तिचं विश्व -2

“कुणी सांगितले होते उपास करायला?..” नवरा म्हणाला,

“म्हणून तुला म्हणत होतो ते झुंबा वगैरे क्लास करू नकोस, बघितलं ना आता? या वयाला झेपणार नाही” मंदार म्हणाला..

“अशी एकटी जाऊ नकोस परत, मला सोबत नेत जा.मी आज संध्याकाळी मित्रांना जेवायला बोलावणार होतो बघ, राहिलं आता” – केदार म्हणाला..

आईला जे वाटलेलं त्याच्या अगदी उलटं होत होतं..

तिची काळजी तर सोडाच, वर या परिस्थितीला तीच कशी जबाबदार आहे हे सांगण्यात येत होतं..

तिला या सगळ्या प्रकाराने धक्काच बसला..

हळूच तिने बॅगेतून प्रिस्क्रिप्शन काढलं आणि केदारकडे दिलं..

“एवढ्या गोळ्या आणशील?”

केदारने घाईघाईत तो कागद फाईलमध्ये ठेवला आणि तो त्याच्या कामाला पळाला..

तिला रस्त्यावर मदत केलेली ती 2 मुलं आठवली,

रक्ताची नव्हती पण काळजी केलेली त्यांनी..

“माझी मुलं आहेत” असं किती विश्वासाने ती सांगत होती, पण…

मंदारला चांगली नोकरी मिळावी म्हणून तिने उपास केलेले,

केदारच्या पुढच्या शिक्षणाला पैसे राहावेत यासाठी ती बचत करत होती..

नवऱ्यावर कामाचा भार पडू नये म्हणून स्वतः धावपळ करत होती..

सकाळी उठल्यापासून तिचं आयुष्य यांच्याभोवती फिरायचं..

तिचं स्वतःचं असं काही जगच नव्हतं..

या कुटुंबामध्येच ती स्वतःचं जग पाहत होती..

पण ती त्यांची विश्व होती,

त्यात हिला फक्त एक मदतनीस म्हणून थारा होती..

आज तिला समजलं..

दुसऱ्यांचे विश्व फुलवतांना स्वतःचं विश्व फुलवायचंच राहिलं..

तिला जुने दिवस आठवले,

नवरा यायचा, आल्यावर ती त्याच्यामागे फिरत असायची..

त्याला काय हवं काय नको..

पण तिला काय हवंय हे त्याने कधी विचारलंच नाही..

तिचं ऐकून घेण्यासाठी साधा आपला कानही त्याने दिला नाही..

मग शेवटी तीच ऍडजस्ट झाली..

याची सवय करून घेऊ लागली..

नवरा आज आपल्याला फिरायला नेईल,

बाहेर जेवायला नेईल,

काही नाही तर निदान जवळ बसून विचारपूस करेल..

याची दिवसेंदिवस ती वाट बघे..

याच्या जवळपास जरी एखादी गोष्ट घडली तरी तिला स्वर्गसुख मिळे..

मग पुन्हा असं कधी घडेल या स्वप्नात ती पुढील दिवस ढकलायची..

एके दिवशी तिच्या खिडकीतल्या कुंडीत एक नवीन रोपटं तिला दिसलं..

तिने कुतूहलाने पाहिलं..

तिला आठवलं,

टोमॅटोची एक बी तिने सहज कुंडीत टाकलेली आज त्याचंच रोप बनून वर आलेलं..

तिने अजून काही कुंड्या घेतल्या, त्यात वेगवेगळी रोपं लावली..

तिची बाग फुलू लागली..

मागच्या बाजूला बरीच जागा होती..

तिच्या डोळ्यात एक आशा पल्लवित झाली..

“आता स्वतःचं एक विश्व निर्माण करायचं… असं एक हिरवं जग जिथे फक्त मीच असेन..जिथे मी रमेन..”

तिने वेगवेगळ्या फळ फुलझाडांची लागवड केली,

****

भाग 3 अंतिम

1 thought on “तिचं विश्व -2”

Leave a Comment