तुही है आशिकी (भाग 9)

 

कोमलचे वडील अभिनवला फोन करून नकार कळवतात. अभिनव संतापात फोन ठेऊन देतो, अभिनव आणि त्याच्या डिमांड पासून एकदाची सुटका झाली म्हणून वडील निर्धास्त होतात. सूरज काही मागणार नाही याची त्यांना खात्री असते. 

सूरज आणि कोमल दोघांच्या घरचे एकत्र येतात आणि पुढची बोलणी करतात. मुलांच्या हट्टाप्रमाणे पाच वर्षे दोघेही एकत्र राहणार नसतात. त्यामुळे आता लग्न उरकून पाच वर्षांनी कोमल सुरजच्या घरी जाणार होती. घरच्यांना हे पचवणं अवघड असलं तरी मुलांच्या हट्टापायी त्यांना मान्य करावं लागलं. कोमलचे वडील सुरजला विचारतात..

 

“सूरजराव, तुमची काही मागणी असेल तर कळवा आम्हाला..”

 

सुरजचे आई वडील पुढे येऊन म्हणतात,

 

“अहो नाही नाही, आम्हाला कसलीही अपेक्षा नाही…तुमची सोन्यासारखी मुलगी आम्हाला देताय याहून जास्त काय हवं?”

 

अपेक्षेप्रमाणे सुरजच्या घरचे काहीही मागणी करत नाहीत. सूरज मात्र वेगळंच बोलायला लागतो..

 

“असं कसं काही नको म्हणून? मला हवं आहे..मला पाच लाख रुपये हवेत..”

 

“सूरज अरे काय बोलतोय तू? डोकं ठिकाणावर आहे ना?”

 

सुरजची आई बोलते..

 

“हो आई, पाच लाख रूपये हवेत मला…त्याशिवाय हे लग्न होणार नाही..सांगा लवकर नाहीतर निघतो आम्ही..”

 

कोमलचे वडील हतबल होतात, पण अभिनवने मागितलेल्या रकमेपेक्षा ही नक्कीच कमी आहे असा विचार करून कोमलचे वडील आत जाऊन पैसे घेऊन येतात. कोमलचा संताप झालेला असतो..वडील त्याच्या हातात पैसे देत होते.. कोमल तावातावात पुढे येऊन सुरजला बोलणार तोच सूरज पैसे हातात घेत म्हणाला..

 

“पूर्ण आहेत ना?”

 

“हो..कोमलच्या लग्नासाठी काढून ठेवले होते.. आता हे तुम्ही घ्या, लग्नाच्या खर्चासाठी वेगळी सोय करेन मी.”

 

सूरज हसायला लागला, 

 

“तुम्हाला काय वाटलं? मी हे हुंडा म्हणून मागतोय? नाही…मला माहितीये मुलीच्या लग्नासाठी बाप पाण्यासारखा पैसा ओततो.. तेवढा पैसा शिक्षणासाठी वापरत नाही. मी आजच कोमलच्या दोन्ही बहिणीचं चांगल्या कॉलेजमध्ये चांगल्या डिग्री साठी ऍडमिशन घ्यायला जाणार आहे..त्यासाठी हे पैसे. आणि राहिला प्रश्न लग्नाचा तर लग्नाचा सगळा खर्च आम्ही करणार.. हे ठरलं..”

 

कोमलचे पाय जागीच थबकतात. कोण कुठून हा देवदूत भेटला? ज्याने माझ्यावरच नाही तर माझ्या कुटुंबावरही तितकंच प्रेम केलं..माझ्या बहिणींच्या भविष्याचा विचार करतोय हा..नाहीतर अभिनव…. 

 

दुसऱ्या दिवशी कोमल, तिच्या दोन्ही बहिणी आणि परेश शहरात मोठ्या कॉलेजमध्ये बहिणींच्या ऍडमिशन साठी जातात. सूरज पुढे होऊन सर्व प्रोसिजर पूर्ण करतो. ऍडमिशन झाल्यानंतर सर्वजण कॅन्टीन मध्ये नाष्टा करायला जातात. दोघी बहिणी दुसऱ्या टेबलवर बसतात.कोमल सुरजला विचारते..

 

“का करतोय इतकं सगळं?”

 

“काय केलं मी?”

 

“माझ्या बहिणींसाठी तू पैसे मागितले आणि त्यांचं ऍडमिशन घेऊन दिलंस?”

 

“कोमल तुला एक सांगू? मी कॉलेजला होतो ना तेव्हा माझ्यासोबत खूप मुली शिकत होत्या, खूप हुशार होत्या, चांगलं शिकून खूप मोठ्या झाल्या. तुझ्या बहिणींना बघून मलाही वाटू लागलं की यांचं भविष्यही तसंच असावं..आणि आता आपलं लग्न होणार मग तुझी काळजी ती माझी काळजी..”

 

कोमलला ऐकून खूप बरं वाटतं. तिच्या जबाबदारीत वाटा उचलणारा साथीदार तिला मिळाला होता.

 

“पाच वर्षे आपण दूर राहू, तुला जमेल ना?”

 

“तसं तर अवघड आहे, पण कोमल…तुझ्याशिवाय माझा साथीदार दुसऱ्या कुणाला मी बघूच शकत नाही..त्यासाठी मी पाच वर्षही थांबायला तयार आहे..”

कोमल गालातल्या गालात हसते, नाश्ता होताच सर्वजण निघतात. सुरजने त्याची कार पार्किंग मध्ये पार्क केलेली असते, या तिघी बहिणींना तो एका ठिकाणी थांबायला लावतो आणि गाडी घेऊन येतो असं म्हणतो. तिघीजणी उभ्या असताना काही टवाळ मुलं कोमलच्या बहिणींपाशी येऊन त्यांची छेड काढतात. कोमल बहिणींना सांगते की लक्ष देऊ नका. पण बहिणी घाबरलेल्या बघून मुलं अजून चवताळतात. कोमलला शहर आणि इथल्या माणसांचा अनुभव असल्याने ती त्वेषाने पुढे जाऊन त्या मुलांना बोलू लागते..

 

“काय रे? लाज नाही वाटत मुलींची छेड काढायला?”

 

“नाही ब्वा…”

 

“इथून निघा नाहीतर..”

 

कोमलचा संताप अनावर होतो..मुलंही चवताळतात..

 

“नाहीतर काय? आं? आम्हाला मारशील? आरशात तोंड पाहिलंय का?”

 

कोमल खाडकन एकाच्या गालात ठेऊन देते आणि मुलं संतापतात. एक मुलगा पुढे येऊन कोमल वर हात उचलायला जातो, कोमल त्याचा हात पकडून पिरगळते आणि तो ओरडायला लागतो. मग दुसरा मुलगा येऊन कोमलचा हात पकडतो, दोघांना प्रतिकार करणं एकट्या कोमलला शक्य नसतं, दोघी बहिणी प्रयत्न करतात पण मुलं जुमानत नाहीत. एवढ्यात मागून दोन्ही मुलांच्या डोक्यात एक बुक्का बसतो आणि मुलं जागीच कोसळतात. सूरज संतापात दोन्ही मुलांना नुसता तुडवायला लागतो. सुरजला आवर घालणं कठीण होऊन बसतं. शेवटी दोन्ही मुलं पळून जातात. सूरज कोमलच्या बहिणींजवळ जातो..

 

“इथे शहरात जशी तुमची प्रगती होईल तसंच अश्या नीच माणसांचा सामनाही तुम्हाला करावा लागेल..तुमच्या बहिणीने प्रतिकार केला तसाच तुम्ही करायला हवा होता..दरवेळी मी नसेन इथे…”

 

सूरज बोलत होता आणि कोमलला तिच्या वडिलांनी आठवण झाली..काहीही संकट आलं की बाबा नेहमी म्हणायचे..

 

“प्रत्येकवेळी मी नसेन इथे, तुम्हाला प्रतिकार करणं शिकावं लागेल..”

 

सूरज फक्त कोमलचा होणारा नवरा नव्हता, तिच्या घरच्या माणसांनाही त्याने आपलं मानलं होतं. सर्वजण घरी जातात. सूरज कोमल आणि तिच्या बहिणींना घरी सोडतो. सर्वांचा निरोप घेऊन तो तिथून निघतो. कोमलचे वडील बहिणींनी आणलेली फाईल चाळत बसतात. ऍडमिशन कुठे कसं घेतलं हे बघतात. 

 

“बाबा, जीजू खूप भारी आहेत..बघा ना एवढा विचार आजकाल कुणी करतं का..”

 

“खरंच, त्याला नकार दिला असता तर आयुष्यभर पस्तावलो असतो आम्ही..”

 

बाबा फाईल बघून एकदम दचकतात..

 

“हे काय?”

 

“काय झालं बाबा?”

 

“ऍडमिशन घ्यायला आत कोण गेलेलं?”

 

“जिजूंनीच केलं सगळं..”

 

“अगं… ही दोघींच्या फिज ची रिसीट.. एकीची फी साडेतीन लाख आहे..म्हणजे दोघींची मिळून 7 लाख..मी तर फक्त पाच लाख दिलेले..”

 

“म्हणजे…बाकीची रक्कम..”

 

“म्हणून जीजू आम्हाला आत येऊ देत नव्हते..”

 

“मला कसतरी वाटतंय, त्यांना पैसे भरावे लागले..त्यांनी सांगायचं तरी..”

 

कोमलला हे ऐकून पुन्हा धक्का बसतो, सूरजबद्दल असलेला तिचा आदर आणखी वाढतो. पण तीही स्वाभिमानी असते..सुरजला पैशांबद्दल विचारते.

 

“सूरज, हे जास्तीचे 2 लाख रुपये कशासाठी भरले?? आम्ही ते परत करतो तुला..तुझ्याकडून घ्यायला आम्हाला चांगलं वाटत नाही..येऊन घेऊन जा, उधारी ठेवत नाही आम्ही..”

 

“ते पैसे तुझेच आहेत..”

 

“माझे?”

 

“हो..मला परत नकोय पैसे…ते तुझेच आहेत..”

 

“अरे काय तुझेच आहेत तुझेच आहेत..माझे कसे असतील बरं?”

 

“मला सांग, जर लग्न करून तू इकडे आली असतीस तर..पाच वर्षात वर्षाला किती सण आले असते..”

 

“महत्वाचे असे 5-6 सण..”

 

“म्हणजे पाच वर्षात?”

 

“30 वेळा..”

 

“प्रत्येक सणाला मी तुला साडी घेतली असती..बरोबर?”

 

“घेतली असती?”

 

“हो मग..आमच्याकडे असतं तसं.”

 

“बरं.. मग?”

 

“म्हणजे सात हजाराची एक साडी असे पाच वर्षात 2 लाख 10 हजार होतात. पण तू तर पाच वर्षे नाहीये इथे.  ते पैसे तू वाचवले ना माझे..उरलेले 10 हजार येतो मी दयायला..”

 

“उरलेले?”

 

“होना…मी कुणाची उधारी ठेवत नाही..”

 

कोमल चक्रावून जाते..सूरजचं लॉजिक खरंच जगावेगळं असतं..

 

_______

 

“हॅलो पऱ्या..”

 

“ए..ए.. ए..सूरज..हे बघ तुझं लग्न जमलं, तुला होकार मिळाला…आता नवीन काही काढू नकोस..”

 

“नाही रे पऱ्या… तुला पार्टी द्यायची राहिलीये..”

 

“मग ठिके..”

 

“सहा वाजलेत, तुला मोठ्या हॉटेल मध्ये डिनर पार्टी देतो चल..मेसेज करतो तिथे ये..”

 

परेश आणि सूरज एका रेस्टॉरंट मध्ये पोचतात. सूरज परेशच्या हातात मेनू कार्ड देऊन म्हणतो..

 

“आज तू जे म्हणशील, जितकं म्हणशील तेवढं ऑर्डर कर..”

 

परेश काही आवडीचे पदार्थ ऑर्डर करतो. वेटर एकेक पदार्थ घेऊज येतो. परेश चं आवडतं सूप समोर असतं, परेश पहिला घोट चमच्याने घेणार तोच सूरज म्हणतो..

 

“पऱ्या ऐक ना..”

 

परेश चमचा तोंडाजवळच थांबवतो, अलगद खाली ठेवतो..

 

“तेच म्हटलं सुऱ्या इतक्या सहजासहजी पार्टी कशी देतोय..काहीतरी काम असेल तुझं, होना?”

 

“अरे छोटंसं काम आहे..तू जेव की..”

 

परेश घाबरत घाबरत जेऊ लागतो. सूरज एकेक सांगायला सुरुवात करतो..

 

“Valentines डे जवळ येतोय..मला कोमलला काहीतरी भन्नाट द्यायचं आहे..ते मुव्ही मध्ये खोटं खोटं सांगतात पण मला प्रत्यक्षात द्यायचं आहे..काहीतरी जुगाड करून.. पऱ्या, अरे माझ्याकडे बघ ना..”

 

परेशला माहीत असतं की अशक्य अशी काहीतरी गोष्ट करायला हा सांगेन, म्हणून परेश धक्का बसण्याआधीच पटापट खाऊन घेतो. जेवण झाल्यावर पाणी पीत पीत परेश विचारतो..

 

“काय मदत हवीय..”

 

“तिला ना मला एक गिफ्ट द्यायचं आहे..”

 

“काय आणायचं सांग, आणून देतो..”

 

“ते इतकं सहजासहजी मिळत नाही..”

 

“असं काय आहे ते?”

 

“ते चित्रपटातले हिरो हिरोईनला फक्त आश्वासन देतात, पण आणून देत नाही..”

 

“अरे काय ए असं?”

 

सूरज ओठ मिटवून हसतो, आणि वर बघतो.. परेशही वर बघतो.

 

“वर काय बघतोय? काय द्यायचं आहे? लायटिंग? लॅम्प?”

 

“नो..”

 

सूरज वरच बघत असतो..परेश सर्व शक्यता सांगून बघतो पण नाही…

 

परेश एकदम घामेघुम होऊन परेशवर ओरडतो..

 

“चंद्र???????”

 

क्रमशः

पुढील भाग

 

 

4 thoughts on “तुही है आशिकी (भाग 9)”

Leave a Comment