टेढी उंगली

कोरोना मुळे lockdown घोषित केला असताना सुद्धा काही मंडळी निर्धास्तपणे रस्त्यावर फिरत होती. जिल्ह्यातील एक पोलीस श्री. काळे स्वतः रस्त्यांवर थांबून जमावाला पिटाळत होते.

रस्त्यावर एखादी गाडी दिसली की त्याला थांबवून.

“ओ सर कुठे चाललात?”

“साहेब मला जाऊद्या, किराणा आणायचा आहे..”

“ओ मॅडम, कुठे?”

“साहेब मला जाऊद्या भाजीपाला आणायचा आहे..”

काळेंनी त्याची शहानिशा करण्यासाठी त्यांच्यामागे गपचूप पोलीस धाडले, आणि समजलं की हे काही किराणा अन भाजीपाला आणायला नाही तर सहज फेरफटका मारायला निघालेत, काहीजण मित्राकडे तर काहीजण नातेवाईकांकडे…

काळेंच्या नाकी नऊ आले…लोकं खुशाल जमाव करत उभी राहत…काहीजण उगाच गाड्यांवर फेरफटका मारत.. काळे त्यांना समजावून समजावून थकले, त्यांचं डोकं दुखायला लागलं….जवळच्या एका दवाखान्यात ते डोकेदुखी साठी गेले..

“काय करावं सांगा आता…आम्ही पोलीस आणि तुम्ही डॉकटर लोक दिवसरात्र लोकांसाठी राबतोय, लोकांना या संकटातून बाहेर काढावं म्हणून जिवाचीही पर्वा करत नाहीये पण ही लोकं…”

डॉक्टर जाधव पोलिसांना चेक करतात, त्यांना डोकेदुखी साठी गोळ्या देतात…

“मिस्टर काळे, तुम्ही म्हणत असाल तर आपण या गर्दीला एका दिवसात पिटाळू शकतो..”

“कसं काय?”

“मी सांगतो तसं करा…प्रत्येक पोलिसाने मास्क बांधा…असं कुणी बाहेर दिसलं की मुद्दामहून लांबून शिंका..त्याचा नंबर लिहून घ्या आणि मला द्या…पुढचं मी बघतो..”

“याने फरक पडेल?”

“हो…सिधी उंगली से नही निकला तो उंगली टेढी करनी पडती है सहाब..”

काळेंना हसू आलं…पोलिसांना तसं सांगण्यात आलं..आणि त्या दिवशी जवळपास 30 लोकांचे फोन नंबर डॉकटर कडे आले..

डॉकटर जाधवांनी प्रत्येकाला फोन केला…

“नमस्कार…तुम्ही बाहेर पडल्यावर पोलिसांच्या संपर्कात आला होतात काय?”

“मग तुम्हाला तातडीने चाचणी करावी लागेल?”

“का? काय झालं डॉक्टर?”

“त्या पोलिसांना कोरोना झालाय..”

फोनवरच्या लोकांना आठवलं, आपल्याकडून नम्बर घेताना पोलीस शिंकले होते…

ती लोकं प्रचंड घाबरली…कोरोना मुळे नाही तर भीतीनेच आजारी पडली..

“काय दुर्बुद्धी झाली अन बाहेर गेलो…”

लोकं स्वतःला कोसू लागली…

डॉक्टरांनी एकेकाला बोलवून घेतलं…त्यांचे सॅम्पल घेतले…आणि त्यांना सांगितलं…

“रिपोर्ट येई पर्यंत स्वतःला quarantine करा…”

लोकं स्वतःला कोंडून घेऊ लागली…त्यांना हीच शिक्षा योग्य होती..

दुसऱ्या दिवसापासून रस्त्यावर एकही माणूस दिसेना…सर्वजण चुपचाप आपापल्या घरी बसले…

काळे आणि जाधव एकमेकांना म्हणतात…

“कधी कधी लोककल्यणासाठी शक्तीपेक्षा युक्ती वापरलेली बरी…”

असं म्हणत दोघेही योध्ये आपापल्या लढाईत विजयी होतात…

Leave a Comment