तुही है आशिकी (भाग 24)

 भाग 1

 

अभिनवशी भांडून ती बाई बाहेर निघून जाते, इकडे अभिनव विचारात पडतो, एक तर कोमलच्या घरी आपण बोलणी करून आलोय पण आता त्याचा काही उपयोग नाही. एका अर्थाने बरंच झालं, कारण तो आता कोमलच्या प्रेमात पडला होता.

 

अभिनव एक अनाथ पण वाया गेलेला मुलगा. अभ्यासात हुशार होता पण चांगल्या मार्गाने काही करणं त्याला आवडतच नव्हतं. चिक्कार पैसा कमवायचे दिवास्वप्न तो पाही. काही चुकीच्या मित्रांच्या संगतीने एका वाईट scandle मध्ये तो घुसला..त्याला तिथून भरपूर पैसे मिळू लागले होते. हे scandle भारताबाहेर सुद्धा पसरलं होतं. मुलींना फूस लावून परदेशी आणणं, त्यांना वाईट व्यवसायाला लावणं, औषधं पाजून त्यांच्यात हार्मोनल बदल करणं हे सगळे धंदे सुरू होते. अश्यातच अमेरिकेत भारतीय मुलींसाठी चार कोटींची बोली लागली होती. म्हणूनच अभिनव ने कोमल आणि तिच्या बहिणींना फूस लावायचा प्रयत्न केला होता. 

 

हे सगळं सुरळीत सुरू होतं पण जेव्हापासून तो कोमलला भेटला तेव्हापासून त्याला असं वाटू लागलं की सगळे वाईट धंदे सोडून कोमलसोबत संसार सुरू करावा. चार कोटी घेऊन हिच्या बहिणींचा सौदा करायचा पण कोमलला मात्र सोडवून आणायचं असा त्याचा डाव होता. 

 

अभिनव फ्लॅटबाहेर निघाला..त्याने दरवाजा लावायला घेतला तेव्हा बघतो तर काय, कोमल बाहेरच उभी होती, तिने सगळं ऐकलं होतं..तिच्या बहिणी खाली पार्किंग मध्ये उभ्या होत्या..कोमल घामेघुम झाली होती..आपल्यासोबत एवढं सगळं घडणार होतं हे ऐकूनच तिच्या अंगावर काटा उभा राहिलेला..तिने अभिनवच्या जोरात कानशिलात लगावली..अभिनव चिडला, त्याने तिचं तोंड दाबून धरलं आणि तिला ओढत लिफ्टने खाली नेलं, पार्किंग मध्ये गपचूप मागच्या बाजूने कोमलला कार मध्ये बसवलं आजी कार चा काचा लावून मोठमोठ्याने गाणे लावले, कोमलच्या बहिणींना लक्षात आलं नाही गाडी बाहेर जात असताना..

 

कोमलचे हात बांधून दिले गेलेले.. ती सुटकेचा प्रयत्न करत होती. अभिनवने भरधाव गाडी काढली आणि शहराबाहेर एका सुनसान ठिकाणी तिला त्याने नेलं. गाडीतून तो उतरला आणि कोमलला त्याने उतरायला सांगितलं. कोमलचे हात त्याने सोडले. कोमल घामेघुम झालेली. तिचा संताप तर होत होताच पण ती बरीच घाबरली होती. अभिनव तिच्या जवळ येऊ लागला तशी ती मागे होऊ लागली. आपल्यासोबत आता काय होईल या विचारानेच तिला कापरं भरलं..कारण सुटकेचा प्रयत्न केला तरी त्या ठिकाणी पळून पळून कुठे पळणार, लांबपर्यंत वस्ती नव्हती..तिने डोळे गच्च मिटून घेतले..बराच वेळ काही आवाज आला नाही म्हणून तिने डोळे उघडले, अभिनव गुडघे टेकून तिच्यासमोर मान खाली घालून उभा होता..कोमलला कळेना हा काय करतोय ते..

 

“हे काय…”

 

“कोमल..सर्वात आधी तुझी मनापासून माफी मागतो मी..मी चुकीच्या धंद्यात होतो, भरपूर पैसे कमवत होतो पण आज या क्षणापासून ते सगळं सोडलं मी..तुला पाहिलं आणि वाईटपणा सोडून द्यावासा वाटला बघ मला…माझ्याशी लग्न कर, सुखाने संसार करू आपण.. मी मागे वळून बघणारही नाही..माझं चांगलं शिक्षण झालंय, एखादा चांगला जॉब बघेन मी अमेरिकेत.. तिकडेच राहूया आपण…”

 

कोमल हे ऐकून अजूनच घाबरते, मनात संताप असतो..

 

“आजवर कित्येक मुलींना फूस लावून अश्या कामाला लावलं असशील तू, आणि तुझी ईच्छा आहे अश्या पापी मुलाशी मी लग्न करू? अशक्य..आणि हो, तुला होकार देण्याचं नाटक केलं होतं मी…तुला पोलिसांच्या ताब्यात दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही..”

 

असं म्हणत कोमल तिथून चालायला लागते, अभिनव तिचा हात पकडून तिला मागे ओढतो. 

 

“हे बघ, बऱ्या बोलाने माझ्याशी लग्न कर नाहीतर..”

 

“नाहीतर काय? आलाच ना तुझ्या लायकीवर? खरं प्रेम असतं तर असं धमकावून मिळवलं नसतं..”

 

“मला जे हवं ते मी मिळवतोच… चल माझ्यासोबत.. जोवर तू तयार होत नाहीस तोवर तुला सोडणार नाही मी..”

 

तो कोमलला घेऊन बळजबरीने त्याच्या दूरच्या एका घरी घेऊन जातो..

 

इकडे कोमलच्या बहिणी कोमलला शोधायला फ्लॅट वर जातात, ती तिथेही नसते. बहिणींना काळजी वाटायला लागते, कोमल फोनही उचलत नसते आणि अभिनवचा फोनही लागत नसतो..त्या घाबरतात..कशाबशा त्यांच्या घरी पोचतात आणि सगळं सविस्तर सांगतात.. कोमलच्या वडिलांना धक्का बसतो, आपली मुलगी कुठे गेली असेल? कशी असेल? तिच्यासोबत काही वाईट तर झालं नसेल ना? या विचाराने वडिलांना कापरं भरतं.. त्यांचं ब्लड प्रेशर वाढतं, घाम येऊ लागतो आणि ते अचानक कोसळतात…

 

कोमल गायब असते आणि तिचे वडील दवाखान्यात ऍडमिट असतात. कोमल गायब आहे हे सुरजला सांगायला कोमलच्या आईने तिच्या बहिणींना नाकारलं होतं, आपली होणारी बायको अशी गायब आहे म्हटल्यावर उद्या सुरजने तिला स्वीकारलं नाही तर? बहिणी हे ऐकून गप होत्या..

 

_____

 

“पऱ्या…नांगरणी झाली, पेरणी झाली, आता झाडं कधी उगवतील रे?”

 

“मक्याचं झाड नसतं बे सुऱ्या…”

 

“तेच ते..शेत कधी उगवेल?”

 

“आता पाऊस पडला की लगेच..”

 

“म्हणजे पाऊस पडला तर उगवेल? “

 

“पेरणीच्या वेळी दिलंय तसं पाणी, पण नंतर वाढीसाठी पावसावर अवलंबून रहावं लागेल..”

 

“आणि नाही पडला तर?”

 

“मग packup .”

 

सूरज काळजीत पडतो, पेरणी तर केली..पाऊस पडला नाही तर इतकी मेहनत वाया जाणार? काय अवस्था होत असेल शेतकऱ्याची जो या पावसाच्या भरवशावर वर्षभराची कमाई गृहीत धरत असतो..

 

“ही कोमल फोन का उचलत नाहीये यार..”

 

“काय झालं?”

 

“कालपासून फोन लावतोय, आधी उचलत नव्हती. आता बंद येतोत..”

 

“अरे कामात असेल, करेल नंतर..”

 

“मला काळजी वाटायला लागलीये..”

 

“दीड दिवस फोन झाला नाही तर लगेच काळजी?”

 

“हो..याला प्रेम म्हणतात..तुला काय कळणार म्हणा..”

 

“मला काय कळणार?”

 

“तू केलंय कधी कुणावर प्रेम?”

 

परेश समीक्षासोबत झालेली नजरानजर आठवतो, तिच्यासोबत झालेलं बोलणं आठवतो..

 

“ओ पऱ्या भाऊ…कुठे हरवलात..एक मिनिट..तुला खरंच कुणी आवडतं का?”

 

परेश फक्त लाजतो..

 

सुऱ्या उठतो आणि जवळ असलेलं बादलीभर पाणी त्याच्या अंगावर ओतून देतो..परेश एकदम दचकून उठतो आणि म्हणतो..

 

“सुऱ्या वेडबीड लागलंय का??”

 

“साला हरामखोर… माझ्या अख्ख्या लव्ह स्टोरीत हिरोईनच्या बरोबरीने तुला स्थान दिलं आणि तू?? मला सांगितलं नाहीस?”

 

“सुऱ्या ऐक तरी. “

 

“अरे काय ऐकू? मित्र मानतोस ना मला? मग माझ्याशी गद्दारी?”

 

“सुऱ्या अरे ऐक..”

 

“काय ऐक? लाज वाटते मला आता…”

 

“सुऱ्या अरे आता कसं सांगू..”

 

“कोणत्या तोंडाने सांगशील? तुला तोंड आहे का?

 

“मला समीक्षा आवडते..”

 

परेश एका दमात बोलून टाकतो आणि दोघेही एकदम शांत होतात…धाप टाकत दोघेही कितीतरी वेळ फक्त गप असतात.  

 

क्रमशः

 

 

5 thoughts on “तुही है आशिकी (भाग 24)”

  1. खूप फापटपसारा आहे. अगदी एक ना धड भाराभर चिंध्या. कथेला मूळ गाभाच नाही

    Reply

Leave a Comment