तुही है आशिकी (भाग 15)

 भ

सुरजच्या वाढदिवसची बातमी पेपरमध्ये येताच त्याला एकावर एक फोन येऊ लागले. त्याचा शाळा, कॉलेजच्या whastapp ग्रुप वर फोटो शेयर झाले..एकेकाला उत्तर देता देता त्याच्या नाकी नऊ आले. 

 

“माझं स्वप्न होतं की माझ्या मुलाचं नाव एकदा तरी पेपरमध्ये छापून यावं..आज तेही स्वप्न पूर्ण झालं..”

 

वडीलांनीही सुरजला सोडलं नाही..पण हा उपद्व्याप कुणी केला हे काही समजेना. तिकडे कोमल सुरजच्या वाढदिवसासाठी काय करावं या विचारात होती. तिच्यापर्यंत ही पेपरमधली बातमी पोहोचली आणि हे कुणी केलं असावं हेही तिला समजलं. तिलाही हसू आवरेना..

 

सूरज आणि कोमल दोघांनाही ऑफिस होतं. ऑफिस सुटल्यानंतर सर्वजण सुरजच्या घरी जाणार होते..परेश, समिधा यांनाही सांगण्यात आलं. सुरज ऑफिसमध्ये तोंड लपवत गेला..ऑफिसमध्ये त्याचे मित्र त्याला शुभेच्छा देऊ लागले.. ऑफिसमध्ये कुणाला हे समजलं नाही म्हणून सुरजला हायसं वाटलं. तो त्याच्या कामाला लागला.त्याच्या केबिन समोर काही ग्राहक बसले होते, ऑफिसमध्ये त्यांचं काम असायचं. त्यातल्या एकाने समोर ठेवलेला पेपर हातात घेतला. त्या वाढदिवसाच्या बातमीकडे त्याचं लक्ष गेलं, ते नाव त्याने वाचलं आणि समोर सुरजच्या केबिनमध्ये टेबलवर असलेल्या सुरजच्या नेम प्लेट वरचही नाव त्याने वाचलं. तो गोंधळला.. पण विचारावं कसं?

 

लंच ब्रेक साठी सर्वजण बाहेर आले. एकाने सुरजला शुभेच्छा दिल्या तसा तो माणूस म्हणाला..

 

“साहेब तुमच्या नावाच्या लोकांचा वाढदिवस आजच असतो वाटतं..”

 

“म्हणजे?”

 

ऑफिसमध्ये सर्वजण त्या माणसाला विचारू लागले..त्याने सर्वांना पेपर दाखवला..

 

“हे बघा..आज साहेबांचाही वाढदिवस आणि सेम नाव असलेल्या या लहान मुलाचाही वाढदिवस..”

 

सर्वांनी पेपरमध्ये पाहिलं, त्यांच्या लक्षात आलं की हा सुरजचाच फोटो आहे..ऑफिसमध्ये एकच गलका झाला..

 

“साहेबांना पेपरमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा छापून आल्या रे..”

 

सर्वजण पोट धरून हसत होते.. आणि अश्या प्रकारे सुरजचा वाढदिवस संस्मरणीय झाला..

 

_____

 

संध्याकाळी घरी परेश, समिधा आणि कोमल सर्वजण जमले. सूरज ऑफिसमधून यायच्या आधीच सर्वांनी टेरेसवर छान तयारी करून ठेवली. फुग्यांची सजावट करण्यात आली, कोमलने छानसा केक मागवून घेतला..समिधाने भावासाठी छानसे कपडे घेऊन ठेवले.

 

सूरज घरी आला आणि या सर्वांना घरी बघून त्याला आनंद झाला.  समिधाने भावाला नवीन कपडे दिले आणि हातपाय धुवून तयारी करून वर ये असं सांगितलं. तो वर येईपर्यंत आई, बाबा, कोमल, समिधा आणि परेश वर थांबले. सूरज वर येताच त्याने सगळी तयारी पाहिली. तो खुश झाला..मग केक कापण्यात आला..सुरजने केक कापून तो तुकडा उचलला आणि आता मात्र तो संभ्रमात पडला…एकीकडे होणारी बायको कोमल आणि दुसरीकडे जिवाभावाचा मित्र परेश.. आजवर त्याने पहिला घास फक्त परेशला खाऊ घातलेला…पण आता कोमल त्याच्या आयुष्यात आली होती, जर परेशला घास खाऊ घातला तर तिला काय वाटेल? आणि कोमलला खाऊ घातला तर परेश नाराज होईल…काय करावं? त्याने केकचा तुकडा हातात घेतला अन हातातच ठेवला..कोमलला त्याची मनस्थिती समजली..तिने त्याचा हात धरला आणि परेशच्या तोंडाजवळ नेला…परेशलाही सुरजचा गोंधळ समजला होता. त्याने हात अडवला आणि कोमलच्या तोंडाजवळ नेला…दोघेही समजूतदारपणा दाखवत होते..शेवटी सूरज वैतागला..हातातला घास त्याने पटकन तोंडात टाकला..

 

“आता उरलेला केक ज्याला हवा त्याने स्वतःच्या हाताने घेऊन टाकावा..”

 

असं म्हणत त्याने स्वतःची सुटका करून घेतली..

 

कोमलने सुरजसाठी आणलेलं गिफ्ट त्याला दिलं. एक सुंदर वाचनीय पुस्तक त्यात होतं. गिफ्ट वरून कोमलचा स्वभाव दिसून येत होता..शोभेच्या वस्तूपेक्षा व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयोगात येईल असं काहीतरी तिने दिलं होतं. परेशनेही एका बॉक्स मध्ये गिफ्ट पेपर wrap करून सुरजला दिलं.. सुरजला कुतुहल होतं परेश काय देईल म्हणून..बॉक्स उघडताच त्याला त्या वाढदिवसाच्या बातमीचं कात्रण मिळतं.. सूरज दोन मिनिटं बघतच राहतो आणि मग त्याची एकदम ट्यूब पेटते. केक कापण्याची सूरी घेऊन तो परेशच्या मागे पळतो आणि दोघेही घरभर दंगा करतात. 

 

कोमल आणि समिधा पहिल्यांदा एकांतात बोलत असतात. समिधा अबोल, मितभाषी.. त्यामुळे कोमललाच तिला बोलतं करायचं होतं. जुजबी बोलण्यातून कोमलच्या लक्षात आलं की समिधा कुठलं तरी मोठं दुःखं घेऊन वावरतेय. सुरजला नंतर याबद्दल विचारू असं ती ठरवते. 

 

रात्री उशिरापर्यंत दंगा सुरू होता. उशीर झाल्याने सर्वांनी तिथेच मुक्काम करा असं सुरजच्या आई वडिलांनी सांगितलं. परेश सुरजच्या खोलीत झोपी गेला..आईने समिधा आणि कोमलसाठी अंथरून टाकले, समिधा झोपी गेली. सूरज आणि कोमल टेरेसवर गप्पा मारत बसले..

 

“या परेशने बघ ना किती आगाऊपणा करून ठेवला..”

 

“तुही काही कमी नाहीस, हॉटेलमधलं उरलेलं त्याला जेऊ घातलं?”

 

“तुला कळलं?”

 

“हो..म्हणून तर त्याने बदला घेतला..”

 

“असं आहे तर..”

 

“पण एक मात्र खरं, तुम्ही एकमेकांची कितीही थट्टा मस्करी केली तरी जीवाला जीव देणारे दोस्त आहात तुम्ही..”

 

“परेश म्हणजे माझ्या आयुष्याचं महत्वाचं पान आहे..एकदा कॉलेजमध्ये मला चक्कर आलेली तेव्हा खांद्यावर उचलून मला हॉस्पिटलमध्ये नेलेलं त्याने..हॉस्पिटलमध्ये पैसे लागत होते तेव्हा बोटातली सोन्याची अंगठी कसलाही विचार न करता त्याने पुढे केली.”

 

“परेशचं तुझ्या आयुष्यातलं स्थान कायम असंच असुदे.. आपल्या लग्नानंतरही तुमच्या नात्यात खंड पडू देऊ नकोस..”

 

____

 

“दादू, कोमलने नुसता नकार दिला असता तर सोडून दिलं असतं.. पण त्या पोरांनी माझा जो अपमान केलाय ना..मी बदला तर घेणार..”

 

“अभिनव अरे आता काय उरलंय? त्यांनी आपला पत्ता केव्हाच कट केलाय..”

 

“पाच वर्षे…पाच वर्ष आहेत आपल्याकडे..नाही तिला आणि तिच्या बहिणींना अमेरिकेत धंद्याला लावलं तर नाव बदलून देईल..”

 

क्रमशः

 

 

2 thoughts on “तुही है आशिकी (भाग 15)”

Leave a Comment