तुही है आशिकी (भाग 10)

 

 

“चंद्र?”

 

“परेश खुर्चीतून उठून उभा राहतो आणि हॉटेल मधील सर्वजण त्याच्याकडे बघायला लागतात..”

 

“पऱ्या खाली बस…बस खाली..”

 

परेश पुन्हा हळू आवाजात विचारतो..

 

“चंद्र हवाय तुला कोमल साठी?”

 

“हो..”

 

“ठिके..नासा वाल्यांशी बोलतो मी, माझा नानाच आहे ना तिथला चेयरमन..त्यांना सांगतो, आमच्या सुऱ्या ला चंद्र हवाय, तेवढा घेऊन या…त्याच्या जागी रात्री गपचूप एखादा मोठा बल्ब रिप्लेस करून देऊ.. लोकांना कळणारही नाही..पण सुऱ्या..एवढा मोठा चंद्र तू ठेवशील कुठे?”

 

“पऱ्या..अरे तू तर सिरीयस झालास, मजाक करत होतो मी..”

 

“सुरवात कुणी केली?”

 

“माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की आजवर कुणीही दिलेलं नसेल असं गिफ्ट मला द्यायचं आहे कोमलला..आता हेच बघ ना..ते गाणं आठव..तुम जो कह दो तो चांद तारे भी तोड लाऊगा मै…”

 

“ते गण्यातच ठीक वाटतं, हिरो लोक काय खरोखर ते करतात होय?”

 

“माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की चंद्र ही फक्त उपमा आहे..तुला चंद्र तारे आणून देईन म्हणजे अशक्यातील अशक्य गोष्ट तुला देईन असं असतं ते.”

 

“ओ आय सी.. सॉरी माझ्यासारख्या सिंगल मुलाला ते काही कळणार नाही हो..स्वप्नांच्या दुनियेत हरवून लेखक कवींसारख्या गोष्टी फक्त तुझ्यासारखा प्रेमात आंधळा झालेला मुलगाच करू शकतो.. मला काय, चंद्र आण म्हटला की खरोखर आणायचा असं स्ट्रेट फॉरवर्ड गणित दिसतं”

 

“काहीतरीच काय..”

 

“घ्या…लाजलं हे.. अजून काय काय पहायला मिळणार देव जाणे..”

 

“बरं पऱ्या, चल ना घरी..थोडा वेळ बसू मस्त गप्पा मारत..”

 

“नाही रे बाबा, घरी कामं आहेत भरपूर..”

 

“काय यार, समिधाही आली होती घरी..माझी चुलत बहीण रे..म्हटलं तिघेजन बसूया मस्त..”

 

“समिधा आलीय का? बरं… बरं चल..येतो..”

 

“लगेच तयार  झालास?”

 

“अरे…म्हणजे…माझ्या घरी कामं आहेत बरीच पण आता रात्रीची काय कामं करणार ना..जाऊया चल..”

 

सूरज आणि परेश घरी जातात. खरं तर परेश समिधा साठी आलेला असतो, पहिल्या नजरेतच त्याला ती आवडलेली असते. एरवी दुसरी कुणी असती तर परेशने सुरजला सांगितलं असतं पण सुरजचीच बहीण असल्याने परेशला जरा सावधगिरीने राहावं लागतं..

 

सूरज आणि परेश गच्चीवर जातात, समिधा तिथे अधिच बसलेली असते. चांदण्यात तिचा नितळ चेहरा अधिकच खुलून दिसत असतो. परेशची नजर तिच्यावरून काही हलत नसते. समिधालाही ते हळूहळू लक्षात येतं. 

 

“समू, तुला माहितीये मी पऱ्या ला कोमलसाठी काय गिफ्ट आणायला लावलं ते?”

 

“तुला द्यायचं आहे ना कोमलला..मग त्याला का सांगितलं?”

 

“अगं परेश शिवाय हे काम कुणाला जमतं का..आमचा परेश, त्याला काहीही सांग, जगातल्या कानाकोपऱ्यात जाऊन ते काम फत्ते करेन इतकी पोहोच आहे त्याची..”

 

सूरज समिधा समोर आपली तारीफ करतोय बघून परेशला आतून गुदगुल्या होत होत्या. समिधाही कान देऊन ऐकत होती..

 

“काय काम केलंय बरं? एखादं उदाहरण तर सांग..”

 

“एकदा रात्री 11 वाजता सर्व मित्र जमलेलो, मस्त पार्टी करायची होती.. पण दुकानं बंद..”

 

“अरे मग घरीच काहीतरी बनवायला सांगायचं ना..”

 

“अगं जेवणाची सोय झालेली..पण..”

 

“पण काय..”

 

“ते ड्रिं…”

 

“कोल्ड्रिंक्स गं… कोल्ड्रिंक्स कुठे मिळत नव्हती, जाऊन शोधून आणली मी..”

 

पऱ्या सुरजला मधेच थांबवत वाक्य बदलतो..

 

“पऱ्या अरे हिच्यापासून काय लपवायचं? हिला माहितीये सगळं..”

 

“तर पऱ्याने चक्क चोरी केली, दुकानाचं टाळ तोडून बाटल्या लंपास केल्या..”

 

“सुऱ्या अरे…”

 

परेशला जेवढं चढवलं होतं आता। तितकाच तो खाली पडत होता.

 

“अरेवा…सर्वगुणसंपन्न आहे तर तुझा मित्र..”

 

“अजून तर काहीच नाही..”

 

“सुऱ्या बस बस…आज पुरता एवढंच ठीक..”

 

“बरं मी खालून फ्रिजमधून आईस क्रिम घेऊन येतो.. तुम्ही बसा इथेच..”

 

सूरज दोघांना तिथे थांबवून खाली जातो. आता गच्चीत फक्त समिधा आणि परेश असतात. समिधा शांत असते, कसल्यातरी खोल विचारात गर्क असते..परेशला मनात नुसते लड्डू फुटत असतात..वेळ फार कमी असतो आणि परेशला तिच्याशी बोलायचंही असतं. पण शब्द फुटत नाही. मग समिधाच बोलू लागते..

 

“चोरी…हं.. चांगलेच धाडसी आहात.”

 

“सोडा हो..ते आपलं असंच..”

 

समिधा हसून परत शांत बसते. मग परेशच म्हणतो..

 

“चोर तर मी आहेच…एखाद्याचं हृदयही चोरी करू शकतो..”

 

समिधा एकदम धास्तावते.. ऐकून गारच पडते..परेश बोलून जातो आणि नंतर त्याला घाम फुटतो, आपण हे काय बोलून गेलो ते..

 

“काय चोरी करू शकतो म्हटलास परेश..”

 

सूरज मागून आईस्क्रीम घेऊन येत विचारतो..

 

“काही नाही, तोच..ड्रिंक्स आणायचा किस्सा सांगत होतो..”

 

“बरं मला आता एकच सांगा, कोमलला काय गिफ्ट द्यावं सांगा तरी..ए समिधा, तू तरी सुचव ना..”

 

“गिफ्ट सिलेक्ट करायच्या बाबतीत माझा फार गोंधळ उडतो.. हा मी हे सांगू शकते की मुलींना पर्स, दागिना, सँडल, कपडे वगैरे आवडतात..”

 

“हे तर फार कॉमन झालंय गं.. मला काहीतरी भन्नाट द्यायचं आहे..”

 

खूप वेळ विचार विमर्श चालतो पण काहीही निष्पन्न होत नाही. वलेन्टाईन्स डे ला अजून 2 दिवस बाकी असतात..शेवटी आपल्यालाच काहीतरी विचार करावा लागेल असं सुरजला समजतं. 

 

_____

 

“हे बघ अभिनव, तुझा अंदाज खोटा ठरलाय…सूरज तयार आहे पाच वर्षे दूर राहायला, आणि मी त्याच्याशी खोटं नाही बोलू शकत..”

 

“हे बघ कोमल, आपली डील ठरली होती..की तू सूरजला होकार देशील..पाच वर्षांची अट ऐकून तो नकार देईल आणि मग घरच्यांना माझ्याशिवाय पर्याय उरणार नाही..”

 

“मलाही तेच अपेक्षित होतं.. त्याला नकार देताना माझ्या घरच्यांचे होणारे हाल मी बघत होते, त्यांच्या मनातून मला ते कायमचं काढून टाकायचं होतं.. म्हणून…”

 

“आणि आपलं गेले 2 वर्ष नातं आहे त्याचं काय?”

 

क्रमशः

 

 

4 thoughts on “तुही है आशिकी (भाग 10)”

Leave a Comment