तिला पडलेले प्रश्न…!!!

मितालीचा केव्हाचा फोन येत होता, वृषाली तो फोन मुद्दाम उचलत नव्हती, एकीकडे रिंग वाजली की सायलेंट वर करून द्यायची…आणि दुसरीकडे पोळ्या लाटायची धावपळ सुरू होती..

“वृषाली फोन घे की…केव्हाचा वाजतोय…”

“मितालीचा आहे…आज नक्की माझ्या मागे लागणार शॉपिंग ला सोबत यायला..”

“जा की मग…त्यात काय इतकं..”

“हो हो…सोपच आहे ना…तुम्ही काय, ऑफिस ला निघून जातात…इकडे मला मुलांना तयार करून शाळेत पाठवायचं… घरातलं सगळं आवरायचं, बाबांचं वेगळं जेवण बनवायचं…अरे देवा…!!! सासूबाईंचा उपवास आहे आज…भगर टाकते पटकन… आता येतील त्या मंदिरातून…”

“अगं हळू, किती धावपळ करशील…दुपारी आराम करून घेत जा…”

“दुपारी आणि आराम?? शक्यच नाही, बाबांच्या गोळ्या दर दोन तासांनी आहेत, विसरले तर त्रास होतो त्यांना…सासूबाई आराम करत असतात…आणि मी घाई करते म्हणून तुमच्या गाड्या जोरात पळतात बरं का…हा घ्या डबा…या आता…”

“काय नशीब, वाटलं होतं बायको छान गाडीपर्यंत सोडायला येईल, जाताना फ्लाईंग किस देईल…”

“अच्छा…ही अपेक्षा आहे का तुमची?? चला…आज तुमची ईच्छा पूर्णच करते, बाबा बसलेत पार्किंग मधेच..समोरचे आजोबाही बाहेरच आहेत….सर्वांसमोर प्रदर्शन करूया…”

“सॉरी सॉरी…येतो मी…”

वृषालीने स्वतःचं सगळं सोडून घरासाठी स्वतःला झोकुन दिलं होतं… सकाळी उठल्यापासून घरातलं आवरणं, स्वयंपाक करणं, सासू सासऱ्यांची काळजी घेणं यापलीकडे तिच्या विश्वात काहीही नव्हतं..

सासूबाई मंदिरातून आल्या…अजून उपवासाचं काही बनलेलं नाही पाहुन त्यांनी तोंड वाकडं केलं…फोन घेऊन त्या गच्चीवर गेल्या आणि त्यांच्या बहिणीला फोन लावत बोलत बसल्या…

इकडे वृषाली भगर बनवायची तयारी करत होती, भगर काढायला गेली तर भगर संपलेली…

“अरे देवा…आता काय बनवू, सासूबाईंनाच विचारू त्यांना काय आवडेल…”

ती पळत पळत गच्चीवर गेली, सासुबाईंचं बोलणं कानी पडलं…

“मुलाचं लग्न करतेय? चांगली मुलगी बघा हो..जीव लावणारी, काळजी घेणारी….”

वृषाली ला हसू आलं, “थोडक्यात वृषाली सारखी बघा असं सांगायचं की आईंनी….” वृषाली मनाशीच बडबडली…

“चांगली घरकाम करणारी बघ….नाहीतर हे असं आमच्यासारखं होतं….”

काळजावर कुणीतरी विस्तव फेकावा अशी गत वृषाली ची झाली…

गेल्या दहा वर्षाचा काळ तिच्या डोळ्यासमोरून गेला…आणि तिला प्रश्न पडला…

“आई वडील सोडून या घरासाठी पूर्ण आयुष्य वाहून दिलं….कशासाठी???”

“स्वतःच्या पायावर उभं राहता येत असताना इतरांचा पाया डळमळीत होऊ नये म्हणून स्वतःच्या प्रगतीला आळा घातला…कशासाठी??”

“स्वतःची हौसमौज बाजूला ठेऊन फक्त घर एके घर डोळ्यासमोर ठेवलं…कशासाठी???”

“नवरा आई बापाची काळजी घ्यायला असमर्थ असताना बायको म्हणून मी ती जबाबदारी उचलली…कशासाठी??”

“घरात नवरा नसताना कुणी आजारी पडलं तर पदर खोचून मी धावपळ केली…कशासाठी???”

“माहेरी पाण्याचा पेलाही उचलून न ठेवणारी मी इथे येऊन मोलकरणी सारखी राबली….कशासाठी??”

“किंमत ठेवता येत नसेल तर निदान माझ्या त्यागावर शिंतोडे तरी नका उडवू…” असा विचार करत ती निघून गेली…

हेच ते प्रश्न, प्रत्येक स्त्री ला पडलेले….

2 thoughts on “तिला पडलेले प्रश्न…!!!”

  1. See this is what I meant when I said whtever you write is very good but it can not be called story. Can you plz try to write more and end it.

    Reply

Leave a Comment