तो एक प्रवास

 माधुरी घाईघाईने बसमध्ये चढली, आज जागा मिळते की नाही याच चिंतेत असतांना एका बाईशेजारी असलेली सीट रिकामी दिसली आणि माधुरी पटकन तिथे जाऊन बसली. जागा मिळाल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर होतं. शेजारी बसलेली महिला साधारण तिच्याच वयाची. माधुरीला बघुन तिने छानसं स्मितहास्य केलं. प्रवास मोठा होता, माधुरीला चांगली सोबत मिळाली होती.

शेजारी बसलेली स्त्री जरा चांगल्या घरातली दिसत होती, या वयातही स्लिम ट्रिम..पार्लर मध्ये जाऊन तुकतुकीत केलेली त्वचा..नितळ आणि कोमल हात..गाडी सुरू होताच माधुरीने स्वतःहून त्या स्त्रीशी बोलायला सुरुवात केली. 

“हॅलो मी माधुरी..”

“मी ईशा..कुठे राहता आपण?”

“गांधी भवन मागे..तुम्ही?”

“मी सांगलीला असते, इथे आई वडिलांना भेटायला आलेले..”

“अच्छा…नोकरी करता वाटतं आपण?”

“हो तर..”

“म्हणूनच इतक्या समाधानी दिसताय..”

ईशा हसायला लागली..

“माझा तर सगळा दिवस घरातलं आवरण्यातच जातो..”

“खरं तर माझाही पूर्ण दिवस बिझी असतो..”

“कशी सुरवात होते तुमच्या दिवसाची?”

“सकाळी उठले की साधारण दहा वाजेपर्यंत वर्कआऊट.. घाम येईपर्यंत व्यायाम करते. मग अंघोळ झाली की माझं डाएट फूड बनवते आणि ब्रेकफास्ट करते.त्यानंतर पुन्हा थोडं वर्कआऊट.. दुपारी थोडं वाचन, रोज संध्याकाळी walk, नंतर पुन्हा डाएट फूड..पुन्हा workout…”

“वा वा वा…काय लाईफ आहे तुमचं खरंच.. मला तर व्यायामाला सोडा, चहा घ्यायलाही उसंत नसते.त्यात स्वयंपाक बनवत बनवत अर्धा दिवस निघून जातो..दुपारी पडल्याशिवाय होत नाही, स्वतःसाठी असा वेळच मिळत नाही…पण एक मिनिट, तुम्ही तर म्हटल्या की तुम्ही जॉब करता, मग जॉब साठी केव्हा जाता??”

ती स्त्री हसायला लागली..

“अहो, तुम्ही आणि मी सारखंच काम करतो..मी गृहिणीचा जॉब करते..उठल्यापासून घराची साफसफाई, झाडू, फरशी म्हणजेच माझं workout.. डाएट फूड म्हणजे पौष्टिक जेवण बनवते, पुन्हा निघालेली भांडी वगैरे घासायचं workout.. दुपारी वाचन करते, कारण मुलं शाळेतून येतात तेव्हा मी जागी हवी ना..रोज संध्याकाळी किराणा, भाजीपाला, मुलांना क्लास ला सोडणं म्हणून चालणं होतंच.. मग संध्याकाळी पुन्हा स्वयंपाक आणि पुन्हा घरातली कामं.. म्हणजे माझं workout..”

दोघीही खळखळून हसायला लागल्या. त्या स्त्रीने मधुरीची चांगलीच विकेट घेतलेली. अरे ही तर आपल्याच कॅटेगरीतली म्हणून माधुरीही हसत होती… पण तो प्रवास तिला खूप काही शिकवून गेला… कष्ट कुणालाही चुकलेली नाहीत, फक्त त्याच्याकडे बघण्यासाग दृष्टिकोन मात्र सर्वांचा वेगळा होता. ईशा सारखा दृष्टिकोन असेल तर आयुष्य खूप सुखकर होईल, नाही का? 

1 thought on “तो एक प्रवास”

Leave a Comment