तुही है आशिकी (भाग 14)

 

 सुट्टी संपल्याने कोमल शहरात तिच्या रुमवर जाते. वेलेन्टाईन्स डे साजरा केल्याने तिची सुट्टी मजेत गेलेली असते. सूरजही दोघांनी एकत्र घालवलेले क्षण आठवून मनोमन आनंदी राहू लागतो. सुरजच्या घरी दरवर्षी एक पूजा असते, पूजेला सर्व नातेवाईक, मित्र मंडळींना बोलावण्यात येतं. यावेळी कोमललाही सहभागी करून घ्यायची सुरजच्या घरच्यांची ईच्छा असते. आणि लागलीच पूजे नंतर सुरजचा वाढदिवस असतो..तो सर्वांनी एकत्र साजरा करावा असं त्यांना वाटतं. सुरज मोबाईल वर त्याचा आवडता गेम खेळत असतो..आई त्याला हाक मारते..

 

“सूरज आपल्या घरी पूजा आहे चार दिवसांनी..मला जरा सामान आणून देशील का..”

 

“हो..” सूरज फक्त होकार देतो पण जागेवरून काही हलत नाही..

 

“हे बघ, नारळ..अष्टगंध, सुगंधी अगरबत्ती, प्रसादासाठी रवा, साखर… लिहून घेतोय ना?”

 

सुरजचा काहीही रिप्लाय नाही..आई वैतागते..सुरजला उठवायला काय करावं? आईच्या डोक्यात ट्यूब पेटते.. आई हळूच किचन मध्ये स्वतःशीच बोलते..

 

“मला वाटतं कोमललाही बोलवावं एक दिवस आधी..”

 

सुरजच्या कानावर ते पडताच तो मोबाईल बंद करून किचनमध्ये पळत जातो.. आई त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्याला वाटतं आई सांगेन पुन्हा..पण आई गप..

 

“आई काही म्हणालीस?”

 

“हो रे..सामान आणून दे म्हटलं..”

 

“नाही तू अजून काहीतरी बोललीस..”

 

“हा..एक दिवस आधीच सगळी तयारी करायची आहे..”

 

“नाही गं.. अजून काहीतरी म्हणालीस..”

 

“तुझे कान वाजायला लागलेत का? काय लावलंय?”

 

“कोमलला बोलवू असं काहीतरी..”

 

“कोण मी? छे..”

 

सूरज नाराज होऊन परत जायला निघतो तोच आई थांबवते..

 

“अरे एक दिवस आधीच कोमलला घरी बोलवू म्हटलं..आता तिलाच घरातल्या रीती समजल्या पाहिजेत… ती आली तर शिकून घेईल सगळं..”

 

सुरजच्या मनात उकळ्या फुटायला लागतात..कोमल पहिल्यांदा घरी येणार होती. सूरज परेश आणि समिधालाही एक दिवस आधी बोलवून घेतो. चौघे मिळून धमाल करायची असं ठरतं.

 

कोमलच्या घरी असं म्हणणं पडतं की लग्नाआधी सासरी पाय ठेवायचा नसतो. पण सुरजच्या आई वडिलांनी समजवल्यावर तेही तयार झाले.

 

पूजेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी सुरजचे वडील त्यांचा जुना अलबम घेऊन बसले. सुरजचे लहानपणीचे फोटो, त्यांनी एकत्र केलेल्या ट्रिप चे फोटो वडील कौतुकाने बघत होते. सुरजची आई तिथे आली..

 

“काय बघताय?”

 

“दिवस किती पटापट पुढे सरकतात ना, मला अजूनही सुरजचा शाळेचा पहिला दिवस आठवतो.. किती रडत होता तो..आणि नंतर इतका लळा लागला की सुट्टीच्या दिवशीही शाळेत जायचं म्हणून हट्ट करायचा..”

 

“होना..आता सुरजचं लग्न ठरलंय.. किती मोठा झाला सूरज..”

 

इतक्यात परेश त्याची बॅग घेऊन घरी येतो. 

 

“काका नमस्कार.. कसे आहात?”

 

“अरे परेश, ये ये…”

 

“हे कुठले फोटो काका?”

 

“परेशच्या लहानपणीचे फोटो आहेत..”

 

परेश सुरजचे लहानपणीचे फोटो बघतो. गोलगोमट्या सुरजला बघून परेशला हसू आवरत नाही. सुरजचा शाळेतला पासपोर्ट फोटो तो घेतो आणि विचारतो..

 

“काका हा फोटो मी घेऊ का?”

 

“घे की..”

 

सुरजला चिडवायला परेश तो फोटो घेतो आणि खिशात ठेऊन देतो. परेश सुरजला भेटायला जातो..सूरज कोमलची वाट बघत असतो..परेश तिथे जाताच सूरज उठतो. 

 

“काय रे कुठे चाललास?”

 

“कोमलला घ्यायला..स्टॉप वर थांबलीये ती..”

 

बरं बरं जा..मी बसतो इथेच..सूरज कोमलला घेऊन येतो. कोमलचे पाय घराला लागताच आईला खूप आनंद होतो. कोमल फक्त सुरजची बायको नाही तर या घराचं भविष्य असणार होती. घराची मालमत्ता जरी वडिलांकडून मुलाकडे जात असली तरी घराचं मांगल्य मात्र सासुकडूनच सुनेला जात असतं. 

 

कोमल आल्यावर सर्वांची चौकशी करते, सर्वांची खुशाली विचारते, पूजेसाठी काय काय करावं लागेल हे सुरजच्या आईला विचारून घेते आणि लागलीच कामाला लागते. तिचा कामाचा चपाटा आणि कामतली आवड बघून सुरजच्या आईला धन्य वाटतं. कोमल आईला मदत करत असते आणि सूरज सारखा तिथे घुटमळत असतो. सुरजचे वडील त्याला आवाज देतात..

 

“सूरज..अरे समिधा आलीये..तिला स्टॉप वर घ्यायला जा..”

 

सूरज समिधाला घ्यायला निघून जातो. सुरजची आई फोनवर बोलत बाहेर बसते, वडील खोलीत निघून जातात. हॉल मध्ये परेश आणि कोमल दोघेच असतात. आजवर दोघेजण एकत्र असे कधी बोललेच नसतात, त्यामुळे एकमेकांशी काय बोलावं त्यांना कळत नव्हतं..परेश उगीच काहीतरी बोलायचं म्हणून बोलायला सुरुवात करतो..

 

“नशीबवान आहेस हा कोमल..सूरज सारखा मुलगा मिळाला..”

 

“हो ते तर आहेच..फार मदत करतो तो सर्वांना..अगदी गरीब दुबळ्याला सुदधा काहीतरी मिळावं याचा प्रयत्न करतो..”

 

परेशला प्रश्न पडतो, असं काय करतो हा जे मला माहित नाही?

 

“गरीब दुबळ्यासाठी करतो म्हणजे??”

 

“अरे त्या दिवशी नाही का, वेलेन्टाईन्स डे ला आम्ही जेवायला गेलेलो. खूप भूक लागली होती म्हणून जास्त ऑर्डर दिली गेली पण नंतर खूप उरून राहिलेलं..”

 

“मग??”

 

“मग सुरजने ते पार्सल मध्ये पॅक करून मागवलं आणि सोबत घेतलं..मला घरी सोडल्यानंतर एका गरीब दुबळ्याला गाठून त्याने त्याला हे सगळं अन्न जेऊ घातलं…”

 

“म्हणजे…नक्की केव्हा?”

 

“अरे म्हणजे आम्ही हॉटेलमधून निघालो, त्याने मला घरी सोडलं आणि तसंच हे पार्सल त्याने वाटलं..”

 

परेशचं विचारचक्र फिरू लागतं.. मग त्याच्या लक्षात येतं..

 

“च्यायला तो गरीब दुबळा मी????”

 

परेश संतापाने लालबुंद होतो.. आता केव्हा सूरज येतो आणि केव्हा त्याला लोळवतो असं त्याला झालं..

 

सूरज समिधाला घेऊन आला, समिधाला बघताच परेश सुरजला काय बोलायचं विसरून गेला. चौघेही एकत्र आले, छान वेळ घालवला..पूजेच्या दिवशीही कोमलने खूप कामं केली, नातेवाईक, मित्र मंडळींनीही कोमलला बघितलं, तिने अल्पावधीतच सर्वांचं मन जिंकून घेतलं. पूजा छान पार पडली, संध्याकाळी सर्व आटोपून कोमल तिच्या रूम वर गेली..

 

परेश ती पार्सल ची गोष्ट विसरला नव्हता..खिशातून सुरजचा लहानपणीचा फोटो काढत तो म्हणतो..

 

“अब आयेगा मजा…बदला तो मै लुंगा ही..”

 

असं म्हणत तोही निघतो..

 

____

 

सुरजचा वाढदिवस येतो. त्या दिवशी सूरज सकाळी उठून फ्रेश होऊन वर्तमानपत्र चाळतो.. त्यातली एक बातमी बघून सूरज एकदम मोठ्याने ओरडतो..

 

“हे काय आहे????”

 

घरातले सर्वजण धावत येतात..

 

“काय रे काय झालं?”

 

सूरज घामेघुम झालेला असतो..त्याचा फोन वाजू लागतो..ती बातमी वाचून त्याला एकावर एक फोन सुरू होतात..

 

वडील पेपर हातात घेतात..त्यात खालच्या एका वाढदिवसाच्या रकान्यात सुरजच्या लहानपणीच्या गोलगोमट्या पासपोर्ट फोटो सोबत लिहिलेलं असतं..

 

“आमच्या लाडक्या सुरजला आई, बाबा, मामा, मामी, काका, काकू, परेश, कोमल, समिधाकडून गोड गोड शुभेच्छा”

 

क्रमशः

 

 

3 thoughts on “तुही है आशिकी (भाग 14)”

Leave a Comment