टॉप सिक्रेट

 “झालं बुवा एकदाचं ऍडमिशन.. आई तुला माहितीये, लोकांचा नंबर लागत नाही या कॉलेजला.. नशिबाने माझा नंबर लागून गेला..”

“ते ठीक आहे पण कुणाला सांगू नकोस..”

“का सांगू नको??”

“ऐक फक्त..कुणी विचारलं तर सांग शोधतोय म्हणा कॉलेज..”

“काय गं आई, तुझं आपलं भलतंच..”

“अरे..तुला नाही कळणार. सांगते तेवढं कर फक्त..”

हा संवाद कधी ना कधी कानावर पडलाच असेल ना? बऱ्याच मंडळींना सवय असते, “कुणाला सांगू नको..” करत आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी यांना गुप्त ठेवायच्या असतात. त्यामागे कारणही काही ठोस नसतं, विशिष्ट गोष्टी ठीक आहेत पण अगदी “नवीन घर बघतोय” ही गोष्टही त्यांना कुणाला सांगू वाटत नाही. अशी लोकं काहीवेळा अगदी तोंडावर पडतात, समोरच्याला खरं सगळं माहीत असतं पण तो परीक्षा घेत असतो, अन समोरचा सपशेल खोटं बोलतोय हे लक्षात येताच त्या व्यक्तीबद्दल मनात अढी बसते ती कायमचीच. मग या ना त्या प्रकारे खोटं बोलणाऱ्या व्यक्तींबद्दल माहिती काढायची, खरं खोटं करायचं असे लोकही यांचा पिच्छा सोडत नाही.

याउलट काही माणसं दिलखुलासपणे सगळं सांगत असतात, आयुष्यातले निर्णय, जीवनातल्या घटना सगळं अगदी मनमोकळेपणाने व्यक्त करतात. कसलंही गुपित जपायचं यांना ठाऊक नसतं.

मला तिसरा महिना लागला, 3 महिने कुणाला सांगायचं नाही हे तर मी पाळलं, पण नंतर मात्र जे वेगळया नजरेने पोटाकडे बघत त्यांना स्वतः जाऊन सांगितलं की मला चौथा महिना लागलाय. कसं आहे ना, जर लपवलं तर चार बायकात जास्त चर्चा..

“ती प्रेग्नंट आहे का गं??”

“पोट पुढे दिसतंय..”

“ती तर काही सांगत नाही…पण असावं बहुतेक..”

अश्या नाना चर्चां होण्यापेक्षा “होय आहे मी प्रेग्नंट..”

एवढं सांगून विषयाला पूर्णविराम दिला. आता हे समजल्यावर माझे कुणी डोहाळे तर पुरवणार नव्हतं पण त्यांची खर्ची होणारी वाणी मी वाचवली एवढं नक्की. कुणाला काही न सांगण्यामागे विशेष असं कुठलही शास्त्रीय कारण नसतं, पण तरीही या लोकांना गोष्टी लपवून सपशेल खोटं बोलायला काय आनंद वाटतो देव जाणे. 

जय आणि केतन, सख्खे भाऊ. जयला सगळं गुपित ठेवायला आवडायचं याउलट केतन सगळं सांगून मोकळा व्हायचा. दोघेही प्लॉट खरेदीसाठी जमीन बघत होते. केतनने तर जयला ताबडतोब आपल्या निर्णयाबद्दल कळवलं होतं, पण जय मात्र गपचूप सगळा कारभार करे अन भावालाही कळू द्यायचा नाही. हायवे जवळ एक जमीन होती, दोघं भावांना ती आवडली होती पण त्याचा मालक reachable नव्हता. त्यामुळे दोघांचं अडून राहिलेलं.

 एकदा असंच त्यांच्या घरी त्यांच्या वडिलांचे मित्र आले, गप्पांमध्ये केतनने सहज आपल्या जमीन खरेदी बद्दल सांगितलं..

“काका..अहो ती वडाळा हायवे जवळ एक जमीन आहे, स्वस्तात किमती चालुयेत तिथे..पण त्या जमिनीचा मालक काही सापडत नाहीये बघा..”

केतनला असं उघडउघड सगळं ओकून देताना बघत जयला विचित्र वाटलं, “कशाला सगळं सांगत बसतो हा..” तो मनाशीच बोलला..

“कुठल्या ठिकाणी नेमकी??”

“ते खंडोबाचं मंदिर आहे ना, त्याला लागूनच अगदी..”

“अरे काय सांगतोस.. ती तर माझ्या मित्राची जमीन आहे..”

“हो काय? पण त्यांचा काही नंबर लागेना..”

“कसा लागणार, अंथरुणाला खिळून आहे..त्याचा मोबाईल मागे एकदा गेला चोरीला..तेव्हापासून नंबर गेला त्याचा, त्याचा मुलगा बघतोय त्याचं. मला म्हणत होता की काका जमिनीला कुणी ग्राहकच मिळत नाहीये, कुणी असेल तर बघा..पाहिजे त्या किमतीत विकत घे म्हणा अन मला मोकळं कर..मला सगळं आवरून मुंबईला जायचं आहे..”

हे ऐकून केतन एकदम खुश झाला, जय मात्र ऐकूनच गार. वडिलांचे हे मित्र त्याला काही दिवस अगोदरच भेटायला आलेले, तेव्हा त्यांना या जमिनीबद्दल विचारलं असतं तर?? जयचा असा लपवून ठेवण्याचा स्वभाव त्याला आडवा आला.

एका विशिष्ट बिंदू पर्यंत गुपित जपणे ठीक असते, पण अगदीच डोळ्यांना दिसत असूनही लपवाछपवीचे प्रयत्न माणसाप्रतीचा आदर कमी करतात हे नक्की.

Leave a Comment