तुझं माझं

 

“तुझे बाबा परत कधी जाणार आहेत?”

“अहो असं काय करता… त्यांची कंडिशन बघताय ना तुम्ही? ट्रीटमेंट पूर्ण झाल्याशिवाय त्यांना इथून हलता येणार नाही..”

योगेश चे आई वडील यात्रेसाठी दोन महिने बाहेर गेलेले..आणि दुसऱ्याच दिवशी काजल च्या माहेराहून फोन आला, वडिल अचानक बेशुद्ध पडले होते..आणि मोठ्या डॉक्टर कडे म्हणून काजलच्याच शहरी ते येणार होते. मुलगी जवळ असेल म्हणून तिची आई जरा निर्धास्त होती.

गावाहून काही मंडळी बाबांना घेऊन आली, दवाखान्यात तपासणी झाली आणि काही दिवस ऍडमिट करून घेण्यात आलं. किडनीचा त्रास बाबांना झालेला. बरेच नातेवाईक भेटून गेले, योगेशनेही बरीच मदत केली, हॉस्पिटलमध्ये चकरा मारल्या..

“तुम्हाला आज discharge मिळतोय, पण दर चार दिवसांनी तुम्हाला तपासणीसाठी यावं लागेल…”

हे ऐकून आई काळजीत पडली, इतका मोठा प्रवास? तोही दर चार दिवसांनी?

“आई, माझ्याकडे चल.. माझं घर असताना कशाला धावपळ करता?”

योगेश च्या जीवावर आलं, पण डायरेक्ट नाही कसं म्हणणार? चेहऱ्यावर खोटी काळजी दाखवत त्यानेही हो ला हो लावले..

“नको गं.. तुला आधीच तुझा संसार..घरात इतकी माणसं..”

“अगं सासू सासरे यात्रेला गेलेत…ते काही नाही, चल माझ्या घरी..”

काजल ने आई बाबांना घरी नेले, त्यांची सर्व सोय केली.. त्यांची काळजी घेतली..

योगेश ला वाटलं, आई बाबा यात्रेला गेलेत…जरा कुठे प्रायव्हसी मिळेल म्हटलं तर हे असं…तो नाखुषीतच होता..

बाबांचं आवरणं सोपं नव्हतं… कधी जागेवर सर्व क्रिया करत..कधी त्यांना उलटी होई…कधी जुलाब…घरात दुर्गंध पसरायचा… पण काजल लागलीच सगळं स्वच्छ आवरून घेई…काजल चं सगळं लक्ष आई बाबांकडे…त्यांना काय हवं नको हे पाहता पाहता योगेश कडे दुर्लक्ष होई…

पंधरा दिवस झाले..आता मात्र योगेश ची सहनशक्ती सम्पली..

“काजल..आई बाबांना म्हणा आता घरी जा…बरेच दिवस झालेत…तुझं माझ्याकडे लक्ष नाही, मला काय हवं काय नको बघत नाही तू…सुट्टीच्या दिवशीही त्यांचाच मागे..आईला फिरवून आणते..खरेदीला नेतेस..काही प्रायव्हसीच राहिली नाही आपल्याला…आणि बाबांच्या अश्या आजारामुळे घरात दुर्गंध येतोय..मला मळमळल्यासारखं होतंय बघ…”

“अरेवा…अहो फक्त पंधरा दिवस झाले आणि तुम्ही वैतागला? आयुष्यभर तुमच्या आई वडिलांची मी सेवा करत आलीये…ते आपल्याकडे असतात तेव्हा असते आपल्याला प्रायव्हसी? तुम्ही ऑफिसहून आले की पूर्णवेळ त्यांच्याकडे बघता..आईंना मंदिरात ने, बाबांना क्लब मध्ये ने….मला काय हवं नको विचारलंत? आणि आईंना कफ चा त्रास आहे…बाबांना पोटाचा… त्यांचं सगळं आवरते ना मी काहीही तक्रार न करता? मग माझ्याच आई वडिलांचं तुम्हाला खुपायला लागलं?”

योगेश विचारात पडला… खरंच आपण चुकलो…

“जाऊद्या, जास्त विचार करू नका..फक्त माझ्या आई वडिलांच्या जागी तुमच्या आई वडिलांना ठेऊन बघा…जे आजवर मी केलंय तेच…”

योगेश तडक बाबांच्या खोलीत जातो…

“बाबा…तुम्ही पूर्ण बरे होईपर्यंत तुनहाला मी कुठेच हलू देणार नाही..”

 

Leave a Comment