षात आलं, की सासूबाईंनी राघवला खेळापासून अडवलं होतं. आपल्या स्वप्नापासून दूर जायचं दुखं राघवला चांगलंच माहीत होतं, म्हणूनच त्याने मला घुंगरू आणून दिले होते. पण मी मात्र त्याला नको ते बोलले. चुकलंच माझं. स्वप्नांची पायमल्ली केवळ स्त्रियाच करतात असं नाही, कौटुंबिक जबाबदारीमुळे मुलांनाही कितीतरी स्वप्न बाजूला ठेवावी लागतात. 

कल्याणीने भरलेली बॅग पुन्हा रिकामी केली. राघवकडे गेली आणि त्याला सांगितलं..

“माफ करा मला, खूप जास्त बोलून गेले मी. तुम्ही काही बोलला नाही तरी मला सर्व समजलं आहे. आजपासून आपण खंबीर होऊया, एकमेकांसाठी..”

“म्हणजे??”

“तुम्ही क्रिकेट जॉईन करायचं..पुन्हा एकदा…तुमच्या नोकरीचा वेळ संपला की ग्राउंड वर जायचं. बाहेरची कामं मी बघेन. आणि सुट्टीच्या दिवशी तुम्ही मला नृत्याच्या क्लास ला सोडायला जायचं..”

राघवला क्रिकेटचं नाव ऐकून रडूच आलं. त्याच्यातला कोरडेपणा नाहीसा होऊन त्याच्यातला माणूस पुन्हा एकदा पल्लवित झाला होता. 

2 thoughts on “त्यानेही पायमल्ली केली स्वप्नांची”

Leave a Comment