तुही है आशिकी (भाग 12)

 #तुही_है_आशिकी (भा

 

अभिनव आणि दादू गडबडून जातात, त्यांनी तोंड बांधलेलं असल्याने कुणालाही लक्षात येत नाही की ही कोण माणसं आहेत. ती पळायला लागतात, सूरज त्यांच्या मागे पळतो अन ती दोघे वाट काढून सैरावैरा पळू लागतात. त्यांच्यासमोर एकदम परेश उभा राहतो आणि त्यांना आता पळायला जागा राहत नाही. सूरज मागून धाप टाकत येतो. कोमल, तिचे वडील आणि घरातले सर्वजण तिथे येतात..सूरज त्यांच्या चेहऱ्यावरचा कपडा काढतो आणि वडील ओरडतात..

 

“अभिनव..??? तुम्ही?”

 

सूरज आणि परेश गोंधळात पडतात. ही ओळखीतली माणसं आहेत? 

 

“बाबा तुम्ही ओळखतात यांना?”

 

“हो…हे…अभिनव..”

 

“हो पण कोण आहेत हे?”

 

वडिलांना समजेना अभिनवची काय ओळख दाखवावी..कोमलला आधीच दरदरून घाम फुटलेला असतो..ती म्हणते..

 

“सूरज..माझ्या सोबत ये मी सांगते..”

 

“थांबा आधी यांना पोलिसांच्या ताब्यात तर देऊ..”

 

“सोड त्याला..मी सांगतेय ना..तू चल..”

 

सूरज कोमलच्या मागे जातो. लांब एका झाडाखाली दोघे थांबतात.

 

“सूरज..तुला मी काही गोष्टी सांगितलेल्या नाहीयेत..”

 

“कोणत्या गोष्टी?”

 

“हा अभिनव..मला बघायला आलेला..पण नकार दिलेला आम्ही त्याला.”

 

“पण म्हणून त्याने असं करावं?”

 

“गोष्ट इतकीच नाहीये सूरज. आम्ही फेसबुकवर एकमेकांना ओळखत होतो, काही बोलणंही व्हायचं. ज्या दिवशी तू बघायला आलेला त्याच दिवशी संध्याकाळी अभिनव मला पाहायला आलेला. अमेरिकेत असतो. त्याने अट ठेवली की लग्न करून पाच वर्षे मी इथेच राहणार..”

 

“अच्छा हाच का तो?”

 

“होय…आणि…मीही त्याला होकार देऊन तुला नकार दिलेला..”

 

“या अश्या मुलाशी लग्न करणार होतीस तू?”

 

“अरे खरी गोष्ट पुढे आहे..”

 

सुरजला आता एकेक धक्का बसायला लागतो..

 

“तुला नकार दिला आणि घरात सर्वांना तो निर्णय पटला नाही, खास करून आई आणि माझ्या बहिणींना..मग अभिनव आणि मी प्लॅन केला की तुला होकार द्यायचा..”

 

“काय लॉजिक आहे यात?”

 

“म्हणजे तुला होकार द्यायचा आणि अट सांगायची, पाच वर्षांची… तू ऐकणार नाहीस ही आमची खात्री होती.त्यामुळे तुझ्याकडून नकार आला असता आणि घरच्यांच्या मनातील सल कायमची निघून गेली असती…पण तू अट मान्य केली आणि..”

 

“एक मिनिट कोमल…तू माझ्यासोबत इतका मोठा गेम करत होतीस? मी तुझ्यासाठी इतका झुरतोय आणि तू?”

 

“सूरज हे बघ गैरसमज करून घेऊ नकोस…अभिनव आणि माझ्यात काहीही नाहीये.. जेव्हा मी तुला समजू लागले तसं माझं तुझ्यावर…”

 

“तुझं माझ्यावर??”

 

“माझं तुझ्यावर…”

 

“होना..पुढे बोल..तुझं माझ्यावर..”

 

“माझा तुझ्यावर विश्वास बसू लागला..”

 

सूरजला समजलं होतं की कोमलने काहीही मुद्दामहून केलेलं नाही, पण उगाच भाव खायचा म्हणून तो बोलू लागला..

 

“कोमल, तू हर्ट केलंय मला…तुझ्यावर मी किती प्रेम करत होतो..”

 

“होतो म्हणजे? आता नाही करत?”

 

“नाही…नाही करत..”

 

सूरज गमतीने म्हणत होता पण कोमलच्या डोळ्यात पाणी आलं..हे शब्द तिला सुरीसारखे काळजात टोचू लागले. सूरज पाठमोरा होता..कोमलचा स्वतःवरचा ताबा सुटतो आणि ती पाठीमागून जाऊन त्याला बिलगते..सूरज या स्पर्शाने मोहरून जातो..कोमल इतकी गंभीर होईल असं त्याला वाटलं नव्हतं..

 

“सूरज..मला माफ कर, तुला समजायला मी चूक केली..अरे लाखात एक आहेस तू…तुला भेटून स्वप्नातला राजकुमार प्रत्यक्षात भेटला असं वाटलं..तुला समजायला मी खूप उशीर केला..तुझ्यासारख्या देव माणसाला नकार देण्याची दुर्बुद्धी मला कुठून झाली हेच समजत नाही सूरज..माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे सूरज..तुझ्यावाचून मी अपूर्ण आहे…”

 

सूरज वळून तिच्यासमोर उभा राहतो, तिला म्हणतो..

 

“अगं वेडे गम्मत करत होतो मी…तू बोलून दाखवलं नाहीस तरी तुझा माझ्यावर असलेला विश्वास तुझ्या डोळ्यात दिसतो मला..”

कोमल डोळे पुसते.. आणि लटक्या रागाने दूर जाते..

 

“आता तुला काय झालं?”

 

“मैत्रिणींना घेऊन फिरतो ना तू सोबत?”

 

“मैत्रीण? कोण?”

 

“मी बघितलं होतं तुला, तुझ्या कार मधून जाताना..काल संध्याकाळी..”

 

सुरजची ट्यूब पेटते..

 

“अच्छा…अरे हो.. माझी खूप जवळची मैत्रीण आहे बरं का ती, एकमेकांशिवाय आमचं पान हलत नाही, पण फक्त मैत्रिणच बरं का..”

 

“तू कधी सांगितलं नाहीस तिच्याबद्दल..”

 

“कधी सांगणार? तुला वेळ असतो बोलायला??बरं चल, डायरेक्ट भेटवतो मी तुला..”

 

“नको..”

 

“का गं? Jelous हम्मम..”

 

“काही jelous वगैरे नाही हा..बरं भेटू चल तिला, मी तयार आहे यायला..”

 

“ठिके, बरं निघायचं का आता? सगळे वाट बघत असतील..”

 

“हो चल..”

 

दोघे निघायला लागतात अन मागून झाडावरून धपकन काहीतरी पडल्याचा आवाज येतो, दोघे मागे वळून बघतात..

 

“पऱ्या तू??”

 

“अरे सॉरी.. मलाही ऐकायचं होतं..”

 

“म्हणजे तू सगळं ऐकलंस?”

 

“आणि सगळं पाहिलं सुद्धा????”

 

नाही नाही, कोमल तू त्याला मागून चिकटलीस तेव्हा मी डोळे बंद करून घेतले होते..आणि तू त्याला म्हणालीस ना की..”तू स्वप्नातला राजकुमार आहेस वगैरे..” तेव्हा मी कान बंद करून घेतलेले..”

 

“होका? मग कसं समजलं की कोमलने मला मागून पकडलं आणि ती स्वप्नातला राजकुमार म्हटली ते.?”

 

परेश जीभ बाहेर काढत कान पकडतो, कोमल तर चेहऱ्यावर दोन्ही हात ठेवून तिथून पळ काढते..

 

____

 

दुसऱ्या दिवशी सूरज आणि कोमल त्याच्या ऑफिसमध्ये असलेल्या त्याच्या मैत्रिणीकडे, कीर्तिकडे जातात. दार उघडताच किर्तीला खूप आनंद होतो..

 

“अहो ऐकलं का..सूरज आलाय..”

 

“काय सांगतेस, खूप दिवसांनी आलाय..”

 

कोमलचा राग पूर्ण निवळतो, सूरज सोफ्यावर बसून कीर्तीच्या लहान मुलाशी खेळू लागतो. कीर्तीचे मिस्टर सुरजशी गप्पा मारू लागतात..कोमल कीर्तीच्या मागे किचन मध्ये जाते..

 

“अगं बस की पुढे, मी पाणी आणते..”

 

“नको..आपण इथेच गप्पा मारुया..”

 

“बरं थांब, मी पाणी देऊन आले..”

 

कोमलला स्वतःचाच राग येऊ लागला. सुरजवर संशय घेतला होता तिने. कीर्ती पाणी देऊन येते आणि कोमलला डायनिंग खुर्चीवर बसायला सांगते..

 

“सूरज सांगत होता अगदी तशीच आहेस बघ तू..शांत, समजूतदार, सुंदर..”

 

“काहितरीच..”

 

“अगं खोटं नाही..पण तुझा नवरा फार चोखंडळ आहे बरं का..तुझ्या गिफ्ट साठी इतकं फिरलो आम्ही पण एक वस्तू आवडेल तर शपथ..”कीर्ती बोलून देते पण अचानक जीभ चावते..

 

“अरे देवा..तो सरप्राईज देणार होता तुला अन मी..सॉरी सॉरी..”

 

“असुदे ताई…”

 

“पण एक सांगू, फार नशीबवान आहेस तू, तुला सूरज सारखा नवरा मिळाला…आम्ही ऑफिसमध्ये पहिल्यांदा भेटलो, मी वयाने मोठी, मला कायम ताई ताई म्हणून हाक मारतो. एकदा माझे मिस्टर खूप आजारी होते, कुणीही धावून आलं नाही पण सूरज एका हाकेत धावत आला..अगदी रात्री सुद्धा तो यांच्यासोबत थांबला हॉस्पिटलमध्ये.. खरंच नशीबवान आहेस तू..”

 

हे ऐकून कोमलला स्वतःवरच राग येऊ लागला, किती पटकन आपण सुरजवर शंका घेतली होती..

 

सुरजच्या अचानक लक्षात आलं, अरे आज तर वलेन्टाईन्स डे.. असं कसं विसरलो मी? आणि गिफ्ट? अरे यार…

 

____

 

सुरजच्या आई वडिलांचं बोलणं सुरू असतं..

 

“आपल्या समिधाचं लग्न जमलं म्हणजे झालं..बिचारी पोर, लहान वयात खुप काही पाहिलं तिने..”

 

नेमका परेश त्यावेळेस तिथे होता आणि त्याच्या कानावर ते पडलं..

 

“समिधा सोबत काय झालं असावं??”

 

क्रमशः

 

 

5 thoughts on “तुही है आशिकी (भाग 12)”

Leave a Comment