तुही है आशिकी (भाग 23)

(नात्यातला

 

 नाक दाबून परेश शेण कालवत असतो, त्याचा तो कार्यक्रम सुरू असतानाच सूरज बियाणं, खतं घेऊन येतो. सगळं सामान आणून ठेवलेलं असतं. आता जमीन नांगरून त्याची पाळे करून पेरणी करायची असते. सूरज आणि परेश अण्णा पाटीलकडे जातात. 

 

“भाऊ ट्रॅक्टर कुठे मिळेल? नांगरणी करून टाकू म्हणतो..”

 

अण्णा पाटीलला सूरज आणि परेशकडे बघून नुसतं हसू यायचं. कोवळी पोरं काय शेती करणार म्हणून, अण्णा पाटील एक श्रीमंत शेतकरी. गावात त्याचा दरारा होता. अण्णा पाटलाची एक खोड होती, गावात आपल्यापेक्षा कुणीही जास्त श्रीमंत होऊ नये, आपल्यापुढे कुणीही जाऊ नये यासाठी तो प्रयत्नशील असायचा. एखाद्याला चांगलं उत्पन्न येत असेल तर मुद्दाम कमी भावात तो स्वतःचा माल खपवत असे. केवळ कोमलच्या वडिलांच्या ओळखीमुळे त्यांनी सुरजला जागा देऊ केली होती. अण्णा पाटील विनाकारण या दोघांशी शेतीबाबत स्पर्धा करू लागलेले. 

 

सूरज आणि परेश बिचारे नांगरची वाट पाहू लागले, पण अण्णा पाटीलने व्यवस्था करून ठेवली की यांना काही नांगर मिळणार नाही. दोघेही विचारून विचारून थकले. शेवटी सूरज परेश जवळ आला आणि म्हणाला..

 

“परेश..आजवर प्रत्येक कठीण प्रसंगात तू माझ्या सोबत राहिलास..आता हे काम..”

 

“समजलं…उद्या करतो काहीतरी..”

 

परेश वर जबाबदारी सोपवून सूरज मोकळा झाला. आता परेशला त्याचा शातीर दिमाग वापरून काहीतरी तरतूद करावी लागणार होती. दोघेही झोपी गेले. 

 

सकाळी सूरज उठून बघतो तर परेश जागेवर नव्हता. त्याने शेतात एक नजर टाकली, पाण्याचं डबडंही तिथेच होतं. सकाळी सकाळी हा कुठे गेला? सुरजला काळजी वाटू लागली. त्याचा फोनही घरीच..रात्री लांडग्याने येऊन पऱ्याला ओढून तर नेलं नसेल ना? इतक्यात समोरून परेश दोन बैलांना घेऊन येताना दिसला..

 

“सुऱ्या… झाली बघ सोय..”

 

“कसली?”

 

“नांगरणीची..”

 

“मी तुला नांगर आणायला पाठवलेलं..”

 

“गावात नाही मिळत कुणाकडे.. ज्यांच्याकडे आहेत ते स्वतः नांगरणी साठी वापरताय..आता याच्याशिवाय गत्यंतर नाही..”

 

नांगरणीची वेळही निघून जात होती. त्यामुळे आता औताला बैल जुंपून नांगरणी करण्याशिवाय पर्याय नव्हता. अण्णा पाटील ने दोघांची गम्मत बघण्यासाठी त्यांच्याकडच्या जुना औत या दोघांना दिला. सूरज आणि परेशने सगळं आटोपून नांगरणी साठी निघाले. परेशने बैलांसाठी भलामोठा दोर आणलेला. आधीच तो जनावरांना घाबरत होता, आता त्यांना पकडून औताला बांधायचं आणि नांगरणी करायची कठीणच होतं.

 

“पऱ्या..बैलांना बांध औताला..”

 

“नांगरणीची सोय करायची एवढंच काम दिलेलं मला..बाकी तू बघ..”

 

सुरजला तर घामच फुटला..कसेबसे त्याने बैलांना आणून औताला बांधले आणि आपण फार काहीतरी मोठं केलंय यावर तोच खुश झाला. 

 

“हे बघ पऱ्या..असं करायचं असतं.. तुला काही माहितीच नाही..आता फक्त मागे त्या दांडक्यावर उभं राहायचं आणि बैल आपोआप सगळं नांगरतील..”

 

“ठीक आहे, तू कर सुरवात.. मी आत बसतो अभ्यासाला..”

 

“हो जा तू…मी करून घेतो हे काम..”

 

परेश आत जातो आणि अभ्यासाला सुरवात करतो. सूरज बैलांना हळूच दांडा मारत नांगर हकलतो..जमीन नांगरली जात असते. पण एक फेरी होताच एक बैल थांबतो आणि बसून घेतो. सुरजला कळेना एक बैल असा का बसलाय? सुरजने त्याला उठवायचा प्रयत्न केला तरी तो काही उठेना..

 

शेजारून एक सालदार गडी जात असतो तो म्हणतो..

 

“बैल आजारी दिसतोय..आज काही करणार नाही तो..”

 

सुरजला कळवळून येतं.. तो बैलाला सावलीत बांधतो. त्याला चारा पाणी ठेवतो आणि गुगल वरून एका पशु डॉक्टरला बोलावून घेतो. दुसरा बैल एकटाच नांगर हकलण्याचा प्रयत्न करत असतो. सूरज त्याची धडपड बघत असतो. 

 

“आमची पेरणी सुरू झालीय अन तुम्ही नांगरतच आहात?”

 

अण्णा पाटील खोचकपणे त्यांना बोलतो. 

 

शेतकऱ्यांना बसणारी झळ आता सुरजला हळूहळू जाणवू लागते. वेळ टळून चाललेली असते. सुरजला कंपनी कडून फोनवर फोन येत असतात..हे काम यशस्वी झालं नाही तर कंपनीचं नुकसान होणार होतं.. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी हे करून दाखवेन असा विश्वास सुरजने सर्वांना दिला असताना मागे फिरणं म्हणजे स्वतःचा अपमान करून घेण्यासारखा होता. 

 

आणा पाटील ने पेरणी सुरू केली मग नांगर द्यायला हरकत नव्हती, त्याने मुद्दाम नाही दिला..सुरजला शेतीतल्या या बड्या असामींचीही चांगलीच झळ पोहोचू लागली. अण्णा पाटीलचं खरं रुप त्याला दिसू लागलं. आपल्याकडे पैसे असताना नांगर मिळालं नाही, मग जे गरीब शेतकरी असतील त्यांच्यावर काय वेळ येत असेल?  नांगरणीलाच एवढी संकटं येताय..पुढे अजून काय वाढून ठेवलं असेल? सगळा विचार करत सुरजचं डोकं भणभणायला लागतं. तो डोक्याला हात लावून खाली बसून घेतो. दबाव, निराशा आणि संकट काय असतं हे त्याला जाणवू लागतं..

 

“हुररर….चल मेरे घोडे… टिक टिक टिक..”

 

सुरजला आवाज येतो तसा तो डोक्यावरचा हात बाजूला घेऊन पाहतो.. आजारी बैलाच्या जागी परेशने स्वतःला जुंपलं होतं..

 

“सुऱ्या… मी आहे..विसरलास का..मी असताना तुला कधीच हरू देणार नाही..”

 

“पऱ्या वेडेपणा करू नकोस…काढ ते खांद्यावरून..”

 

“माझी शपथ आहे तुला…आज एवढी जमीन झालीच पाहिजे..”

 

सुरजच्या डोळ्यात पाणी येतं. परेश खरं बोलत होता..परेश सोबत असताना सूरज आजवर कुठे हरला नव्हता..जड मनाने सुरजने नांगरणी करायला घेतली. सोबतीच्या बैलाशी गप्पा मारत परेश नांगर ओढू लागला..

 

“पऱ्या त्याला बोर करू नकोस, नाहीतर तोही बसून घ्यायचा..”

 

“नाही रे..त्याला बोर होऊ नये म्हणून फिल्म ची स्टोरी सांगतोय त्याला..”

 

_______

अभिनवने संगितल्याप्रमाणे कोमल आणि तिच्या तिन्ही बहिणी अभिनव सोबत शहरात जातात आणि पासपोर्ट चं काम करून घेतात. अभिनव तिघींना त्याच्या त्या शहरातल्या फ्लॅट वर नेतो. घर पाहून तिन्ही बहिणी कोड्यातच पडतात. घरात जास्त सामान नाही, किचनमध्ये शेगडी नाही, फक्त बेड तेवढे बऱ्यापैकी होते. 

 

“तुम्ही इथे राहत नाही का?”

 

“नाही…इकडे आलो की येतो अधूनमधून.. जास्त वेळ अमेरिकेतच..”

 

“आणि तुमची आई?”

 

अभिनवला काही उत्तर सुचेना..आई बाहेर गेलीये असं त्याने सांगून वेळ मारून नेली.. कोमलला ते सर्व संशयास्पद वाटत होतं. इतक्यात अभिनवची आई आणि दोन माणसं फ्लॅटवर येतात, अभिनवची आई विचित्रच दिसत होती..भडक मेकप, चकचकीत कपडे..आणि सोबत दोन माणसं गुंडच दिसत होती..अभिनव त्यांना पाहून एकदम चमकतो..

 

“लैलाबाई तू इकडं कशाला?”  हळू आवाजात अभिनव बोलतो पण कोमलला ऐकू जातं..

 

“इधर नहीं तो किधर जाऊ मै?”

 

अभिनवची आई वेगळ्याच भाषेत बोलत असते..पण तिचं लक्ष कोमल आणि तिच्या बहिणींकडे जाताच ती जरा शांत बसते..

 

“लैलाबाई? आईला असं म्हणतात तुम्ही?”

 

“अगं गमतीने.. नको जास्त विचार करुस..”

 

“तरी..”

 

“कोमल, अगं आईची किटी पार्टी होती आज, त्यात वेगवेगळ्या थीम असतात म्हणून आज आई अशी दिसतेय…तुम्ही खाली पार्किंग मध्ये थांबा मी आलोच..”

 

अभिनव तिघींना खाली पाठवून देतो. कोमलच्या मनात हजार प्रश्न असतात पण ती स्वतःवर खूप नियंत्रण ठेवते. त्या तिघी खाली जाताच अभिनव त्या बाईला बोलायला लागतो..

 

“तुला आत्ताच यायचं होतं का इथे?”

 

“हे बघ, आपली कामं इथेच चालतात..मी भाडं भरते इथलं..तू नाही ..आणि सौदा करण्यासाठीच ही जागा घेतलीये आपण..”

 

“पण ती कोमल आणि तिच्या बहिणींना संशय येईल ना..”

 

“सोड रे त्या पोरींना..त्यांचा कस्टमर कंटाळून निघून गेला..आपण किती फास टाकले तरी नाही ऐकलं या पोरीच्या बापाने..चार कोटींचा सौदा फिस्कटलं..तुझं लग्न करून त्या तिघींना अमेरिकेला न्यायचं होतं तिथल्या कस्टमरकडे..गावातल्या पोरी, एकदा तिकडे अडकल्या असत्या की बापाकडे तोंड दाखवायची हिम्मत केली नसती..म्हणुनच कोपऱ्यातल्या गावाकडची मुलगी पाहिली तुला..आता काही उपयोग नाही..गेला तो कस्टमर..”

 

“बाई तू मला हे आधी सांगायला हवं होतं..आता मी तिच्या घरी बोलणी करून आलोय..”

 

“तुला सांगायला मी तुझी आई की बहीण? तू पोरी आणायच्या आणि मी गिर्हाईक शोधायचं एवढंच आपल्याला समजतं..बाकी आता नाटकं सम्पव आणि नवीन गिर्हाईक शोध ..”

 

क्रमशः

(पुढील सर्व भागांच्या रेग्युलर अपडेट साठी फॉलो करा खालील फेसबुक पेज 

https://www.facebook.com/sanjanablogs/

 

 

3 thoughts on “तुही है आशिकी (भाग 23)”

Leave a Comment