तुही है आशिकी (भाग 16)

भाग 

 

 अभिनवला डोळ्यासमोर आता एकच गोष्ट दिसत होती, ती म्हणजे सूरज आणि कोमलचा बदला घ्यायची. कोमलने नकार दिल्यामुळे त्याचं सर्व प्लॅनिंग फिस्कटलं होतं आणि त्यात सुरज आणि परेशने चोपल्यामुळे तो अजूनच चिडला होता. त्याला कोमलच्या घरात काय काय घडतं याची पूर्ण खबर ठेवायची होती. त्याने कोमलच्या वडिलांच्या शेतात काम करणाऱ्या एका मजुराला पैसे देऊन कामाला लावलं, आणि आता घरात घडणारी हरएक खबर त्याला हवी होती. खरं तर हे सगळं सोडून त्याला अमेरिकेला जाणं खूप सोपं होतं, पण कोमल आणि तिच्या बहिणींना नेल्याशिवाय त्याचं काम तिकडे होणार नव्हतं. का? ते समजेलच पुढे…

 

कोमलच्या बहिणी आता शिक्षणासाठी हॉस्टेलवर रहात होत्या. गावाकडून अचानक शहरात आल्याने सुरवातीला त्यांना थोडसं अवघड गेलं, पण हळूहळू त्या रमू लागल्या. सुरजची कायम त्या रस्त्यानेच ये जा असायची, काही लागलं तर सूरज मदतीला असायचाच, सुट्टीच्या दिवशी कोमल त्यांच्या हॉस्टेलवर जाऊन चौकशी करून येत असायची. 

 

सर्वांचं रुटीन सुरळीत सुरू होतं. एकदा कोमलला घरून आईचा फोन आला, कोमलने कर्जाबद्दल चौकशी केली..तेव्हा आईने सांगितलं..

 

“काळजी करू नकोस, यावेळी उत्पन्न खूप चांगलं येईल..आता कापणी झाली की शेतमाल विकून भरपूर पैसे येतील, त्यातून पूर्ण कर्ज फेडता येईल..”

 

कोमलला हायसं वाटलं, जर कर्ज पूर्ण फेडलं गेलं तर मला सुरजसोबत लग्नानंतर लगेच जाता येईल, पाच वर्ष दूर राहण्याची गरज राहणार नाही. कोमलच्या मनावरचं खूप मोठं ओझं दूर झालं. 

 

सुरजच्या ऑफिसमध्ये एक नवीन कलाइन्ट् आलेला, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासाठी भाव मिळेल असं सॉफ्टवेअर त्याला बनवायचं होतं. त्यासाठी कुठे किती आणि कोणतं पीक घेतलं जातंय याची माहिती घेऊन सगळा डेटा काम करणार होता. सुरजला हे सगळं ऐकत असताना कोमलच्या वडिलांची आठवण झाली. कलाइन्ट् बोलत होता…

 

“साहेब, नवनवीन शोध लागताय..नवनवीन कल्पना जन्माला येताय पण जगाचा पोशिंदा शेतकरी, त्याच्यासाठी कोण काय करतं? सरकारनेच सगळं करावं असं का वाटतं लोकांना? सामाजिक बांधिलकी म्हणून आपणही काहीतरी केलं पाहिजे…निदान काही आत्महत्या रोखता आल्या तरी पुष्कळ आहे..”

 

सुरजला ही कन्सेप्ट खूप आवडली, त्याने यावर काम करायचं ठरवलं. याचा फायदा होणाऱ्या सासरेबुवांना झाला तर चांगलंच. या प्रोजेक्ट ची अजून माहिती कोमलकडून चांगली मिळेल म्हणून त्यांनी परत एकदा भेटायचं ठरवलं. पण कोमलला जास्त वेळ ऑओस असल्याने ते भेटू शकले नाही, दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने दोघांनी दिवसभर बाहेर फिरण्याचं प्लॅनिंग केलं. 

 

थंडी हळूहळू ओसरू लागली होती. वातावरण आल्हाददायक होतं. सूरज आणि कोमल सकाळी नऊ वाजताच बाहेर पडले. सूरज त्याची कार घेऊन कोमलकडे आला, कोमल तोवर छान तयार झाली होती. निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस, त्यावर सुंदरशी ओढणी, केसांची नाजूकशी सागरवेणी..आज ती खूपच सुंदर दिसत होती. सकाळच्या मंगलसमयी स्त्री चं लावण्य जास्त खुलून दिसतं हे खोटं नाही. 

 

“गुड मॉर्निंग… बोला मॅडम कुठे जायचं..”

 

“मला वाटलं तू ठरवलं असशील..”

 

“तसं तर शहरातली सगळी ठिकाणं फिरून झाली आहेत, एक ठिकाण आहे अजून, बघ तुला आवडेल का..”

 

“कुठलं?”

 

“हायवेच्या बाजूला छानसे लहान लहान डोंगर आहेत, उंचावर चढलं की छान गारवा जाणवतो, मस्त वातावरण आहे..”

 

“चालेल मग जाऊया की..”

 

“त्याआधी काहीतरी नाश्ता करूया..”

 

दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये जातात. तिथे सुरजला त्याच्या कॉलेजचा ग्रुप दिसतो. त्यांची आपापसात चर्चा सुरू असते..एकीच्या मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो त्यावरच सर्वजण चर्चा करत असतात.. सोल्युशन काढत असतात…. अश्यातच सूरज आणि कोमल तिथे येतात.. सुरजला बघून सगळे आनंदित होतात. ग्रुपमध्ये काही मुलीही असतात.. सूरज त्या सर्वांशी कोमलची ओळख करून देतो आणि आपल्या कॉलेजच्या आठवणींना उजाळा देत बोलत बसतो. कोमल त्यांच्या बोलण्यात व्यत्यय नको म्हणून बाजूच्या टेबलवर जाऊन बसते. त्या ग्रुपमध्ये एक वात्रट मुलगी असते..कुठे काय बोलावं याचं भान तिला नसतं.. आणि कॉलेजमध्ये असताना सूरज तिचा क्रश होता, त्यामुळे त्याला असं जोडीने आलेलं पाहून तिला ईर्षा वाटू लागलेली..

 

“सूरज, आम्हाला वाटलं एखादी स्मार्ट, मॉडर्न मुलगी करशील म्हणून..पण तू तर गावाकडची गावठी मुलगी पाहिलीस..”

 

तिच्या अश्या बोलण्याने खरं तर सर्वांना राग आला, आणि हे बोलणं कोमलला ऐकू जाईल असंच ती बोललेली. कोमलच्या स्वाभिमानवर झालेला हा आघात होता. उगाच तमाशा नको म्हणून कोमलने सुरवातीला मौन बाळगलं..पण त्या मुलीचं सुरूच होतं..

 

“अरे अश्या गावाकडच्या मुली पैसेवाला बघून मुलाला आपल्या जाळ्यात ओढतात..स्वतः काही कमवायला नको, मग हौसमौज करण्यासाठी कोण? तर नवरा..”

 

सूरज प्रचंड संतापतो..पण तो काही बोलायच्या आत कोमल तिथे येते आणि त्या मुलीला सुनवते..

 

“गावठीपणाचा इतका तिरस्कार का गं तुला? घरात अंडी खात असाल तर ती गावठी मागवतात, चिकन मटण हवं ते गावठी कोंबडीचं, लसूण हवाय? गावठी पाहिजे.. भाजीपाला? गावठीच पाहिजे..धान्य, फळं, भाजीपाला सगळं गावठी हवं.. मग गावठी माणसांची ऍलर्जी का तुम्हाला? लोकांना गावठी का आवडतं माहितीये? कारण त्यात मायेचा ओलावा असतो, शुद्धता असते, कुठलीही स्वार्थी भेसळ नसते. आणि हो, ज्या रेस्टॉरंट मध्ये बसलाय ना त्याचं नाव वाचलंय? गावरान चव असं नाव आहे..आणि बाय द वे तुमच्या मोबाईल चा प्रॉब्लेम झालाय ना? एक app क्रॅश होतंय ना सारखं? एक काम करा ते अपडेट करा, सुरू होईल..आणि हो, मी गावाकडची आहे..पण हे जे माझे हात आहेत ना..हे शेतात खुरपणीही करतात आणि बँकिंग सारख्या अवघड सिस्टिमची प्रोग्रामिंगही करतात.. आम्ही आतून खूप सामर्थ्यवान असतो..तुमच्यासारख्या दिखावा करत नाही इतकंच.”

 

कोमल एवढं बोलून सुरजचा हात धरून तिथून बाहेर पडते..त्या ग्रुपमधल्या मुलीला कुठे तोंड लपवू अन कुठे नको असं झालं. एका क्षणात त्या मुलीचा अहंकार कोमलने हाणून पाडला होता.

 

दुसऱ्या एका रेस्टॉरंट मध्ये दोघेही नाश्ता करतात..

 

“कोमल सॉरी, माझ्या मित्रांमध्ये तुझा अपमान झाला..”

 

“तुझी काही चूक नाही सूरज. असतात काही लोकं विचित्र..”

 

“हो पण तू मात्र एका झटक्यात तिला गप केलंस हा, मानलं तुला..”

 

हे बोलत असतानाच आकाशात काळे ढग जमायला लागतात..हलकीशी वीज चमकू लागते.. मोठा पाऊस पडणार असा संकेत येऊ लागतो..सुरजला असं वातावरण खूप आवडायचं, त्यात आता कोमल सोबत..वातावरण एकदम रोमँटिक.. आणि सूरज तर आज जरा जास्तच रोमँटिक मूड मध्ये आलेला..

 

वातावरण असं झालं की कुणीही त्यात स्वतःला विसरून जाईल, उन्हाच्या झळा जाऊन गार वारा अंगाला झोंबु लागला..झाडं झुडपं वाऱ्यावर खिदळू लागली..पक्षी आकाशात वेगाने उडू लागले..दोघेही नाष्टा करून गाडीत बसले आणि सूरजने हायवे च्या बाजूला असलेल्या डोंगरासमोर गाडी थांबवली..दोघेही डोंगरावर गेले..

 

एकीकडे सूरज असं वातावरण झालं म्हणून खूपच आनंदी होता..दुसरीकडे कोमलची धडधड वाढू लागली.. अवकाळी पाऊस म्हणजे काय असतं हे कोमलला चांगलंच माहीत होतं.. सुरजला काय कळणार हे सगळं? त्याच्यासाठी वातावरणात झालेला हा बदल म्हणजे फक्त अनपेक्षित एन्जॉयमेंट होती..

 

कोमल मनोमन प्रार्थना करत होती,

 

“देवा पाऊस नको पडू देऊस..प्लिज..”

 

आणि दुसरीकडे सूरज गाणी म्हणू लागला..

 

“मोहोब्बत बरसा देना तू..सावन आया है..”

 

सूरज शांत बस..प्लिज…पाऊस नको पडायला आता..

 

“का नको? अशी संधी पुन्हा नाही..आज पावसात आपण दोघे मनसोक्त भिजायचं..मोहोब्बत बरसा देना..”

 

“सूरज प्लिज..”

 

हे सगळं चालू असताना अचानक जोरदार पाऊस सुरू होतो.. सूरज आनंदाने उड्या मारायला लागतो.. आणि कोमल निराश होऊन धपकन खाली कोसळते…

 

क्रमशः

 

 

1 thought on “तुही है आशिकी (भाग 16)”

Leave a Comment