तुही है आशिकी (भाग 5)

भाग

 

 

 “सूरज? परेश बोलतोय ते खरं आहे का? तुला कोमल पसंत आहे ना?”

 

“सुरज गोंधळून जातो..”

 

“काका अहो मी सांगतो ना, मित्राला सांगितलं त्याने मनातलं..”

 

परेश डोळे मिचकावत सुरजकडे बघतो, सुरजला होकार द्यायचं धाडस जसं झालं नाही तसंच परेशला गप करण्याचंही धाडस झालं नाही, मनातल्या मनात सूरज खुश होता. सुरजच्या आईचा जीव भांड्यात पडला. एक तर हा मुलगा एकावर एक मुली नाकारत होता, अखेर एक पसंत केलीच तर..

 

___

 

“अहो ऐका माझं, नका त्या अभिनवच्या मागे लागु, खूप संशयास्पद माणसं वाटत होती ती..”

 

“अमेरिकेत राहिलेली माणसं ती, त्यांचं वागणं बोलणं आपल्यासारख्या गावठी माणसांना विचित्रच वाटणार..मला अभिनव पसंत आहे..”

 

“त्यापेक्षा सूरज काय वाईट आहे?”

 

“मी कुठे म्हटलो की तो वाईट आहे?”

 

“पण मग तो का नाही?”

 

“कारण अभिनव त्याच्या वरचढ आहे असं मला वाटतं ..”

 

भाऊसाहेब: “एक मिनिट, तुम्ही का वाद घालताय काही कळत नाहीये, एक तर अजून दोघांचा निरोप यायचा बाकी आहे, परवा दोघांचा निरोप येईल, आला तर उद्याच येईल..पण आपण असं गृहीत का धरतोय की दोघांचा होकार आहे म्हणून? देव न करो पण असंही होऊ शकतं की दोघांनीही नकार द्यावा, असं झालं तर कुठे जातील तुमचे वाद?”

 

“खरं आहे भाऊसाहेब, आपण निरोप आल्यानंतर यावर चर्चा करूया..”

 

संध्याकाळी आई स्वयंपाक बनवत असते आणि कोमल आईला मदत म्हणून कणिक मळून देत असते..आई अधूनमधून कोमलकडे बघे, तिच्या मनात नक्की काय चाललंय, तिला कोण आवडला असावा? असे विचार आईच्या मनात घोळत होते. 

 

“कोमल, तुला कोणता मुलगा आवडला गं?”

 

कोमलने काहीही उत्तर दिलं नाही, आईला तिच्या हावभावावरून सगळं समजलं..

 

“हे बघ कोमल, तू आता आमचा आणि या घराचा विचार करणं सोडून दे, किती दिवस करणार आमच्यासाठी? मुलीला तिचं सासर हेच अंतिम स्थान असतं. मग लग्न झाल्यावर इथला विचार नको आणुस मनात..मला माहितीये, तुला कोण आवडलं यापेक्षा तू हा विचार करतेय की कुणासोबत लग्न करून तुझ्या आई बाबांकडे लक्ष देता येईल ते..बरोबर ना?”

 

कोमल निःशब्द झाली, आईने मनातलं बरोबर ओळखलं होतं..

 

“हेबघ बाळा, मान्य आहे की मुलगी म्हणून तुला आई वडिलांची जबाबदारी स्वीकारायची आहे, पण उद्या परिस्थिती बदलेल, तुझ्या बहिणी मार्गी लागतील, घरात पैसा येईल…पण तुझं काय? एका निर्णयामुळे तू मागे राहून जाशील…

 

तिसऱ्या दिवशी वडील सारखा फोन चाळत होते, सतत फोन चार्जिंग ला लावत होते.

 

“बाबा बॅटरी फुल झालीये, किती वेळ चार्ज करता..”

 

“राहू दे गं चार्जिंग ला, ऐनवेळी उतरायला नको..”

 

बाबांचं चित्त ठिकाणावर नसतं, आज मुलाकडच्यांचा निरोप येणार असतो. कुणीतरी एकाने नकार द्यावा म्हणजे द्विधा मनस्थितीचा प्रश्नच येणार नाही असं बाबांना मनातून खूप वाटत होतं.

 

बाबांच्या फोनची रिंग वाजली, बाबांनी पहिल्याच रिंगला फोन उचलला..

 

“हॅलो, मी सूरजचे बाबा बोलतोय, आम्हाला मुलगी पसंत आहे बरं का…तुमचा निर्णयही कळवा आम्हाला म्हणजे पुढची बोलणी करता येईल..”

 

“अरे वा..छान, मुलाला आमची कोमल आवडली म्हणजे.. चांगलय, मी एकदा घरात सर्वांशी बोलून तुम्हाला निरोप कळवतो हा..”

 

“काही हरकत नाही..तुमचा वेळ घ्या आणि कळवा..”

 

सुरजने तर होकार कळवला, अभिनवनेही होकार कळवला तर? या भल्या माणसांना नकार द्यायला जड जाईल, आपण इतके नकार ऐकलेत, त्यामुळे नकार मिळताना कसं वाटतं हे चांगलंच ठाऊक आहे मला..

 

काही वेळाने अभिनवचा फोन….

 

“हॅलो काका, माझी अट तुम्हाला माहितीच आहे, तुम्हाला जर ती मान्य असेल तर मुलगी पसंत आहे मला..”

 

बाबांच्या पोटात आता तर गोळाच उठला.. जे व्हायला नको तेच झालं, दोन्हीकडून होकार आलेला…

 

“कोमल, सुनंदा… बाहेर या..”

 

दोघीजणी बाहेर आल्या, 

 

“दोन्ही स्थळाकडून होकार आलाय..”

 

हे ऐकून दोघींजणी स्तब्ध होतात, इतके नकार ऐकलेत आणि आज अचानक दोन्ही होकार? हे पचवणं त्यांना जरा कठीण जात होतं.

 

“तुम्ही सरळ सुरजला होकार सांगा..ते अमेरिका प्रकरण नको आपल्याला..”

 

“ऐका माझं, अभिनव सोबत कोमल सुखात राहील..”

 

“पाच वर्षे ही माहेरी राहणार नवऱ्याला सोडून, असं कधी असतं का?”

 

“अगं ती मोठी लोकं, त्यांचे मोठे विचार..आपण एक काम करू, कोमल माहेरी का आहे असं लोकांनी विचारायला नको म्हणून तिला मोठ्या शहरात पाठवू, मागे ती म्हणतच होती ना की तिला चांगला जॉब मिळतोय तिथे, पण तिच्या लग्नासाठी आपण तिला पाठवलं नव्हतं.. आता लग्न करून देऊ आणि ती राहील तिकडेच खोली करून, म्हणजे आपल्यालाही काळजी नाही..”

 

“इतके खटाटोप कशाला? माझं ऐका… सुरजला होकार कळवा..”

 

“एक मिनिट…माझं मत कुणी घेईल का?”

 

कोमल दोघांच्या वादात मध्ये बोलते..

 

“बरं कोमल, आता तू म्हणशील त्याच्याशीच तुझं लग्न होईल..”

 

कोमल विचार करते, तिला एका मोठ्या शहरात चांगल्या पगाराची ऑफर होती, वडिलांनी जाऊ दिलं नव्हतं, पण आता अभिनव सोबत लग्न करून तिकडे गेले तर बक्कळ पगार मिळत जाईल, पाच वर्षात चांगली प्रगती होईल माझी, कंपनी कडून कर्ज घेईन आणि घराला मार्गी लावेन…सुरजशी लग्न झालं तर परत नवीन जॉब शोधा, परत घरातील नवीन जबाबदाऱ्या…त्यात माहेरी मदत..नाही शक्य होणार, अभिनव सोबत लग्न करून पाच वर्ष भारतातच थांबून चांगला पैसा कमवेन आणि मग जाईन त्याच्यासोबत अमेरिकेला..

 

“ताईला सुरजला हो म्हणू दे देवा प्लिज प्लिज..” दोघी बहिणी लांबूनच कुजबुजत होत्या..

 

“बाबा, अभिनवला होकार कळवा..”

 

बाबा खुश होतात, आईला अजून काळजी वाटायला लागते..ही मुलगी आई वडिलांच्या काळजीपायी स्वतःच्या संसाराचं वाटोळं करून घेईल..आई लाख नाही म्हणत असतानाही कोमलने ऐकलं नाही..

 

आता कोमलचे वडील अभिनवला फोन करतात आणि होकार कळवतात…

 

“होकार तर येणारच होता, माझ्यासारखं स्थळ नाकारायला तुम्ही वेडे नाहीत..” बाबांना वाईट वाटलं पण त्यांना आता मागे हटायचं नव्हतं..

 

“बरं आता सगळं ठरलंच आहे तर देण्या घेण्याचं बोलून घेऊ..”

 

बाबांच्या पोटात गोळाच आला, इतकी सुशिक्षित माणसं, इतकी श्रीमंत… यांना कसलीही अपेक्षा नसावी असंच गृहीत धरलं होतं.. पण…

 

“जाऊद्या, मुलीच्या सुखासाठी हे करूया..”

 

“अभिनवराव..तुम्हाला हवं ते देईन मी..फक्त ही गोष्ट आपल्यातच ठेवा…”

 

“चालेल, मला अमेरिकेत एक व्यवसाय सुरू करायचा आहे..त्यासाठी 25 लाख रुपये लागतील..एकदा का हा व्यवसाय सुरळीत झाला की मग तुमची मुलगी पैशात लोळण घेईल बघा..”

 

वडिलांनी विचार केला, आपल्या मुलीच्या सुखासाठीच तर मागताय हे पैसे, द्यायला काय हरकत आहे?

 

____

 

काही वेळाने धीर करत वडील सुरजच्या बाबांना फोन करतात..

 

“नमस्कार साहेब, सूरज खूप चांगला मुलगा आहे..पण शेवटी मुलांसमोर आपलं काय चालणार, आमच्या कोमलच्या मनात दुसरं काहीतरी आहे त्यामुळे..”

 

“अहो हरकत नाही, त्यात काय इतकं..शेवटी प्रत्येकाची आपापली आवड…”

 

“तुम्ही समजून घेतलंत ते बरं वाटलं..”

 

“अहो इतकं काय त्यात, पण आपले संबंध मात्र तसेच ठेऊ हा..इकडे कधी आले की या घरी..”

 

नकार देऊनही इतकी सोज्वळ वागणूक बघून वडील भारावून गेले..आता तर त्यांनाही वाटू लागलं की सुरजला नकार देऊन आपण चूक करतोय.. पण आता सगळं ठरलं गेलं होतं..

 

सुरजला हे समजताच तो मनातून पार कोसळला..पहिल्यांदा एका मुलीला त्याने पसंत केलं होतं आणि तिने नकार दिला..त्याने त्या दिवशी काहीच खाल्लं नाही, संपूर्ण दिवस तो खोलीतच बसून होता..

 

“अरे काय तू इतका नाराज होतोय? तुझ्यासाठी मुलींची लाईन लागेल बघ..”

 

“पण मला तर फक्त तीच हवीय..”

 

“का? इतकं काय आहे तिच्यात?”

 

“एक तर मुलगी गावाकडची असते जिला घरकाम शेतीकाम सगळं येत असतं, आणि दुसरीकडे शहरातली मुलगी, जीचे बोटं  लॅपटॉप वर सराईतपणे चालतात..”

 

“मग?”

 

“कोमल म्हणजे सगळ्या गुणांची खाण आहे,  शेतीकाम घरकामातही पटाईत आहे आणि दुसरीकडे लॅपटॉप वर प्रोग्रॅम करतानाही तिचे हात सराईतपणे चालतात..अशी मुलगी आजकाल कुठे मिळते?”

 

“म्हणून फक्त आवडली का तुला?”

 

“तेवढंच नाही, तिच्या डोळ्यात आत्मविश्वास आहे, एक चमक आहे…आलेल्या प्रत्येक प्रसंगावर मात करण्याची ताकद तिच्यात आहे..”

 

“पण आता ती तुझी नाहीये..”

 

“ती नाही तर कुणीच नाही ..आयुष्यभर तसाच राहीन मी..”

 

सूरजला जणू वेड लागलं होतं , आरश्या समोर उभं राहून दोन्ही वाक्य तोच बोलत होता..प्रश्नही तोच विचारायचा आणि उत्तरही तोच द्यायचा..

 

आई वडिलांना काळजी वाटू लागली, आईने परेशला बोलवून घेतलं..

 

क्रमशः

 

 

 

4 thoughts on “तुही है आशिकी (भाग 5)”

  1. खूपच छान .परंतू 25 लाख रुपयांचा हुंडा ही गोष्ट कोमलपासून का लपवली ?

    Reply

Leave a Comment