तुही है आशिकी (भाग 22)

भाग 1

 

 #तुही_है_आशिकी (भाग 22)

कोमलचे वडील काळजीत पडतात, अभिनव नावाचा माणूस आपल्या आयुष्यात का आला हा प्रश्न त्यांना सतावू लागला. त्यांच्या हातात चार दिवस होते, अभिनव गुंड प्रवृत्तीचा असल्याने काहीही झालं तरी कोमलला त्याच्या हाती देणार नाही हे त्यांनी ठरवलं होतं. पोलिसात गेलं म्हणजे गावभर बदनामी. आता त्यांना एकच पर्याय दिसू लागतो..सुरजला सगळं सत्य सांगायचं. 

 

त्यांनी तातडीने आपल्या तिन्ही मुलींना आणि सुरजला बोलवून घेतलं. सूरज पाठोपाठ परेशही कोमलच्या घरी पोहोचला. 

 

“बाबा काय झालं? असं अचानक आम्हाला का बोलावलं?”

 

“मी काय सांगतो ते नीट ऐका.. अभिनव मला पुन्हा भेटला होता काल, 30 लाख रुपये देऊ करत होता आणि कोमल सोबत लग्न लावून द्या असं म्हणत होता..तिच्या दोन्ही बहिणींसाठीही स्थळ बघितलंय असं म्हणत होता..आणि जर असं केलं नाही तर तो काहीतरी विपरीत करेल अशी धमकी त्याने दिली..”

 

“बाबा इतकं सगळं होऊन गेलं? हा अभिनव समजतो कोण स्वतःला? आणि का आपल्या पाठी लागलाय तो? अमेरिकेत चांगल्या नोकरीला आहे, तरी..”

 

सूरज आणि परेशला हे ऐकून संताप होतो..

 

“थांबा त्याला पोलिसांच्या हवाली करतो..”

 

“नाही सूरज, असं केलं तर बदनामी होईल आणि तो गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे, काहीही करू शकतो.”

 

“मग काय करू शकतो आपण?”

 

“एक मार्ग आहे..बघा म्हणजे तुम्हाला पटत असेल तर..” -सूरज

 

“कुठला?”

 

“तुम्ही अभिनवला तात्पुरता होकार द्या, कोमलशी लग्न लावून द्याल असं त्याला सांगा..”

 

“याने काय होईल?”

 

“एकदा का त्याच्या टोळीत गेलो की त्याचा एक तरी गुन्हा पुराव्यासह सापडेल, आणि तो हाती लागताच त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू..”

 

“सूरज मला तेच नकोय, इथे गावात..”

 

“गावात नाही काका, शहरातील पोलिसात तक्रार नोंदवू.. म्हणजे कुणाला समजणारही नाही..”

 

“पण अभिनवला हो म्हटलं तर तो कोमलशी संबंध ठेवेल, तिला फिरायला न्यायचा आग्रह करेल..कोमल त्याच्यासोबत सुरक्षित कशी असेन?”

 

“बाबा काळजी करू नका..मी माझं रक्षण करू शकेन..आणि माझ्यामुळे एक गुन्हेगार पकडला जात असेल तर थोडी रिस्क घ्यायला काय हरकत आहे?”

 

कोमलचा विषय येताच सूरज हळवा होतो. दुसऱ्या कुणा मुलासोबत तो तिला पाहू शकत नव्हता, त्याच्या प्लॅन नुसार अभिनवच्या गोटात शिरून त्याला पकडायचं होतं पण त्यासाठी कोमलला पुढे यावं लागणार हे त्याच्या लक्षातच आलं नाही..सुरजचे हावभाव बदलतात..कोमलला तो अश्या माणसाच्या सावलीतही जाऊ देऊ शकत नव्हता.. सुरजचे हावभाव कोमलने ओळखले.. तिने नजेरेनेच त्याला धीर दिला..

 

ठरल्याप्रमाणे कोमलचे बाबा अभिनवला होकार देतात. अभिनवला वाटतं की कोमलच्या बाबांनी घाबरून आपल्याला होकार दिलाय. तो त्याच्या पुढच्या तयारीला लागतो. कोमल आणि तिच्या बहिणींना पासपोर्ट काढण्यासाठी तगादा लावतो. 

 

“हॅलो कोमल, अभिनव बोलतोय..”

 

“बोला..”

 

“शेवटी होकार द्यावाच लागला ना..”

 

“खरं तर मला तुम्ही मनापासून आवडत होता..पण घरच्यांसमोर काय बोलणार?”

 

“होका? मला तर वाटलं की हिरो बनलेल्या त्या सुरजला तू पसंत करतेस..”

 

“तो मला कधी आवडलाच नव्हता..मला तुझ्यासोबत माझं आयुष्य काढायचं आहे..आयुष्याची स्वप्न तुझ्यासोबत पूर्ण करायची आहे..माझ्या आनंदात तुला सहभागी करून घ्यायचं आहे..माझ्या दुःखात तुझ्या खांद्यावर डोकं टेकवायचं आहे..”

 

अभिनव हे सगळं ऐकून विरघळतो. आजवर त्याने अनेक दुष्कर्म केले होते, पण कोमल सारखी गोड मुलगी त्याचाशी प्रेमाने बोलू लागताच तो एकदम हळवा होतो.

 

“बरं कोमल ऐक.. पुढच्या आठवड्यात मी येतोय..तुला घ्यायला..पासपोर्ट चं काम

 

फोन ठेवताच शेजारी उभ्या असलेल्या सुरजचा संताप होतो..

 

“इतकं प्रेमाने माझ्याशीही कधी बोलली नाहीस..”

 

“अरे आपला प्लॅन आहे ना? त्याला संशय यायला नको म्हणून तर बोलले मी..”

 

“तू लाख खोटं बोलली असशील पण माझ्या डोक्यात सनक गेली ना..”

 

सुरजचा झालेला जळफळाट बघून कोमलला हसू येतं..

 

“चल आता पुढच्या आठवड्यात तो भेटणार आहे मला, तोवर तू तुझ्या कामाकडे लक्ष दे..”

 

_____

 

सूरज आणि परेश त्यांच्या गावी पोचतात.

 

“पऱ्या..चार दिवस तर असेच गेले, आता कामाला लागायला हवं..”

 

“हो पण करायचं काय?”

 

“आता हा सिझन मक्यासाठी योग्य आहे..तेव्हा बियाणं आणणं, खतं आणणं ही कामं करावी लागतील..”

 

“मग घेऊन येऊ की गावात जाऊन..”

 

“जास्त पैसे लागतील..उद्या माझा पगार होईल तेव्हा जाऊया..तोवर काहीतरी खायला घेऊन येऊ..आता काही बनवायची ईच्छा नाहीये, गावच्या मार्केट मध्ये जाऊन काही मिळतंय का बघू..”

 

सूरज आणि परेश दोघेही गावच्या मार्केट मध्ये जातात..येतांना भरपूर खाऊ आणतात..वडापाव, चिप्स, चिवडा, चॉकलेट, बिस्कीट वगैरे. घरी येऊन दोघेही आधाशासरखे एकेक करून खाऊ लागतात. अचानक त्या दिवशी संध्याकाळी त्यांच्या झोपडीसमोर एक गाडी येऊन उभी राहते..सुरजच्या ऑफिसमधला क्लाएंट आणि सुरजचा बॉस गाडीतून बाहेर येतात. सूरज आपल्या कामाप्रती किती सिरीयस आहे हे बघण्यासाठी दोघेही आले होते. परेश तिथे येऊन राहतोय हे सुरजला लपवायचं होतं, म्हणून त्याने परेशला पटकन एका रिकाम्या ड्रम मध्ये परेशला कोंबून देतो. क्लाइन्ट आणि बॉस झोपडीत शिरतात.. पण तिथे पडलेले खाऊची पाकिटं, चॉकलेट चे तुकडे हे सगळं बघून क्लाइन्ट चिडतो..

 

“मिस्टर सूरज तुम्हाला मी इथे पिकनिक ला नाही बोलावलंय, हे सगळं बघून तुम्ही कामाबद्दल किती सिरीयस आहात ते दिसतंय..”

 

“सॉरी सर..ते..”

 

“काहीएक बोलू नकोस, शेती करतांना किती विघ्न येतात याचा तुला अनुभव घ्यायचा आहे..हे घे 20 हजार रुपये.. एवढ्या पैशात सहा महिने काढायचे, तुला या सहा महिन्यांचा पगार एकदम मिळेल, शेवटी..”

 

“म्हणजे दरमहा..”

 

“नाही मिळणार..तेव्हा तुला समजेल की शेतकऱ्यांचे कष्ट काय असतात ते.”

 

एवढं बोलून दोघे निघून जातात. सूरज परेशला बाहेर काढतो. 

 

“पऱ्या..आता सिरियसली काम करावं लागेल..”

 

पऱ्या अंग खाजवत शिंका देत बाहेर येतो..

 

“काय काम करू मी सांग..पण कष्टाचं काम नको देऊस, बियाणं वगैरे आणायला मी जाणार नाही, एक तर आपल्याकडे गाडी नाही..गावात पायपीट करत जायला मला आलाय कंटाळा..”

 

“तू फक्त एक काम कर …खत बनव..”

 

“खत बनवायचं?”

 

“हो सेंद्रिय खत…काही नाही, बसल्या बसल्या काम असतं.. तू अण्णा पाटीलला विचार तोवर मी बाजार करून येतो..”

 

परेशला आनंद झाला, कारण पहिल्यांदा सुरजने त्याला सोपं काम दिलं असतं.. तो तोऱ्यात अण्णा पाटील कडे जातो…

 

“अण्णा भाऊ..ते सेंद्रिय खत बनवू म्हणतो.. काय काय करावं लागेल?”

 

अण्णा पाटील त्याच्याकडे बघून हसतात. 

 

“ते बघ त्या गोठ्यात जा..तिथून सगळं शेण उचल हाताने आणि एका जागी आणून ठेव..त्यात हाताने पाणी कालव…”

 

पऱ्या जागीच थबकतो… रमत गमत रस्त्यावरून जाणाऱ्या सुरजकडे बघून तो बोटं मोडू लागतो…

 

क्रमशः

 

 

5 thoughts on “तुही है आशिकी (भाग 22)”

Leave a Comment