तुही है आशिकी (भाग 19)

 भाग 

 

 

 

#तुही_है_आशिकी (भाग 19)

(सर्वप्रथम उशिरा भाग टाकल्याने माफी मागते, कौटुंबिक कार्यक्रम असल्याने काही दिवस लिखाण जमले नाही, यापुढे रोज एक भाग पोस्ट होत जाईल..)

 

कोमलच्या गावी जाऊन शेती करायला मिळणार म्हणून सूरज आनंदात होता. कंपनी हे सगळं करता करता दरमहा पगार चालूच ठेवणार होती त्यामुळे सुरजला कसलीही चिंता नव्हती. त्याला आता फक्त शेती करून त्यातले बारकावे समजून सॉफ्टवेअर साठी इनपुट तयार करायचे होते. कोमल वरचं प्रेम, तिच्या कुटुंबियांबद्दल असलेली तळमळ आणि मुळातच काहीतरी वेगळं करण्याचं साहस बाळगून असलेल्या सुरजला कंपनीचा हा प्रोजेक्ट पथ्यावरच पडला. 

 

पण हे सगळं करणं सुरजला एकट्याला जमणार नव्हतं, त्याला परेशला सोबत न्यायचं होतं. त्याला तयार करणं महत्वाचं होतं. सूरजला चार दिवसांनी निघायचं होतं. कोमलच्या वडिलांना सुरजने आधी फोन केला..

 

“हॅलो मी सूरज बोलतोय..”

 

“बोला पाहुणे..”

 

“तुमच्या घराजवळ किंवा गावात एखादी जमीन मिळेल का मला?”

 

“खरेदी करताय का?”

 

“अहो नाही, मला भाड्याने हवीय..शेती करायची आहे सहा महिने..”

 

“शेती?”

 

“होय…”

 

“आणि नोकरीचं काय?”

 

“सहा महिने सुट्टी..”

 

कोमलच्या वडिलांना कळत नव्हतं हे सगळं प्रकरण, सूरजने नोकरी सोडून शेतीचं खुळ नसेल ना घातलं डोक्यात? तसं काही असेल तर कोमलचं काय होईल? जे सगळं वैभव बघून आपण मुलीला द्यायला तयार झालो ते तर आता सगळं बदलणार की काय? नाना प्रश्नांनी कोमलच्या वडिलांच्या मनात काहूर माजलं होतं. 

 

“हॅलो? काका कसला विचार करताय?”

 

“पाहुणे ऐका माझं, शेतीच्या भानगडीत पडू नका, तुम्ही नोकरीच लावून धरा..”

 

सुरजला त्यांची घालमेल लक्षात आली..

 

“अहो काका तसं काही नाहीये, मला हे काम कंपनीने दिलं आहे, सहा महिने मी शेतीकाम करेन आणि त्या सहा महिन्यांचा पगारही चालू राहणार आहे मला..”

 

“अच्छा असं आहे होय..”

 

वडिलांच्या मनातील शंका दूर झाली. 

 

“मग मला जवळपास जमिनीचा एखादा तुकडा मिळेल का? म्हणजे मी भाडे देईनच..”

 

कोमलचे वडील विचार करतात, त्यांच्या जमिनीवर पिकं लावलेली असतात, पण घरापासून काही अंतरावर एक जमीन पडीक होती, तिथे राहणाऱ्या एका अजीबाईंची ती जमीन. आजी एकट्याच तिथे रहात होत्या आणि काही दिवसांपूर्वीच त्या शहरात आपल्या मुलाकडे रहायला गेलेल्या. त्यांच्याशी संपर्क करून वडिलांनी जमिनीची सोय केली.

 

इकडे सूरज रिसर्च करू लागला. इंटरनेट वर खरीप हंगामातील पिकं कोणती याचा शोध घेऊ लागला. त्याला असं समजलं की हा हंगाम मक्यासाठी योग्य आहे. रिसर्च करत असतानाच सुरजची आई त्याला हाक देते.

 

“सूरज अरे इकडे ये रे जरा…फ्रिजची काहितरी सेटिंग बदलली गेली आहे, काय झालंय बघ तर..”

 

आवाज ऐकून सुरजचे वडील आणि सूरज तिकडे जातात आणि फ्रिजची बटणं चेक करू लागतात. सूरज ते करत असतानाच परेश चा फोन येतो..सूरज एका हाताने फ्रीजमध्ये बोटं घालत असतो आणि दुसऱ्या हाताने मोबाईल पकडून परेश सोबत बोलत असतो. 

 

“हॅलो सूरज..काय मग कुठपर्यंत आलं काम?”

 

“अरे तुलाच फोन करणार होतो, मक्याचं पीक घ्यायचा विचार आहे, जरा माहिती पाठव ना..”

 

बोलत असताना नेटवर्क खराब असतं, मधले बरेच शब्द गाळून ऐकू जात असतं..

 

“हॅलो…काय म्हणालास? आवाज येत नाहीये..”

 

“अरे मक्याचं पीक…कॉर्न..कॉर्न…माहिती पाठव..”

 

“परेशला कॉ ऐवजी पॉ ऐकू येतं… आणि पाठव हा एकच शब्द ऐकू येतो..”

 

परेश फोन ठेवतो आणि विचार करतो..

 

“विनाशकाले विपरीत बुद्धी..याला कशाला पाहायचंय ते…शी..पण त्याने सांगितलं आहे म्हटल्यावर पाठवावं तर लागेल..नाहीतर माझ्या उरावर बसेल तो..”

 

परेश कुठूनतरी व्हिडीओ घेऊन परेशला पाठवायला लागतो..सूरजला दोन्ही हात फ्रीजमध्ये टाकायचे असतात म्हणून तो फोन वडिलांकडे देतो..

 

“पप्पा पकडा हो दोन मिनिटं..”

 

सुरजचे वडील फोन घेतात. परेशने केलेले मेसेजेस धडाधड फोनवर येऊ लागतात. वडिलांचं लक्ष जातं.. ते परेशला काहीतरी रिप्लाय करतात आणि फोन फ्रिजवर ठेऊन देतात..

सूरज फ्रिजची सेटिंग नीट करून पुन्हा त्याच्या खोलीत येऊन बसतो. परेशला पुन्हा फोन लावतो..

 

“अरे मी म्हणत होतो की मला मक्याचं पीक घ्यायचं आहे तर माहिती पाठव मला..”

 

“हो कळलं मला, आधी मी वेगळंच ऐकलेलं..तू मेसेज केलास म्हणून कळलं, तोवर व्हिडिओ पाठवले गेले होते..”

 

“मेसेज? तुझ्याशी बोलून झाल्यावर मी कसलेही मेसेज केले नव्हते..”

 

“असं काय करतोस, मी व्हिडीओ पाठवल्या नंतर तुझा रिप्लायही आलेला..”

 

सुरजच्या लक्षात येतं की फोन वडिलांजवळ होता, तो पटकन फोन कट करतो आणि मेसेजेस बघतो..ते पाहुन त्याला हसावं की रडावं समजतच नव्हतं, त्यात वडिलांनी दिलेला रिप्लाय त्याने पाहिला..

 

“C आणि P मध्ये गोंधळ केलास तू..”

 

सूरज डोक्याला हात लावून बसतो.

 

________

 

चार दिवसात सुरज आपल्या बॅग्स पॅक करतो. आई सूरजसाठी लाडू, शंकरपाळे बनवून देते. तिकडे कोमलचे वडील सुरजची राहण्याची व्यवस्था करून ठेवतात. कोमलला इकडे शहरात राहणं भाग होतं, तिचा जॉब शहरात होता..गावी जाण्याआधी सूरज कोमलची भेट घेतो..

 

“सूरज, खरंच चॅलेंजिंग काम आहे, खूप संयम लागतो या कामाला..”

 

“चिल मार, फुल्ल एन्जॉय करणार मी…फिल्ड वर्क, नो डेडलाईन, नो प्रेशर..मजा येणारे. “

 

“ए हॅलो, शेतीकाम इतकं सोपं वाटलं का तुला? तुम्हाला at least डेडलाईन तरी माहीत असते, शेतीला तर निसर्ग अशी लाईन दाखवतो की पिकं डायरेक्ट डेड.. फिल्ड वर्क म्हणजे पिकनिक नसेल, उन्हात घाम गाळावा लागेल, आणि कर्ज काढून पीक घ्यायची वेळ येईल तेव्हा समजेल प्रेशर काय असतं ते..”

 

“Okk.. ok…मी मॅनेज करेल..”

 

कोमलला सुरजची खरंतर दया येत होती, सुरजला जाणीव नसली तरी त्याच्या पुढ्यात काय येणार आहे हे तिला ठाऊक होतं.

 

“सूरज तू तर जाशील पण मी खूप मिस करेल तुला..”

 

“म्हणून तर तुझ्या घराजवळ जातोय, तू गावी आलीस की आपली भेट होईलच..”

 

“हो..पण इथे नेहमी भेटता यायचं, तिकडे गेलास की भेटी कमी होतील..”

 

“आता हे काम झालं की लवकरच साखरपुडा उरकून घेऊ..”

 

कोमल तिचं हसू लपवण्याचा प्रयत्न करते पण शेवटी तिच्या मनाला झालेल्या गुदगुल्या तिच्या हसण्यातून बाहेर येतातच.

 

सुरजला कोमलच्या वडिलांचा फोन येतो..

 

“हॅलो काका, मी येतोय संध्याकाळी..”

 

“सूरज, अहो एक गडबड झालीये..”

 

“काय?”

 

“ज्या आजीबाईंची जमीन घेणार होतो त्यांना देवाज्ञा झाली, आता त्यांच्या सर्व कार्यक्रम तिथे होईल, आणि बहुदा मुलं ती जमीन विकून टाकतील आता..”

 

सूरजला चिंता वाटू लागते, सगळी तयारी झाली होती, बॉसलाही कळवून झालेलं..

 

“पण काळजी करू नका, जातेगाव म्हणून एक गाव आहे..थोडं दूर आहे, तिथे माझा मित्र राहतो, त्याच्याकडे भरपूर जमीन आहे, तो देऊ शकतो जमीन भाड्याने..”

 

सुरजला कोमलसाठी तिच्याच घराजवळ जागा हवी होती, पण आता या क्षणाला हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता. परेश सोबत नसल्याने त्याची कमी जाणवत होतीच..अखेर सूरज कोमलच्या वडिलांनी सुचवलेल्या गावी जायला निघाला. आई वडिलांचा आशिर्वाद घेतला आणि त्याची कार काढून तो गावी निघाला. 

 

कोमलच्या वडिलांनी दिलेल्या पत्त्यावर तो जात होता, पण हायवेवर त्याचा गोंधळ झाला..त्याने एका ठिकाणी गाडी थांबवून एकाला पत्ता विचारला..

 

“हॅलो, हे जातेगाव कुठे आहे सांगू शकाल??”

 

तो माणूस सुरजकडे खालून वर बघत होता, जसं काही एलियनच या पृथ्वीवर अवतरतला आहे..

 

“हेच की ओ जातेगाव..कुठं जायचय?”

 

“हे अण्णा पाटील म्हणून आहेत त्यांच्या शेतात..”

 

“अण्णा व्हय..चला मी बी येतो..”

 

असं म्हणत तो माणूस गाडीत बसला, सुरजला विचित्रच वाटलं, त्याने आपला मोबाईल आणि पाकीट बाजूला ठेवलं आणि गाडी सूरु करून तो माणूस सांगतो त्याप्रमाणे जाऊ लागला. जातेगावमधली जत्रा खूप प्रसिद्ध. हे गाव अगदी टिपिकल खेडेगाव होतं, मातीची घरं, घराबाहेर दुधदुभती जनावरं, मळक्या शर्ट वर अंगणात रेंगाळणारी लहान मुलं, डोक्यावर पदर घेऊन वावरणाऱ्या स्त्रिया, डोक्यावर पांढरी टोपी आणि पांढरा सदरा असलेली वृद्ध मंडळी..मध्यभागी एखादं घर आणि त्याच्या चहुबाजूंनी हिरवीगार शेती, गुरांसाठी आणलेल्या चाऱ्याचे ढीग..हे सगळं सूरज डोळ्यात साठवत होता. शांत वातावरण, हिरवेगार रान..शहरात हे सगळं मिळणार नव्हतंच.. 

 

त्या माणसाने एका ठिकाणी गाडी थांबवायला लावली आणि ती गाडीतून उतरला..हे आहे अण्णा पाटलांचं घर आणि मी आहे अण्णा पाटील..

 

“ओह..अच्छा..तुम्हीच काय? मला आधी का नाही सांगितलं??”

 

“जावईबापू, आम्हीही फिरकी घेत असतो बरं का…”

 

सूरज हसला..अण्णा पाटलांनी त्याला जमीन दाखवली आणि राहण्यास एक छोटीशी खोली दाखवली.. खोलीत शिरताच सुरजने नाकाला हात लावला..अण्णा पाटील कधी कधी त्यांच्या बकऱ्या तिथे बांधून ठेवत, मातीचं छोटंसं घर, शेजारी एक चूल, भिंतीही मातीच्याच…अंघोळीला शेजारीच एक ओपन जागा..

 याशिवाय तिथे काहीही नव्हतं.

 

“ही एवढीच जागा आहे?”

 

“हो…हा पण एका गोष्टीसाठी तुम्हाला भरपूर मोकळी जागा मिळणार आहे..”

 

“कशासाठी?”

 

अण्णा पाटील फक्त हसले आणि निघून गेले. सुरजच्या डोक्यात उशिरा प्रकाश पडला..

 

“Ohh shitt… म्हणजे उघड्यावर बसायचं? No way.. मी परत जातो..”

 

सगळं बघून सुरजला कधी इथून बाहेर निघतो असं झालं..तो बाहेर आला, आजूबाजूला बघत असतानाच एका ठिकाणी त्याला गर्दी दिसली. तो थोडा जवळ गेला आणि एकाला त्याने कारण विचारलं..

 

“साहेब, यावेळी अवकाळी पावसाने शेतकऱ्याचा जीव घेतला हो…तिथे सदू राहतो, पीक नाही म्हणून फास लावायचा प्रयत्न केला त्याने, बरं एकाने पाहिलं अन वाचला तो..”

 

सुरजचं मन हेलावून गेलं, जो शेतकरी जगाचं पोषण करतो त्याच्यावर ही वेळ यावी? आपण तिकडे शहरात किती आनंदाने राहतो, किती सुखसोयी आपल्या पदरात असतात आणि एक शेतकरी मात्र…नाही, मला इथेच रहावं लागेल…या शेतकऱ्यांसाठीच काहीतरी करावं लागेल… तो पुन्हा आत जातो..

 

“सुऱ्या…ए सुऱ्या..”

 

सूरज कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करतो..

 

“छे… पऱ्याचा आवाज घुमतोय माझ्या कानात..”

 

“सुऱ्या…”

 

आवाज काही बंद होत नाही, सूरज बाहेर येतो…समोरून परेश धाप टाकत येत असतो..

 

क्रमशः

 

 

 

3 thoughts on “तुही है आशिकी (भाग 19)”

Leave a Comment