“तू देवीची भक्त होऊच शकत नाही”

 “अगं आज नवरात्रीचा दिवस, आजही उशिरा उठलीस??”

“आई ते रात्री उशिरापर्यंत खूप काम..”

“देवाधर्माचं नको काही…आजच्या दिवशी सुना मुली लवकर उठून सडा रांगोळी करतात, लवकर अंघोळ करून साडी नेसून पूजेची तयारी करतात…आणि हे बघा..”

गौरीला ओशाळल्यागत झालं, तिला स्वतःचीच लाज वाटू लागली..पण काय करणार, तिचं कामच असं होतं की रात्री अपरात्री केव्हाही मिटिंग साठी तयार व्हावं लागत असे…सासूबाईंच्या सततच्या कुरकुर मुळे तिने नोकरी सोडलेली, पण गौरी शांत बसणाऱ्यातली नव्हती, ती एक ग्राफिक डिझाइनर होती..कॉम्प्युटर वर वेगवेगळी सॉफ्टवेअर वापरून अनेक कंपन्यांसाठी तिने कामं केली होती. तिने घरूनच हे काम करण्याचं ठरवलं. तिला भरपूर प्रोजेक्ट आले, वेळ कमी पडू लागला. तिने हाताखाली 3 लोकं ठेवली, ही सगळी घरूनच काम करणारी होती. “Creative art” नावाची स्वतःची कंपनी चालू केली, व्याप वाढत होता, पण घरी तसूभरही याची माहिती नव्हती, कारण कुणाला जाणून घ्यायला रसही नव्हता. म्हणायला तिची स्वतःची कंपनी होती, पण सगळं virtually चालायचं, आणि सासूबाई मोठ्या दिमाखात सांगत, आमची सुनबाई घरीच असते…

गौरीने घाईघाईत आवरलं, कशीबशी पूजेला बसली..

“या आता,बसा…पूजा मांडा..”

“काय काय करू सांगा..”

“हो मीच सांगते, तुला कसलं काय येणारे..हा चौरंग ठेव, त्यावर लाल कापड टाक… अगं अगं ते नाही, ते धुवायला काढलं आणि तेच टाकतेस?? आता कलश ठेव, त्यावर पाच बोटे कुंकूने आख.. अगं अगं वरून खाली ओढायचा कुंकू, सगळा उलटा कारभार…”

गौरीला सगळं नवीन होतं, ती घाबरून गेली, त्यात सासूबाई अजून ओरडत…आता मात्र सासूबाईं चिडल्या..

“हो बाजूला…काय सून मिळाली, मला वाटलं सून आल्यावर काही करावं लागणार नाही, पण मेलं काम दुप्पट वाढलं माझं..आणि देवाचं काही करत नाही ही मुलगी, देवाची भक्तच झाली नाहीस तर कसं होणार तुझं? अगं जो देवाचं सगळं करतो ना तोच खरा भक्त असतो..”

गौरी रडकुंडीला आली, सासूबाईंनी पटापट पूजा आटोपली… गौरीने नमस्कार केला आणि घरातलं बाकीचं आवरायला घेतलं..

“आता ते राहूदे… माझ्यासोबत चल…देवी मंदिरात आज कार्यक्रम आहे…भक्तिगीतं, आरत्या आणि व्याख्यान आहे…आपल्या दोघींना निमंत्रण आहे…ती मालती म्हणाली, गौरीला घेऊनच या म्हणून..”

गौरीने मान डोलावली, रात्रीच्या जागरणाने तिला भूक लागली होती..पण आता काही खाल्लं तर उपास करत नाही म्हणून पुन्हा बोलणी खावी लागतील, म्हणून ती गप बसली..

दोघींजनी कार्यक्रमाला गेल्या, तिथे गायन, भजन चालू होतं… गौरीला खरं तर खूप कंटाळा येत होता..सासूबाई तिच्याकडे बघून हात जोड म्हणून खुणावत होत्या..

काही वेळाने मालती स्टेजवर आली आणि तिने बोलायला सुरुवात केली…

“आज नवरात्रीचा पहिला दिवस, देवीच्या 9 रुपांची आपण नवरात्रीत पूजा करतो, देवीच्या तत्वांना आपण पूजतो..पण खऱ्या आयुष्यातही अश्या काही महिला आहेत ज्या पूजनीय आहेत, ज्यांचं काम उल्लेखनीय आहे आणि इतर स्त्रियांना त्यांनी आदर्श घालून दिलेला आहे….आपण अश्याच नवदुर्गांना आज प्रणाम करून त्यांचा सत्कार करणार आहोत..”

मालतीने एकेकीची नावं घ्यायला सुरवात केली,

“सर्वप्रथम आपण बोलावणार आहोत सुमतीताई बल्लाळ यांना…वयाची पन्नाशी ओलांडल्या नंतर त्यांनी गृहोद्योगाची कल्पना साकारली अन ती यशस्वी केली…”

“आपल्या दुसऱ्या नवदुर्गा आहेत रश्मी देसाई…समाजसेवेचं व्रत त्यांनी उचललं आणि हजारो कुटुंबांना आधार दिला. “

रश्मीला हा कार्यक्रम फार आवडला, यशस्वी आणि प्रेरणादायी महिलांचा सत्कार करण्याची कल्पना तिला खूप भावली…
सासूबाई म्हणाल्या,

“बघा…अश्या असतात बायका..घरदार सांभाळून एवढं सगळं केलं यांनी…आम्हाला फक्त झोपा काढायला सांगा.”

गौरीने मोठ्या प्रश्नार्थक नजरेने सासूबाईंकडे पाहिलं, नोकरी साठी नकारघंटा वाजवणाऱ्यात त्या सर्वात पुढे होत्या, आणि कर्तबगार महिलांसमोर गौरीला आज त्याच हिणवत होत्या…

“आपल्या नवव्या नवदुर्गा आहे…सौ. गौरी पठाडे….अत्यंत मेहनतीने creative arts नावाची virtual कंपनी काढून देशा विदेशातून त्यांनी काम मिळवून कौतुक संपादन केलं आहे…मी विनंती करते, creative arts च्या सर्वेसर्वा यांनी मंचावर येऊन नवदुर्गा अवॉर्ड स्वीकारावा..”

गौरीसाठी हा खूप मोठा धक्का होता…आणि सासूबाईंची तर बोबडीच वळली होती..गौरीने अवॉर्ड घेतला, आणि हळूच मालतीचे जाता जाता आभार मानले ..

घरी जाईपर्यंत सासूबाई एकदम चिडीचूप होत्या..काय बोलावं त्यांना काही कळेना…गौरीने अवॉर्ड ट्रॉफी हॉल मध्ये ठेवली आणि खोलीत गेली..

काय बोलणार त्या…जिला आपण देवाचं काही करत नाही, तू देवाची भक्त होऊच शकत नाही म्हणून हिणवत होतो ..आज तिलाच खुद्द देवीच्या पंक्तीत स्थान मिळालं होतं…

काही वेळाने गौरी देवघरात आली, तिला खुदकन हसू आलं..कारण हॉल मध्ये ठेवलेली ट्रॉफी कुणीतरी घटाच्या बाजूला ठेवली होती…

2 thoughts on ““तू देवीची भक्त होऊच शकत नाही””

  1. तुमची कथा खूप आवडली मला माझ्या यूट्यूब चैनल नाही त्यावर वाचायची इच्छा आहे तुमच्या नावानिशी आपली परवानगी असेल तर जरूर कळवा

    Reply

Leave a Comment