तिच्याही कामाचा आदर कर…!!!

“अगं निशा ताई ऐक ना…ही माझी मैत्रीण जानकी..उद्या हिचं लग्न आहे, एका मोठ्या डिझाइनर कडून साडी वरचं ब्लाउज शिवून घेतलं होतं…खोलीत एका पिशवीत ठेवलं होतं अन नेमकं उंदराने ते कुरतडलं गं… बिचारी खूप टेन्शन मध्ये आहे…तसंच एक ब्लाउज पीस घेऊन डिझायनर कडे परत गेलो तर एक दिवसात होणार नाही म्हणे…ताई काहीतरी कर ना…”
“अगं हो हो…श्वास तर घे…ब्लाउज पीस आणलाय का? बघू दे इकडे… आज संध्याकाळी घेऊन जा… आता दुपारचे 3 वाजलेत, 7-8 वाजता येऊन जा…काळजी करू नकोस..”
जानकी खुश होऊन…”हुश्श…ताई खूप मोठं टेन्शन मिटवलस…तुझी खूप आभारी असेन मी…मग आता बिनधास्त राहू ना तुझ्या भरवशावर??”
“हो अगदी…काळजी करू नकोस..”
निशा एका छोट्याश्या घरात राहणारी मध्यमवर्गीय विवाहित स्त्री, नवरा एका चांगल्या कंपनीत कामाला होता..खाऊन पिऊन सुखी कुटुंब…निशा शिवणकाम करत असे, नवरी मुलींचे ब्लाउजही ती शिवायला घेत असे…त्या निमित्ताने चार बायका घरी यायच्या, चार गोष्टी समजायच्या…त्यामुळे तिच्या भागात तिचा जनसंपर्क चांगला होता….

दुपारचं सर्व आवरून ती काम करायला बसली, आधीचे काही ब्लाउज पूर्ण केले…आणि जानकी चं करायला घेतलं…
घड्याळात 6 वाजले होते…
इतक्यात तिचा नवरा, शशांक येतो आणि म्हणतो,
“अगं आवर ना..आपल्याला हळदीला जायचं आहे, आमच्या मोठ्या सरांच्या मुलाची हळद आहे…त्यांनी आवर्जून बोलावलंय दोघांना…”
“अरे बापरे…कशी काय विसरले मी?? खरंच लक्षात नव्हतं हो…”
“बरं मग आता आवर पटकन..”
“अहो ऐका ना…मला नाही येता येणार?”
“का?? काय झालं?”
निशा जानकी ची हकीकत सांगते..
“उद्या लग्न आहे हो तिचं… मला आता बसून पूर्ण करायचं आहे…तुम्ही जा, उद्या येईल की मी लग्नाला..”
“किती वेळा सांगितलं आहे की बंद कर तुझं ते काम, जेव्हा पाहावं तेव्हा घरात नुसती गर्दी…बायकांची खुसफुस नुसती…मला नाही आवडत ते…आणि राहू दे ते ब्लाउज…ती मुलगी पाहून घेईल तिचं…”
“अहो उद्या लग्न आहे तिचं..”
“तिला म्हणा मला वेळ नाही…”

“तुम्ही तुमच्या ऑफिस मध्ये इमर्जन्सी आली तर असंच करता का? कितीतरी वेळा जास्तीचं काम आलं म्हणून उशिरा येता…तुमचं जसं काम आहे तसं माझंही हे काम आहे…तुमचं काम ते फार महत्त्वाचं, आणि माझं ते क्षुल्लक?”
“किती कमावतेस गं ही कामं करून?”
“किती कमावते हे महत्त्वाचं नाही, काम हे काम असतं… तुझं भारी आणि माझं हलकं असं नसतं… तुमच्या कामाचा मी आदर करते, तुम्ही माझ्या कामाचा करा..”
“ते काही नाही, तुला माझ्यासोबत यावं लागेल..”
“नाही येणार, कर काय करायचं ते…”
शशांक चिडून निघून जातो, निशा जानकी चं ब्लाउज पूर्ण करते, थोड्या वेळात जानकी येते..
“झालं ताई??” ती घाबरत विचारते..
“हे काय.केव्हाच…”
“Thank god… ताई तुझे उपकार कसे मानू हेच कळत नाहीये गं…”
“अगं उपकार काय त्यात, माझं कामच आहे ते..”
जानकी खुश होऊन निघून जाते..
दुसऱ्या दिवशी निशा अन शशांक त्याच्या साहेबांच्या लग्नाला जातात…शशांक चा राग अजूनही निवळलेला नसतो, दोघेही मौन पाळतच लग्नात जातात…
शुभेच्छा द्यायला दोघेही स्टेजवर जातात…नवरी दुसरी तिसरी कुणी नसून जानकीच असते..
जानकी खुश होऊन…”ताई तू?? काशीकाय??”
निशा सुद्धा खुश होते…”काय योगायोग बघ, तुझं लग्न आहे मला माहितच नाही, मी आपलं यांच्या सरांच्या बाजूने म्हणजेच मुलाच्या बाजूने आलीये..”
“ए ताई नाही हं, तू माझ्या बाजूने…”
मुलाचे आई वडील तिथेच असतात, शशांक कडे त्यांचं लक्षही जात नाही, पण जानकी निशा ला इतकं आपुलकीने बोलतेय म्हणजे ही नक्कीच कुणीतरी जवळची असणार…
“काय गं? आमची ओळख करून दे…”
जानकी त्यांना सर्व हकीकत थोडक्यात सांगते…शशांक चे सर निशा चे आभार मानतात, त्यांचं लक्ष शशांक कडे जातं…”अरे शशांक तुम्ही? या तुमच्या मिसेस? नशीबवान आहात हा..”
निशा ला सर्वांनी मनाने वागणूक दिली, अगदी जेवणापर्यंत तिच्या सोबत दोन्हीकडची मंडळी होती..शशांक ते पाहून चाट पडला..त्याच्याहुन जास्त महत्व निशा ला दिलं जात होतं, जानकी ने आपल्या घरी अन नातेवाईकांनाही निशा बद्दल सांगितलं होतं, त्यातले जे जे भेटले त्यांनी आदराने निशा चे आभार मानले…
घरी जाताना निशा च्या चेहऱ्यावर अपार समाधान होतं… शशांक ला निशा सोबत काय बोलावं समजत नव्हतं.. त्याला त्याची चूक कळली होती…निशा त्याला फक्त एवढंच म्हणाली,


“काम कुणाचंही असो अन कुठलंही असो…एकमेकाच्या कामाचा आदर केला तर संसार टिकेल…”

6 thoughts on “तिच्याही कामाचा आदर कर…!!!”

  1. बायकांची कामे पुरुषयांना नेहमीच हलकी वाटतात, तू काय करतेस दिवसभर घरत बसून? असेच काही बोलून मदत करत नाही, आणि मी बाहेर किती काम करतो हे सांगितले जाते, तुमची स्टोरी खुप छान आहे, पुरुषांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.👌👍☺

    Reply

Leave a Comment