अभिनव कॉलनीत आज सकाळपासून स्त्रियांची लगबग सुरू होती, कॉलनीत दरवर्षी एकत्र मिळून हरतालिकेची पूजा केली जायची. नवीन लग्न झालेल्या मुली, अविवाहित तरुणी तसंच वयस्कर स्त्रिया सुद्धा उत्साहाने या दिवशी वावरत असत. नवीन साडी, भरजरी दागिने, मेकअप… या दिवशी सुंदर दिसण्याची जणू स्पर्धाच असायची. पूजेच्या एक तास आधी सगळे जमत, एकत्र भरपूर फोटो काढत आणि मग पूजाविधी उरकून सर्वजण घरी जात.
काही वर्षांपासून एक ब्राह्मण स्त्री हरतालिकेचं पौरोहित्य करायला येत असायची, त्या आधी तिचे पती नेमाने येऊन पौरोहित्य करत, पण दुर्दैवाने त्यांना अर्धांगवायू चा झटका आल्याने ते अंथरुणाला खिळले होते, पण त्यांचा बायकोने मात्र ही धुरा कायम नेली…
कॉलनीतील बायका एकत्र जमल्या, भरपूर फोटो काढून झाले…एकमेकांच्या साड्या, दागिने बघून “अरेच्या…हे तर आपल्याकडे नाहीये, आता घ्यावंच लागेल..” असं मनातल्या मनात भरपूर शॉपिंग करत सर्वांचा वेळ चालला होता..सर्वजण पौरोहित्य करणाऱ्या कुलकर्णी ताईंची वाट बघत होते. यावेळी नेहमीपेक्षा जरा जास्तच उशीर झालेला..
“कुलकर्णी बाई अजून आल्या कश्या नाही?? फोन केला होता ना त्यांना??”
“अगं त्यांच्याच फोन आलेला…म्हणे उद्या दुपारी येईन मी…पण अजून कश्या आल्या नाहीत..”
“मी काय म्हणते, आपण पूजा उकरून घ्यायची का वाट बघण्यापेक्षा?”
“नको बाई, इतकी वर्षे विधिवत पूजा करत आलोय आणि आता कशाला उगीच अंदाधुंदी पूजा करायची? वाट पाहू थोडा वेळ..”
इतक्यात कुलकर्णी बाई आल्या,
“माफ करा हं, आज जरा उशीरच झाला.. चला आपण सुरवात करू.. तुम्ही सर्वजण बसा समोर..”
सर्व स्त्रिया एकत्र बसत असतानाच कुलकर्णी बाईंनी त्यांचा पिशवीत हात घालून फुटण्यांचा एक घास पटकन तोंडात टाकला…तो खाऊन होईपर्यंत सर्व बायका आपापलं पूजेचं समान मांडून बसल्या…कुलकर्णी बाईंनी पाण्याचा घोट घेऊन मंत्राला सुरवात केली..विधिनुसार जे जे काही असतं ते सगळं या सर्वांकडून करवून घेतलं…तासभर पूजा चालली…नंतर मग सर्वांनी कुलकर्णी बाईंना दक्षिणा दिली आणि आपापल्या घरी जाऊ लागल्या… पण एक स्त्री मात्र तिथेच थांबली…
“एक मिनिट… तुम्ही लोकांना हरतालिकेची पूजा सांगतात, तुम्ही नाही करत उपास??”
“अं??”
“नाही ते मघाशी ना मी तुम्हाला फुटाणे खाताना पाहिलं, याचा अर्थ तुम्ही उपास करत नाही..”
“हो, नाही करत मी उपास..”
“म्हणजे लोकांना हरितालिकेचं महत्व पटवून द्यायचं, आणि स्वतः मात्र करायचं नाही…अहो पतीच्या दीर्घायुष्या साठीच करतात ना हे व्रत??”
“हो…पतीच्या दीर्घायुष्यासाठी स्त्रिया उपास करतात, आणि मी माझ्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपास करत नाही..”
“हे काहीपण काय बोलताय??”
“होय..माझे पती पॅरालाईस्ड आहेत..अंथरुणाला खिळले आहेत…त्यांचा औषध पाणी केलं, दवाखाना केला तर त्यांना दीर्घायुष्य मिळेल…आणि मी जर उपास करत बसले तर दिवसाला 10-10 पूजा कश्या उरकू मी?? माझं शरीर साथ देईल का मला?? या पूजेचं पौरोहित्य केलं तर दक्षिणा स्वरूपात मला पैसे मिळतात जे माझ्या पतीच्या औषधपाण्याला कामी येतात…ताई, प्रत्येक स्त्री हरतालिका करते…फक्त पद्धत प्रत्येकाची वेगळी असते..”
हे ऐकून त्या स्त्री च्या डोळ्यात पाणी आलं…
“खरं आहे…प्रत्येक स्त्रीची हरितालिका वेगळी असते..”