“मग तुमच्या योग्यतेचीच मुलगी करायची होती, माझ्याशी का लग्न केलंत?”
“तेच चुकलं..मला वाटलं गावाकडची असलीस तरी शहरातील गोष्टी करशील आत्मसात… पण तुझ्या या गावठी राहणीमानाला आणि टिपिकल बाई सारख्या वागण्याला कंटाळलोय मी..”
“नक्की काय खटकायला लागलं हो तुम्हाला माझं?”
“एक गोष्ट असेल तर सांगू… म्हटलं बाहेर तुला घेऊन मिरवायला तू जरा चांगली तयार होशील, चांगले कपडे परिधान करशील…पण कसलं काय…सुट्टीच्या दिवशी बायकोसोबत वेळ घालवू म्हटलं तर ढीगभर कपडे घेऊन धुवायला बसतेस… कधीही घरी असलो की सतत काही न काही काम, घर आवर, पसारा आवर… नवऱ्याला काय हवं नको ते नाही पाहणार…काल म्हटलं हलवा खाऊ वाटतोय तर तेही केलं नाहीस..”
“गॅलरीत गाजराची शेती परलीये का? गाजर आणून द्या म्हटलं तर ऐकलं नाही..”
“काहीही बोला, सगळं माझ्यावरच येणार…”
“तुम्हाला वैताग आला असेल माझा तर जाते मी निघून…”
“हे बरं आहे…काही झालं की जाते निघून…”
“ओ… घर सोडून नाही जात ए.. गावाकडची असली तरी खमकी आहे मी…माझी मैत्रीण, तिचा नवरा बाहेरगावी असतो…कधीची बोलावतेय मला…जाते मी पंधरा दिवस तिकडे…”
नवऱ्याने विचार केला…जाऊ द्यावं हिला…तेवढीच जरा शांतता…
“ठिके जा..”
“जा काय.. परवानगी नाही मागितली…माहिती दिली..”
वाटलं होतं गावाकडच्या मुली साध्या भोळ्या असतात…पण हे कुठल्या गावचं पाणी आहे काय माहीत…
“काय म्हणालात??”
“अं?? कुठे काय…पाणी दे म्हटलं जरा..”
“उठा न घ्या..”
नवरा पाणी घेऊन सोफ्यावर बसला अन बायको निघाली बॅग घेऊन…
“येते मी.”
ती गेली अन नवऱ्याला घरात मोकळं मैदान…आधी तर मनसोक्त घरभर उड्या मारत फिरला…बायको असायची तेव्हा स्वतःच्याच घरात चोरी असायची…
“या पंधरा दिवसात माझ्या मनासारखं जगणार मी..”
नवरा मस्त स्वतःच्या हाताने वेस्टर्न डिशेस बनवतो..
“अहाहा..काय चव आहे…नाहीतर रोज ते झुणका भाकर खाऊन वीट आलेला…”
छानपैकी किचन आवरला…कपडे मशीन मध्ये टाकले…आणि रात्री उशिरापर्यंत tv बघत राहिला…
2 दिवस मजा केली…
तिसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये तो गेला अन त्याच्याकडे लोकं वेगळ्याच नजरेने पाहत होते..बॉस च्या केबिन मध्ये गेला, बॉस सुद्धा त्याचकडे पाहून हसत होता…नवऱ्याला कारण समजेना….
घरी आल्यावर आरशात पाहतो ते काय…शर्ट ची कॉलर, बाह्या प्रचंड मळलेली…रात्री उशिरा झोपलो, सकाळी उशीरा जाग आली..घाईत आवरलं आणि गेलो तसाच…पण कपडे तर धुतले होते मी मशीन मध्ये..मग कसेकाय? जाऊद्या…मी नवीनच विकत आणतो..असही बरेच दिवस नवीन कपडे घेतले नाही..
नुकताच पगार झालेला…किराणा, लाईटबिल, सिलेंडर…सगळा खर्च केला…इतके दिवस बायकोच्या हातात पगार द्यायचा..आता तो स्वतः खर्च करणार होता…त्यामुळे खुशीत होती स्वारी…
सर्वात शेवटी त्याने कपड्यांची खरेदी करायची ठरवली…
“हे काय? जेमतेम रक्कम शिल्लक आहे??”
अखेर कपड्यांचा प्लॅन कॅन्सल…
एक दिवस त्याचा एक मित्र घरी येतो..नवरा त्याला सांगतो..
“अरे घरी कुणी नाही, मस्त पार्टी करूया आपण, माझ्याच घरी…”
मित्राने घरभर नजर फिरवली…” नको इथे…बाहेर बसू..”
काही दिवस उलटले…नवऱ्याला अचानक पोटात दुखू लागलं…अन छातीत चमक निघाली…
कसाबसा धीर करत डॉकटर कडे गेला…
“तुम्हाला पोटात इन्फेक्शन झालंय… बाहेरचं काही खाल्लं का? आणि ऍसिडिटी वाढलीये..जागरण होतं का रात्री??”
नवरा काहीही उत्तर न देता निघून जातो…
घरी आल्यावर त्याला एकेक गोष्टी समजायला लागतात..
ऑफिस मध्ये मळलेल्या कॉलर वरून अपमान झाला…इतके दिवस बायको कपडे घेऊन तासन तास धुवायला का बसायची ते समजलं…
खाण्याने मी आजारी पडलो, इतके दिवस बायको भाजी पोळीला प्राधान्य का द्यायची ते समजलं..
जागरणाने ऍसिडिटी वाढली, बायको रात्री दम देऊन लवकर का झोपायला सांगायची ते समजलं…
इतके दिवस घरी येऊन ज्या मित्रांना प्रसन्न वाटायचं ते आज घरी यायला नको म्हणताय…बायको सतत घर आवरून लक्ख का ठेवायची ते समजलं…
घरखर्च करून हातात पैसे उरले नाही…बायको नवीन साडी का घेत नव्हती हे समजलं…
त्याला आता बायको कधी एकदाची येते असं झालं..
15 दिवस झाले आणि बायको आली… घराकडे पाहिलं आणि कालीचा अवतार धारण केला…
“हे काय करून ठेवलंय घराचं??”
“घरात लक्ष्मी नसेल तर घराचं असंच होणार..”
“कोण ही लक्ष्मी?? मी नसताना कुणाला आणलं घरी??”
नवरा देवीच्या फोटोकडे बोट दाखवतो…
“ती…”
बायको लाजते…पदर खोचून म्हणते…
“म्हणजे किंमत समजली तर माझी..”
“हो बाई…पण आज अभिमान वाटला हा…माझी बायको तू आहेस म्हणून…”
बरं बरं…बसा तुम्ही ..गाजर आणलीय… हलवा करून आणते…
खूपच सुंदर
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me? https://accounts.binance.com/ro/register?ref=GJY4VW8W