तुही है आशिकी (भाग 18)

 

 

 

#तुही_है_आशिकी (भाग 18)

कुठे दुर्बुद्धी झाली अन याला गीतेतील उदाहरण दिलं असं परेशला झालं. सूरज पूर्ण तयार होता कोमलच्या घराशेजारी जाऊन शेती करायला. परेशला सुरवातीला खोटं वाटलेलं पण सूरज खूपच सिरीयस होता याबाबत.

“सुऱ्या शेतीकाम इतकं सोपं वाटतं का तुला? आणि इथल्या जॉब चं काय? आई वडिलांना काय सांगशील?”

“ते मी बघून घेईन..तू कुठलं काम करशील ते सांग आधी…बकऱ्या वाळायचं की म्हैस धुवायचं??”

“चल येतो मी..”

“पऱ्या थांब..”

“सुऱ्या तुला चांगला जॉब आहे, माझं माहितीये ना तुला..नोकरी सोडून बँकेची परीक्षा देतोय मी..त्यात पास झालो नाही तर नोकरीही नाही आणि समीक्ष…म्हणजे छोकरीही नाही..”

“समी??. काय बोललास तू?”

“काही नाही..सोड…जाऊदे मला..”

सूरज ने इमोशनल ब्लॅकमेल करायच्या आत परेश तिथून पळ काढायचा प्रयत्न करतो.

“पऱ्या…”

सूरज आवाज देत राहतो आणि परेश जोरात पळ काढतो..सुरजचे आई वडील विचारतात..

“आता काय नवीन?”

“आई, बाबा…मला शेती करायची आहे..”

“हा मुलगा वेडा झालाय…नक्कीच कोमलसाठी हे असलं डोक्यात आणलं असेल. हे बघ सूरज, तू कोमलवर प्रेम करतोस ते ठीक आहे पण म्हणून असले वेडेचाळे?”

“आई बरोबर बोलतेय सूरज..हे काय डोक्यात आणलंय नवीन?”

“आई बाबा..मी काय सांगतो ते नीट ऐका. हे फक्त कोमलसाठी करत नाहीये मी. आम्ही कंपनीत एक सॉफ्टवेअर प्रोजेक्ट बनवतो आहोत.. त्यासाठी प्रॅक्टिकली काम केलं तर आम्हाला खूप फायदा होईल..”

“हे बघ सुरज, तुझ्या फिल्ड मध्ये मीही काम केलंय. तुझं काम प्रोजेक्ट साठी requirements गोळा करण्याचं आहे, जे तू इंटरनेट वरून शोधूनही काढू शकतो..”

“पण बाबा..”

आई वडील सरळ सरळ नाही सांगतात.सूरज हताश होतो.

दुसऱ्या दिवशी कंपनीत एक मिटिंग होते. सुरजकडे शेतकऱ्याच्या प्रोजेक्ट ची जबाबदारी दिली जाते. या प्रोजेक्ट बद्दल एक मोठी मिटिंग आज ऑफिसमध्ये होणार असते. सर्वजण कॉन्फरन्स रूम मध्ये जमतात. प्रोजेक्ट बद्दल सविस्तर चर्चा होते. सूरज पुढे होऊन प्रेझेन्टेशन सादर करतो.

“आपल्या देशात अवकाळी पाऊस, रोपांवर पडणारी कीड, पाण्याचा अभाव आणि योग्य हमीभाव न मिळणे यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागत आहे. आपल्याला यावरच आधारित एक सॉफ्टवेअर तयार करायचं आहे जे तज्ज्ञांची मदत घेऊन अचूक प्रेडिक्शन करू शकेल..”

“मिस्टर सुरज यासाठी काय काय आयडियाज आहेत तुमच्या..?”

“आपण जे सॉफ्टवेअर बनवणार आहोत ते embedded सॉफ्टवेअर असेल, म्हणजे त्यात आपण अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरणार आहोत. जसे की सेन्सर. वातावरणात किती तापमान आहे, या तापमानात कुठलं पीक योग्य असेल, पीक घेतल्यानंतर वातावरणात बदल झाला तर कुठली कीड पडू शकते, त्यावर कुठलं किटनाशक योग्य असेल, टाइम एस्टीमेट करून कुठली वेळ पिकाच्या फवारणीसाठी योग्य हे सगळं त्यात असेल. इतकंच नाही तर वातावरण नियंत्रित ठेवणारे आणि अवकाळी पावसाचा फटका बसणार नाही असेही तंत्रज्ञान आम्ही अमलात आणू..”

सुरजचं हे ऐकून सर्वजण टाळ्या वाजवू लागले. पण मुख्य कलाइन्ट्ला अजूनही शंका होत्या. सुरजच्या बॉस ला टेन्शन आलं, ही कंपनी म्हणजे एक नावाजलेली कंपनी होती आणि आतापर्यंतचं सर्वात मोठं कॉन्ट्रॅक्ट कंपनीला मिळणार होतं. हा प्रोजेक्ट काहीही करून त्यांना हवा होता. सूरज हरप्रकारे त्यांना समजावत होता पण त्यांना अजूनही पूर्णपणे विश्वास नव्हता. ती कंपनी आपल्या प्रोडक्ट बाबत खूप सजग होती.त्यांना तसूभरही चूक चालत नसे, पूर्ण रिसर्च शिवाय हे काम ते कुणालाही देत नसत. प्रेझेंटेशन झाल्यावर सुरजच्या बॉस ने कलाइन्ट् ला त्यांचा निर्णय विचारला..

“सर, काय मत आहे तुमचं यावर?”

“Well.. हे बघा तुम्ही खूप छान प्रेझेंटेशन दिलंत, पण सॉफ्टवेअर बनवण्यासाठी जी बारीकसारीक माहिती लागेल ती कशी जमा करणार तुम्ही?”

“माझे अनेक शेतकऱ्यांशी संबंध आहेत, त्यांच्याकडून माहिती मिळवेल मी..”

“शेतकरी भरपूर आहेत, काहींना अतोनात नुकसान होतं तर काही लाखो रुपये कमवतात. प्रत्येकजण वेगळी माहिती देईल..तुम्ही कसं सॉर्ट करणार ते सगळं?”

“सर मग तुमची काय अपेक्षा आहे?”

“खरं तर मला अशी टीम हवी आहे जिला शेतीबद्दल प्रॅक्टिकल नॉलेज असेल, ज्यांनी स्वतः फिल्ड वर काम केलं असेल..”

सुरजचा बॉस डोक्यावर हात मारून घेतो. असा कोणता माणूस असेल जो शेती करून मोठ्या कंपनीत कामाला असेल? कलाइन्ट्स च्या अवास्तव अपेक्षा आहेत समजताच सुरजचा बॉस नाद सोडून देतो..

“Ok sir, hope you find the desirable candidate..Thank you..”

कलाइन्ट् हे कॉन्ट्रॅक्ट न करण्याचा विचार करत उठायला लागतो, तोच सूरज त्यांना म्हणतो..

“सर तुम्हाला शेतीतील अनुभव घेऊन आलेला माणूस चालणार आहे का?”

“ऑफ कोर्स…त्यासाठीच तर मी वेगवेगळ्या कंपन्यांशी बोलतोय..”

“सर पण आत्ता इथला एखादा माणूस स्वतः शेती करून अनुभव घेणार असेल आणि त्याचा वापर आपल्या सॉफ्टवेअर साठी करणार असेल तर??”

“हाहा..कोण करेल असं, तुम्ही सगळी कार्पोरेट एम्प्लॉयी.. मातीत काम करायला कोण तयार होईल?”

“मी तयार आहे सर, स्वतः फिल्ड वर जाऊन शेती करून अनुभव घेईन आणि मगच या प्रोजेक्टवर काम करेल..”

“Are you serious Mr. Suraj?”

“Yes sir, I am damn serious..”

सुरजचा बॉस फक्त बघत राहतो..

“ठीक आहे मग मिस्टर सूरज, तुम्ही जे काम कराल ते या प्रोजेक्टचाच एक भाग आहे असं मी समजेन आणि हे कॉन्ट्रॅक्ट आम्ही तुम्हाला देतो..माझे वकील उद्या येऊन लीगल प्रक्रिया पूर्ण करतील..”

“Thank you सो मच सर..”

कलाइन्ट् आणि त्याची टीम निघून जाते. सुरजचा बॉस सुरजवर खुश होतो..

“याला म्हणतात डेडिकेशन.. सूरज, आज दिल खुश कर दिया तुने..तू जेवढे दिवस शेती करशील त्या त्या महिन्याचा पगार तुला नेहमीप्रमाणे दरमहा मिळत जाईल..खूप मोठं काम केलंस तू आज..पण शेतीतला अनुभव कसा आणि कुठे घेणार?”

“मी मॅनेज करेल सर..”

सूरज हसून उत्तर देतो.ऑफिस सुटतं आणि सूरज परेशला फोन लावत लावत पार्किंग मध्ये येतो..

“बोल सुऱ्या..”

“पऱ्या…अगर किसी चीज़ को दिल से चाहो तो सारी कायनात उसे तुम से मिलाने में लग जाती है..”

“म्हणजे?”

“म्हणजे तू आणि घरच्यांची मिळून मला वेडा ठरवलं होतं ना? मी वेडेपणा करतोय म्हणून? पण आता कंपनीच मला शेती करायला पाठवते आहे..”

“काहीही काय बोलतोय..”

सूरज परेशला सगळी हकीकत सांगतो..

“ठीक आहे सुऱ्या.. जा तू..माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठिशी असतील..”

“मला तुझा आशीर्वाद नको, पूर्णच्या पूर्ण तू हवा आहेस..”

परेश फोन ठेऊन देतो. घरी आल्यावर जेव्हा तो सांगतो की हा पर्याय मला कंपनीनेच दिला आहे आणि त्या काळात पूर्ण पगारही मिळणार आहे म्हटल्यावर घरच्यांनी विरोध करायचा प्रश्नच उरला नाही.

___

“परेश कुठे गेला होतास?”

“सूरज कडे..”

“काही शिक तुझ्या मित्राकडून..नोकरीला आहे, चांगला पगार आहे आणि आता लग्नही करतोय..तू त्याच्याच वयाचा ना? मग तू कधी पुढे जाणार? आपलं घर पाहिलंय? इन मिन 3 खोल्या त्यात सहा माणसं राहतात..खूप स्वप्न पहिली आहेत तुझ्या भरवश्यावर.. आणि तू पाहिजे तेव्हा त्या सुरजकडे..”

“सगळं होईल आई.आता मी बँकेची परीक्षा पास झालो ना की सगळं नीट होईल..आपण नवीन घर घेऊ..”

क्रमशः

 

3 thoughts on “तुही है आशिकी (भाग 18)”

Leave a Comment