“आई चल ना उशीर होतोय..”
“किती रे घाई तुला? नवरदेव गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहे. मी तर म्हणते तिथेच माळा टाकून घ्या अन येतांना तिला गाडीतच घेऊन येऊ, काय!”
“मस्त आयडिया आहे. मी शेरवानी घालू का?”
“चल गपचूप, अरे कधी मोठा होणारेस तू, मुलगी पाहायला जातोय आपण, त्या लोकांना तू सोज्वळ, समजूतदार आणि शांत वाटायला हवा”
“जो मी नाहीच तो कशाला वाटून द्यायचं?
जाऊदे, मी कसा दिसतोय?”
“छान दिसतोय, चल आता”
सूरज लग्नासाठी मुलगी पाहायला जात होता. आत्तापर्यंत बऱ्याच मुली बघायला गेलेला, खरं तर त्याला लग्नाच्या बाबतीत अजिबात गांभीर्य नव्हतं, सूरज म्हणजे कॉलेजचा बॅड बॉय कॅटेगरीत मोडलेला. कट्टयावर बसून टिंगल टवाळी करणं, मजा करणं, प्रोफेसर च्या नाकी नऊ आणणं हे त्याचे छंद. पण परीक्षेत मात्र नेहमी टॉप असल्या कारणाने त्याची सगळी पापं धुतली जायची. इतकं असूनही कधी कुना मुलीच्या नादी लागायचा नाही, अर्थात मुली त्याला प्रेमपत्र पाठवत ते वेगळं. सूरज चांगल्या कंपनीत चांगल्या पोस्टवर रुजू झाला. लग्नाचं वय झालं पण अजूनही तो बॅड बॉयच होता. मुलगी पाहायला गेल्यावर काहीतरी आगाऊपणा करणं, मुलीशी बोलायला पाठवल्यावर तिला बोलून बोलून हैराण करणं त्याला आवडायचं. आणि सगळं करून “मला मुलगी आवडली नाही” असं तोंडावर सांगून तो मोकळा व्हायचा. त्याच्या लेखी हा सगळा नुसता टाईमपास होता, आई वडिलांच्या हट्टापायी निदान तो मुलगी पाहायला तरी जायचा तेवढं नशीब.
सुरजची लग्नाबाबतची कल्पना वेगळी होती, लग्न झालं म्हणजे मर्यादा आल्या, जबाबदारी आली..त्याला ते नकोच होतं.
आयुष्यभर स्वतंत्र पक्षी बनून त्याला उडायचं होतं. त्यामुळे जी मुलगी त्याला कसलीच आडकाठी करणार नाही अशी मुलगी त्याला हवी होती.
तिकडे कोमलच्या घरी अगदी थंडपणे सगळी तयारी चाललेली. कोमल एका शेतकऱ्याची मुलगी. दिसायला सुंदर, नाजूक, गव्हाळ रंग. शिकण्यासाठी ती शहरात आलेली आणि आपलं इंजिनिअरिंग तिने पूर्ण केलं. त्याच शहरात एक छोटीशी नोकरी करून घराला हातभार लावत होती. वडिलांचा अभिमान आणि आईचं काळीज होती ती. मुलगी असून मुलाप्रमाणे सर्व जबाबदाऱ्या पार पाडत होती. पाठीशी दोन बहिणी होत्या, त्यांचं शिक्षण, त्यांची लग्न, वडिलांचं कर्ज या सगळ्याचा विचार ती करत असायची. सतत गंभीर असायची, घराच्या काळजीपोटी आयुष्याचा कुठलाच आनंद ती घेत नसायची. तिला मुळात लग्नच करायचं नव्हतं.
आई वडिलांसोबत राहून घराला तिला हातभार लावायचा होता. पण आई वडील कसले ऐकणार, त्यांनी तिला समजावून मुलं बघायला सुरवात केलेली. पण तिन्ही मुली, त्यांची जबाबदारी ही घेणार, पैसेही माहेरी देणार, वडील साधे शेतकरी असल्याने काही देऊ शकणार नाहीत अश्या नानाविध कारणांनी त्यांनी अनेक नकार पचवले होते. अश्यात आई वडिलांना जास्त चिंता वाटू लागली. जवळपास दहा नकार पचवल्यानंतर बघण्याचा कार्यक्रम म्हणजे त्यांना ओझं वाटू लागलेला. आई शांततेत पोहे बनवत होती.
“आता त्यांचा पाहुणचार करायचा, उदो उदो करायचा आणि खाऊन पिऊन उद्या ही लोकं नकार कळवणार… नुकसान मात्र आमचंच होणार .”
आई चिडचिड करत होती, पण आईला माहीत नव्हतं की कोमल हे सगळं ऐकतेय. कोमलला खूप वाईट वाटलं. मुली ओझं असतात असं म्हणतात ते काही खोटं नाही असं तिला वाटू लागलं. बस्स, तिने ठरवलं..आता काहीही झालं तरी माझ्या लग्नाचं ओझं आई बाबांवर टाकायचं नाही. मुलं नकार देताय बघून तेही नाद सोडून देतील. आणि समजा आज येणारा मुलगा होकार देईल असं वाटलंच तर त्याला सरळ सरळ आपणच एकट्यात बोलायला सांगतील तेव्हा नकार देऊन टाकायचा.
सूरज आणि त्याचे आई वडील घरापाशी आले. खेडेगावातील एक छोटंसं घर, अंगणात गायी म्हशी बांधलेल्या, आजूबाजूला शेती, जवळच एक विहीर असं सगळं वातावरण. सुरजला मित्राचा फोन येतो..
“सुऱ्या कुठं मरायला गेलाय?”
“मुलगी पाहायला आलोय..”
समोरून मोठमोठ्याने हसण्याचा आवाज.
“गाव की छोरी…हम्म..लगे रहो लगे रहो..अबे ओ, लाजला की काय?”
“फोन ठेव मा***”
आई सुरजकडे बघून डोळे वाटरते तेव्हा तो गप होतो. घराकडे जायला लागणार तोच वाटेतली गाय शेपटी वर करून अगदी आरामात सूरज समोर शेणाचा प्रसाद टाकते..
“आई गं.. उई…”
सूरजच्या बुटावर शेण पडतं..आई बाबा हसायला लागतात..
“काय छान स्वागत झालं बघ तुझं..”
कोमलचे वडील लगबगीने बाहेर येतात,
“माफ करा हा…तुमचे बूट खराब झालेत..आना मी पुसून देतो .”
असं म्हणत कोमलच्या वडिलांनी एक कपडा घेतला अन ते सुरजचे बूट साफ करायला लागले. कोमल खिडकीतून बघत होती, तिचा प्रचंड संताप झाला.. ती बाहेर येऊन काही बोलणार तोच सूरज वडिलांना म्हणाला..
“अहो हे काय करताय? मुकं जनावर ते, त्याला काय कळणार.. आणि तुम्ही माझ्या वडिलांच्या जागी आहात, माझ्या बुटाला हात लावलात तर हे पाप कुठं फेडू मी?”
सूरजच्या या वागण्याने वडिलांना बरं वाटतं. हाच मुलगा कोमल साठी योग्य असेल असं त्यांना वाटतं. कोमलचा राग शांत होतो. सर्वजण घराकडे जायला निघतात, सर्वजण पुढे चालत असतात आणि सूरज सर्वांच्या मागे. कोमल खिडकीतून बघत असते. सूरज पुढे जातो अन एकदम थांबून, कमरेत वाक देऊन मागे झुकतो अन बेडरूमच्या खिडकीकडे बघतो… कोमल दचकते, सुरज हळूच तिला डोळा मारतो. कोमल रागारागाने पडदा ओढते आणि त्याला शिव्या देऊ लागते….
“आगाऊ कुठचा…आपण कुठे आलोय, कसं वागायला हवं काही भान आहे की नाही? अश्या मुलाशी लग्न? निघ…”
क्रमशः
Khup Chan
Mast interesting
Nice start…. Mat age story
Full strory ekdam mast and chan climax, friendship, relationship.. Sarv goshti perfect.. Maja ali vachtana..