तुही हकीकत (भाग 3)

भाग 1
https://www.irablogging.in/2020/07/1.html

भाग 2
https://www.irablogging.in/2020/07/2.html

ईशिका येणार म्हणून सासूबाई आणि स्वरा जोरात तयारी करत होत्या. सासूबाईंना तर या सगळ्या प्रकाराची कल्पना नव्हतीच. स्वरा एकेक पदार्थ बनवत होती,ती जरी खंबीर बनली असली तरी मनात विचार चालत होते…

“खरच माझी गरज नसेल तर का राहावं मी इथे? मी जर यांच्या प्रेमाच्या आड येत असेल तर निघून जावं का मी स्वतःहून?”

या विचारात असतानाच तिचं बोट कापलं गेलं आणि ती किंचाळली…

आवाज ऐकून आशिष पटकन धावत आला, त्याच्या डोळ्यात काळजी होती…

“काय गं तू…नीट बघून कापत जा..”

“सुनबाई, मी करेन बाकीचं.. तू दमलीये असं पण आज..”

आशिषला त्या क्षणी दुसऱ्या गोष्टीचा विसर पडला होता…या क्षणी तो स्वरा चा नवरा म्हणून वागला होता..आणि सासूबाई तर आईसारखा जीव लावत होत्या..

“कुणाला सोडून जाऊ मी? या भरल्या गोकुळसारख्या कुटुंबाला? आणि आशिष चं काय?? तो खरंच तिच्यावर प्रेम करतोय की ही क्षणिक ओढ आहे?? मला जायला काय, मी आत्ता निघून जाऊ शकते, पण एक प्रयत्न करायला काय हरकत आहे? आशिष ला खऱ्या प्रेमाची जाणीव करून द्यायला काय हरकत आहे??”

हा विचार करून स्वरा तयार होते, आज ती आशिष च्या आवडीची गुलाबी साडी घालते आणि त्याला आवडते तशी वेणी घालते. आशिष हॉल मध्ये येरझारा घालत असतो, खुशी येताच त्याला कालच्या त्याच्या वागण्यावर राग येतो…आणि खुशी ला परत जवळ घेऊन तिचे मुके घेतो…

इतक्यात ईशिका येते…

आशिष खुशी ला कडेवर घेऊन असतो, ईशिका दारातच उभी असते…दोघेही फक्त एकमेकांकडे बघत असतात. स्वरा बाहेर येते..

“अगं ईशिका आलीस? ये ये…दारातच काय उभी राहतेस..”

ईशिका खोटं हसून आत येते…सासूबाई तिच्याजवळ बसतात…बराच वेळ गप्पा चालतात मग सगळे जेवायला बसतात…

ईशिका आणि आशिष समोरासमोर असतात…अधून मधुन एकमेकांकडे बघत असतात, स्वराला ते सगळं समजत असतं… पण मनावर दगड ठेऊन ती हे सगळं बघत असते..

“ईशिका, आशिष आणि तू लहानपणापासून मित्र आहात, मग…लहानपणी कसा होता आशिष??”

स्वरा वातावरण हलकं करण्याच्या हेतूने विचारते..
ईशिका सुद्धा आता जरा comfortable होते..

“आशिष, एक नंबर चा खोडकर मुलगा…तुला माहितीये एकदा तर याने रंगपंचमी ला अख्खी बदली माझ्या वडिलांवर ते ऑफिस ला निघाल्यावर ओतली होती..”

“हो..पण नंतर घरी बेदम मार मिळाला होता मला..”

“नाहीतर काय…आमचा नंबर वेगळ्या कॉलेज ला लागला तेव्हा मात्र आशिष अगदी रडायला लागलेला…त्याला सवय झालेली माझी…आणि असं थोडाही वेळ लांब जाणं त्याला सहन होणारं नव्हतं..”

ईशिका भावनेच्या भरात बोलून जाते…स्वरा आणि आशिष ला तिच्या बोलण्याचा रोख समजतो…आशिषही भान हरपून बोलतो…

“हो पण तुलाही तितकंच वाटलं असतं तर आज परिस्थिती वेगळी असती..”

या बोलण्याने मात्र आशिष च्या आई वडिलांनाही शंका येऊ लागली.. स्वरा ने तात्काळ विषय बदलायचा म्हणून खुशी ला गाणं म्हणून दाखवायला लावलं…आशिष आणि ईशिका च्या मनात एकमेकांबद्दल असलेली सल आज उकरून बाहेर येत होती..

जेवणं झाली…सासूबाई आणि सासरे शतपावली साठी बाहेर गेले…खुशी ला स्वराने झोपवून दिलं आणि ती या दोघांकडे आली…

“आशिष आणि ईशिका..तुम्ही दोघेही वर टेरेस मध्ये जाऊन गप्पा मारा…मी तोवर झाकपाक करून घेते..”

त्या दोघांना संधीच हवी होती…

दोघेही टेरेसवर गेले.

“ईशिका काय चालवलं आहे हे??”

“हे मी विचारायला हवं….माझा विचार न करता खुशाल लग्न केलंस??”

“तुझा विचार?? तू प्रेमाची कबुली दिली होतीस??”

“आपल्या दोघांच्या नात्याला कबुली जरुरी होती?? मला वाटलं होतं तुही माझ्यावर तितकंच प्रेम करत असशील…”

“असं वाटून काय उपयोग??? हो, करायचो मी प्रेम, पण तू अशी निघून गेलीस आणि मला वाटलं की तुला माझ्याबद्दल काहीही भावना नाहीत..”

“तू मला airport वर सोडायला आलेलास तेव्हा आपण काय बोललो होतो?? तू म्हणाला होतास की आपण आता सेटल होऊ..”

“हो..आणि मी म्हणालेलो की तोवर आपण कसलाही विचार करायचा नाही..”

“Exactly…. आपण सेटल होईपर्यंत एकमेकाला कसल्याही मोहात पडायचं नाही असा त्याचा अर्थ होता…एकदा का सेटल झालं की पुढचा मार्ग मोकळा होता आपल्या साठी..”

“काय??? आणि मी समजत होतो की तू कधी contact केला नाही म्हणून तुला माझ्याबद्दल काहीही वाटत नाही..म्हणून मी आईने सांगितलं त्या मुलीशी लग्न केलं..”

“मी contact केला नाही कारण आपल्या दोघांना सेटल झाल्यावर भेटायचं होतं, तोवर कुठेही अडकायचं नव्हतं…प्रेम, आठवण, विरह…या गोष्टी दूर ठेवायच्या होत्या..”

“Damn….ईशिका….खूप मोठा गैरसमज झालेला हा…पण आता सगळं clear झालंय… आपल्याला समजलं आहे की आपण एकमेकांवर आजही प्रेम करतोय..”

“आशिष??? वेळ निघून गेलीये असं नाही वाटत तुला?? स्वरा चं काय? खुशी चं काय??”

इतका वेळ ईशिका च्या डोळ्यांत हरवलेला आशिष भानावर येतो…तो काहीही बोलू शकत नव्हता…एकीकडे मांडून ठेवलेला संसार आणि दुसरीकडे लहानपणीचं प्रेम…

आशिष अश्या द्वंद्वात असताना त्यांच्या पाठीवर एक हात पडतो…स्वरा मागून त्याला धीर देते..

“अजूनही वेळ गेलेली नाहीये आशिष, तुमच्यात जो गैरसमज झालेला होता आता तो दूर झालाय…आता तुम्ही तुमचा मार्ग निवडा…”

“स्वरा??” आशिष स्वरा च्या या बोलण्यावर स्तब्ध होतो…

“होय आशिष…तुझी बायको म्हणून मला तुझं हित लक्षात घेणं महत्वाचं आहे… पण हो, मला जेव्हा खात्री पटेल की ईशिका आणि तुमच्यात खरं प्रेम आहे आणि भविष्यात तुम्ही एकमेकांची साथ देऊ शकाल तेव्हाच मी तुमच्यातून दूर होईल..”

“नाही स्वरा…हे असलं काही बोलू नकोस..” आशिष म्हणतो…

“आशिष, तू फक्त संसाराचा विचार करून मला धरून ठेवलंस तर हा संसार निभावला जाईल… पण तु मनाने मात्र कायम ईशिका जवळ असशील….त्यामुळे मला याचा निर्णय करायचा आहे..”

ईशिका ला चीड येते..

“आम्ही लहानपणापासून ओळखतो एकमेकांना… तू जितकी वर्ष संसार केलास त्याहुन अधिक आम्ही एकत्र राहिलो होतो आणि तू आमच्या प्रेमावर बोट दाखवतेस??”

स्वराच्या डोळ्यात पाणी येतं… ते पाहून आशिष ईशिका कडे रागाने बघतो…

“काय रागाने बघतोय माझ्याकडे??? तु ना एक काहीतरी ठरव…कधी तू तिकडे पलटतोस कधी इकडे…”

क्रमशः

Leave a Comment