नवऱ्याशी भांडण झाल्यावर तावतावात ती घराबाहेर पडायला लागली, पण असं डायरेक्ट जाणार कसं? नवऱ्यासमोर आधी 2-3 धमक्या दिल्या…
“मी चाललीये बाहेर..”
हिमालयातल्या बर्फासारखा नवरा थंड..
मग अजून थोडी आदळआपट करून..
“मी जातेय बरं का..”
नवऱ्याला समजलं…की हिला थांब असं सांगितल्या शिवाय ही काही हलत नाही..
“कुठे चाललीस..”
नवऱ्याच्या प्रश्नाने आतून तिला गुदगुल्या होतात..पण तिला अजून भाव चढतो.. ती काहीच बोलत नाही..
“सांग की..”
बायको काहीही उत्तर देत नाही म्हणून जाऊदे मरूदे म्हणत नवरा पुन्हा मायनस डिग्री वर..
नवरा पुन्हा काही विचारत नाही म्हणून तीच म्हणाली..
“चाललीय मी एकाला भेटायला..”
“कोणाला??”
“आहे एक..”
“अगं पण कोण..?”
“सांगितलं ना…आहे एक..”
नवरा पुन्हा शांत. चेहऱ्यावरची माशीही हलली नाही..मग ती चवताळून म्हणाली..
“आहे माझा एक मित्र..कॉलेजचा..”
तिच्या एकंदरीत बोलण्यातून ही किती बनाव करतेय याचं त्याला खूप हसू आलं…त्याने मुद्दाम विचारलं..
“काय नाव त्याचं??”
असं अचानक नाव विचारल्यावर तिला नाव काही सुचेना..काय नाव सांगावं, कुणाचं ढापावं??
“काय गं”
“विकास…”
असंच एकाएकी नाव तिच्या तोंडात आलं…कोण हा विकास? ती मनाशीच विचारू लागली..कुणी का असेना, पण त्याने वेळ मारून नेली…
“बरं… जा हो..आणि त्याला माझा हाय सांग…”
तिला वाटलेलं की नवऱ्याला हे ऐकून राग येईल, तो माझ्यावर संशय घेईल, आणि आपण कमी पडतोय याची त्याला जाणीव होईल. पण कसलं काय…तो आता ‘विकास’ वर जबाबदारी सोपवून जणू मुक्तच झालेला…
बायकोने गाडी काढली, तासभर इकडे तिकडे टाईमपास केला..भूक लागली, कोपऱ्यावरच्या वडापाव वाल्याकडे 2 वडापाव खाल्ले..अन शेवटी घरी आली.
“काय मग…काय म्हणाला विकास??”
नवऱ्याचा आल्या आल्या प्रश्न..
“तो म्हणाला की तुझा नवरा जास्त त्रास देत असेल तर माझ्याकडे येऊन जा..”
“अगबाई… किती गं चांगला तुझा मित्र..”
“होना..”
“मग उद्या काय प्लॅन??”
“उद्या काय आहे??”
“विकास भेटायला नाही येणार तुला??”
“नाही… त्याला कामं आहेत..”
“करतो काय तो??”
“थांबा तुम्हाला त्याचा फोटो दाखवते”
असं म्हणत बायको फेसबुकवर विकास नाव सर्च करते, त्यातल्या त्यात बरा दिसणाऱ्या एका मुलाची प्रोफाइल त्याला दाखवते…
“हा बघा विकास”
नवरा त्याची प्रोफाइल एकदा बघतो, एक क्षण बायकोकडे बघतो…अन काहीही हावभाव न दाखवता खुशाल झोपी जातो..
दुसऱ्या दिवशी दाराची बेल वाजते…बायको दार उघडते… एक तरुण तिच्यापूढे उभा असतो. तिला चेहरा जरा ओळखीचा वाटतो…
“नमस्कार… मी विकास”
बायको दोन पावलं मागे सरकते…हा तोच विकास ज्याची प्रोफाइल मी नवऱ्याला दाखवली. मागून तिचा नवरा येतो…विकास म्हणतो..
“नमस्कार, मी विकास…तुमच्या बायकोचा मित्र…”
बायको एकदम हडबडून जाते, तिला दरदरून घाम फुटतो, आपल्या मोडलेल्या संसाराची चित्र तिला दिसू लागतात..
“अहो हा खोटं बोलतोय काल मी तुम्हाला सहज गम्मत म्हणून विकास चं नाव सांगितलं अन हा खरंच आला हा माणूस खोटं बोलतोय, मी काल राधाच्या घरी गेलेले तिथेच कितीवेळ होते वाटल्यास तुम्ही तिला फोन करून विचारू शकता”
बायको एका दमात सगळं सांगून टाकते, तिला घाम फुटलेला असतो, अंग थरथर कापत असतो..
तिचं ते अवसान पाहून विकास अन नवरा जोरजोराने हसायला लागतात..बायको कावरीबावरी होते..
“अगं हा माझा मित्र विकास. कालच दुबईहून आलाय, तू मजाक मजाक मध्ये माझ्याच मित्राची प्रोफाइल मला दाखवली अन ते पाहून मला हसू आवरेना…म्हणून त्याला शेवटी बोलवूनच घेतलं…”
“वहिनी…कशी वाटली गम्मत??”
त्या दिवसापासून ‘विकास’ नाव घरात घेण्यात पूर्ण मनाई आहे.