तुही है आशिकी (भाग 7)

 

 

सूरजला तिचं लॉजिक काही पटत नाही. 

 

“केवळ या कारणासाठी तू त्याला हो म्हणालीस?”

 

“हो, माझ्यासाठी याक्षणी हे सगळं महत्वाचं आहे..”

 

“पण पुढे काय? पाच वर्ष तुझं घर तर मार्गी लागेल..पण उरलेलं आयुष्य कसा संसार करशील त्या मुलासोबत? त्याला त्याच्या कुटुंबापेक्षा करियर जास्त महत्वाचं आहे असंच दिसतंय..”

 

“माणसं बदलतात, आणि इतका पुढचा विचार मी केलेला नाही..”

 

“तू फक्त दुसऱ्याचा विचार केला आहेस, पण मला तुझी काळजी वाटते..”

 

“काय कारण माझी काळजी करण्याचं? तुला आम्ही नकार दिला तिथेच विषय सम्पला आहे..”

 

“विषय तिथेच संपत नाही, तिथून सुरू होतो..”

 

“म्हणायचं काय आहे तुला?”

 

“कोमल…i love you.. आजवर एकाही मुलीकडे मला बघू सुद्धा वाटलं नाही पण तुझ्यासाठी माझा जीव ओवाळून टाकायला मी तयार आहे..”

 

सूरज पोटतिडकीने सगळं बोलून टाकतो. दोघांत कितीतरी वेळ शांतता असते. कोमलही काही क्षण हुरळून जाते. आयुष्यात पहिल्यांदा तिला कुणीतरी प्रेम करणारं, तिची काळजी करणारं मिळालं होतं. पण तिचा निर्णय पक्का होता. तिला फक्त पुढील पाच वर्षे दिसत होती. 

 

“सॉरी सुरज, पण माझा निर्णय झाला आहे..”

 

“ऐक ना.. तुझं मला नाकारायचं कारण वेगळं आहे..पण खरं खरं सांग, तुला मी आवडलोय की नाही?”

 

कोमल गप असते..काहीही बोलत नाही..

 

“बोल ना..तेवढं एक सांग फक्त..मग मी निघून जाईन..”

 

कोमलच्या मनात काहूर माजतं. तिला आठवतो पहिल्या भेटीतला सूरज..आपल्या बहिणींकडे शुद्ध आणि प्रेमळ नजरेने बघत गमती करणारा..आगाऊ, पण तितकाच हळवा.. माझ्या वडिलांना त्याचे पाय धरू न देणारा…खिडकीतून वळत हळूच डोळा मारणारा..स्वच्छंद तरी जबाबदार.. मिश्किल तरी हळवा.. आपल्या प्रेमापोटी हा बहिणीची व्यवस्था करून आला..”

 

विचारानेच कोमलला हसू आवरलं नाही..ती मोठमोठ्याने हसू लागली. सूरज गोंधळला, आपण इतकं गंभीर बोलत असताना ही का हसतेय?

 

बाहेर वडील मात्र चिंतेत असतात, का बरं हा सूरज आला असेल? काय सांगायचं असेल त्याला? आत आई आणि बहिणींना आनंद होतो..

 

“आई, ताईचं मन वळायला हवं आणि ताईने होकार द्यायला हवा..”

 

“खरंच गं…माझी तर खूप इच्छा आहे..”

 

कोमलला सूरज आवडला असला तरी प्रेमापेक्षा तिला जबाबदारी खुणावत होती. 

 

“सूरज, सॉरी माझा निर्णय पक्का आहे..”

 

“आणि जर मी तुला पाच वर्षे दिली तर?”

 

“म्हणजे?”

 

“म्हणजे त्या मुलासारखंच मीही तुला पाच वर्षे माहेरी राहू दिलं लग्न झाल्यावर, तर चालेल?”

 

“आता म्हणायला सोपं आहे, पण उद्या लग्न झालं आणि तू हा सौदा विसरला तर? तू तुझ्या सासरीच हवी..तुझी जबाबदारी आहे वगैरे म्हणायला लागलास तर?”

 

“नाही म्हणणार, तुझ्यासाठी मी पाच वर्षे वाट पाहायला तयार आहे..”

 

“बघ हा..आपल्यात नवरा बायको सारखं काहीही नसेल..कारण एकदा का आपल्याला एकमेकांची सवय झाली तर मला माझ्या जबाबदारीत व्यत्यय येऊ शकेल..”

 

“चालेल..तू फक्त हो म्हण..”

 

“ठीक आहे..”

 

“म्हणजे होकार ना?”

 

“ठीक आहे म्हणजे..मी बाबांशी बोलते एकदा..”

 

“बरं बोल आणि सांग मला..”

 

“लगेच नाही, मला एक दिवस दे.”

 

“ठीक आहे बाई घे…एक अख्खा दिवस घे..”

 

कोमल सुरजच्या उतावीळ चेहऱ्याकडे बघते आणि लाजून विचारते..

 

“खरंच इतकं काय आहे माझ्यात की तू माझ्यासाठी इतकं करायला तयार होतोय?”

 

“म्हणजे तुला स्वतःचं कौतुक ऐकायचं आहे तर..”

 

“नकार आहे माझा…जा घरी..”

 

“सॉरी सॉरी..अगं तुपण काय अशी करतेय..तुझ्यासाठी मी नकार ऐकूनही परत आलोय यावरून समजून घे ना..मला नाही व्यक्त करता येत प्रेम एखाद्या हिरो सारखं..”

 

“ठिके जा तू, उद्या माझा निर्णय कळवते मी..”

 

सूरज तिथून निघून जातो. जाता जाता कोमलच्या वडिलांना नमस्कार करतो. वडील कोमलजवळ येउन विचारतात..

 

“काय म्हणत होता गं तो?”

 

“बाबा त्याला माझ्याशीच लग्न करायचं आहे..”

 

“बघ कोमल परत विचार कर त्याचा, खरं तर मला आधी अमेरिकेतला मुलगाच आवडलेला, पण..”

 

“पण काय बाबा?”

 

“पण..म्हणजे…हा चांगला आहे..काय करतेस बोल..”

 

“मी एक दिवस मागितला आहे..विचार करते मी..आणि हो, त्यानेही मला पाच वर्षे माहेरी राहायची परवानगी दिलीये..”

 

“माहेरी? का? त्या अमेरिकेतल्या मुलाचं ठीक होतं पण याने का असं केलं?”

 

“बाबा…तुम्ही तो विचार करू नका..मी उद्या माझा निर्णय कळवते..”

 

बाबा आईला जाऊन सांगतात. आईच्या लक्षात येतं की पाच वर्षे कोमलला का हवी आहेत ते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जो मुलगा आपल्या मुलीसाठी पाच वर्षे थांबायला तयार आहे त्याचं किती प्रेम असेल आपल्या मुलीवर..

 

कोमल त्या रात्री खूप विचार करते. खरं तर मनोमन तिला वाटत होतं की सूरज सोबत लग्न करावं. तिला भीती फक्त याची होती की पाच वर्षात सुरजने हा करार मोडायला नको..तेवढ्यात तिच्या फोनची रिंग वाजते. अमेरिकेतल्या मुलाचा मेसेज होता.

 

“Hi.. काय करतेस..”

 

“झोपायची तयारी..”

 

“बरं मला सांग तुला किती पगार असतो?”

 

“20 हजार..”

 

“मला अर्जंट पाच हजार हवेत..”

 

कोमलला धक्काच बसतो. ती रिप्लाय देत नाही. तेवढ्यात सूरज चा मेसेज.

 

“Hi…झाला का विचार?”

 

“नाही अजून…तू नाही विचारणार का माझा पगार?”

 

“पगार? काय संबंध?”

 

“नाही म्हणजे उद्या म्हणशील, आता तू या घरातली आहेस, त्यामुळे पगारावर त्या घराचा हक्क आहे वगैरे..”

 

“चल गं.. देवाच्या कृपेने सगळं आहे आमच्याकडे. तुला पगार कमावण्याच्या लायक बनवणाऱ्या तुझ्या आई वडिलांचा त्यावर हक्क आहे..”

 

कोमलच्या चेहऱ्यावर नकळत हसू फुटतं. तिचा निर्णय ठरतो.. ती सुरजला मेसेज करते..

 

“उद्या येऊन भेट, माझा निर्णय झालाय..”

 

“काय?? ए सांग ना आत्ताच..प्लिज..”

 

“नाही..उद्या पर्यंत वाट पाहावी लागेल तुला..”

 

क्रमशः

 

 

3 thoughts on “तुही है आशिकी (भाग 7)”

Leave a Comment