डॉक्टर cool (भाग 5)

शिल्पा अत्यंत चतुराईने गुन्हेगारांना पकडून देते. डिपार्टमेंट कडून तिचा यथोचित सत्कार होतो, पेपर मध्ये तिचा फोटो येतो आणि सर्वत्र कौतुक होते.

शिल्पा चं एक स्वप्न होतं, गरीब लोकांसाठी एक हॉस्पिटल सुरू करायचं, तिथे त्यांना मोफत सुविधा द्यायच्या. पण यासाठी भरपूर पैसे लागणार होते. हा सगळा विचार डोक्यात चालू असतानाच एक महिला पेशंट येते…

“बोला, काय त्रास होतोय?”

“कम्बर जाम झालंय, पाय दुखताय… आणि चक्कर येते…”

शिल्पा ला तिचा खरा त्रास समजला…

“तुमचे मिस्टर नाही आले सोबत?”

“ते कसले येताय…त्यांना काय पडलीये माझी..”

“पुढच्या वेळेस त्यांना आणा, माझं नाव सांगा…”

असं म्हणत शिल्पा त्यांना काही औषधं लिहून देते..

काही दिवसांनी तीच महिला नवऱ्याला घेऊन पुन्हा हजर…मागच्या वेळी झपझप पायरी चढून आलेली ती यावेळी कंबरेला हात लावत नवऱ्याचा आधार घेऊन चढत होती…शिल्पा ला ते पाहून हसू आलं…

“या या…किती अंगावर काढताय तुम्ही? किती सहन करावं माणसाने?..आणि यायला खूप उशीर केला तुम्ही, लवकर आल्या असत्या तर लवकर बऱ्या झाल्या असत्या..”

बायकोच्या त्रासाला किरकोळ समजून दुर्लक्ष करणारा नवरा आता मात्र गंभीर झाला,

“मॅडम नक्की काय झालंय ? काही गंभीर नाही ना?”

“तसं गंभीर आहे…हा त्रास आता थांबला नाही तर मोठं स्वरूप घेऊ शकतो…झटका येऊ शकतो किंवा attack, किंवा कॅन्सर सारखा आजार..”

“मॅडम काहीही करा पण माझ्या बायकोवर चांगले उपचार करा…”

त्या महिलेला कळत नव्हतं..किरकोळ दुखणं आहे, पण आता इतका मोठा ड्रामा केल्यावर कबूल कसं करणार?

“तुम्ही त्यांचे मिस्टर ना? आता यांना पूर्ण मदत करायची, कुठलीही जड कामं यांना करू द्यायची नाही… त्यांचा मनावर ताण येईल असं काहीही बोलायचं नाही वागायचं नाही…त्यांना जराही त्रास होता कामा नये…”

ती महिला जाम खुश झाली, हेच तर हवं होतं तिला…नवऱ्याचं attention, त्याची काळजी… जे तिला मिळत नव्हतं… आता शिल्पा च्या निमित्ताने का होईना ते मिळणार होतं…

ती महिला खुश, शिल्पा खुश…दोघे नवरा बायको घरी गेले. ती महिला खुश झाल्याने तिने अजून चार बायकांना सांगितलं..

“डॉक्टर शिल्पा म्हणून आहे ..कुठलंही दुखणं असू दे, माणूस 100% बरा होणार म्हणजे होणार…”

त्या चार बायकांनी स्वतः अनुभव घेतला…शिल्पा मॅडम ची एकच अट असायची, “नवऱ्याला सोबत आणायचं..”

एकदा का त्याला ठाकून ठोकून घेतलं की बायका खुश…

एके दिवशी सागर नेहमीप्रमाणे चेकप ला आला..सोबत रिपोर्ट्स आणले,

“हे घ्या मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी टेस्ट केल्या आहेत…”

शिल्पा ते रिपोर्ट बघते, त्यात बरीच सुधारणा असते..

“गुड…अरे हे फक्त एक फॉर्मलिटी म्हणून, तुझी आधीची ट्रीटमेंट चालू होती ना म्हणून..”

“हो मॅडम, माझी सगळी भीती गेलीये आता…मी काही मरणार बिरणार नाहीये..”

सागर कमालीचा खुश होता, शिल्पा ला भेटून तो अक्षरा ला भेटायला निघून गेला..

इतक्यात एका रक्तबंबाळ मुलीला घेऊन आई वडील दवाखान्यात आणतात, तिने हाताची नस कापलेली असते….

“डॉक्टर, आमच्या मुलीला बघा ओ…काहीही करून वाचवा तिला..”

शिल्पा चेक करते, रक्त बरंच गेलेलं असतं पण जखम वरवर असते…नसपर्यन्त जखम गेलेली नसते…त्यामुळे काळजीचं कारण नव्हतं…खरं तर ही पोलीस केस होती पण शिल्पा ने ती आपल्या पद्धतीने हाताळायची ठरवली…

शिल्पा ने तिच्या आई वडिलांना बाहेर पाठवलं, त्या मुलीची ड्रेसिंग केली, तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की प्रेमप्रकरणातून तिने हे सगळं केलं आहे.

शिल्पा म्हणाली,

“एक अर्जंट इंजेक्शन द्यावं लागेल…”

ती मुलगी काहीही बोलली नाही…

शिल्पा तिचा फोन मागवते आणि बाजूला जाऊन चेक करते…नशीब काही पासवर्ड नव्हता…ते मेसेज वाचून तिचं बॉयफ्रेंड सोबत झालेलं संभाषण तिला समजूत…
ते असं असतं..-

“जानू मी तुझ्यावर इतकं प्रेम करते की तुझ्यासाठी मी काहीही करू शकते.”

“आणि मी तर इतकं करतो की तुझ्यासाठी आकाशात जाऊन चंद्र तारे घेऊन येऊ शकतो..”

“खरंच..”

“हो मग..पण मला वाटतं तू नाही इतकं प्रेम करत माझ्यावर…मी इथे तुझ्यासाठी जीव देऊ शकतो, पण तू? तू तर मला रिप्लाय द्यायला इतका वेळ लावतेस..”

“जानू माझ्यावर भरोसा नाही??”

“…..”

बस…एवढं बोलून ती मुलगी नस कापते, आणि त्याला हे दाखवते की ती त्याच्यासाठी काय करू शकते ते..

शिल्पा ला या अल्लड गोष्टींचा राग येतो.. ती तडक तिच्यासमोर तिच्या बॉयफ्रेंड ला फोन लावते..स्पीकर वर टाकते…. ती मुलगी शिल्पा च्या हातात फोन बघून घाबरते…

“हॅलो अजित…अरे सुवर्णा ने हाताची नस कापली आहे…तू ताबडतोब ये…काही औषधं आणायची आहेत…

क्रमशः

डॉक्टर cool (भाग 6 अंतिम)

Leave a Comment