जोडीदार

 अरविंद अन त्याच्या बायकोचा वाद आता लग्न तोडण्याच्या निर्णयापर्यंत आलेला. अरविंदची बायको तापट स्वभावाची, चुकीचं काही सहनच होत नसे तिला. पण अगदी साफ मनाची, स्पष्ट बोलून ती मोकळी व्हायची. पण हा स्वभाव जुनाट विचारांच्या घरी तरी कसा मानवणार? रोज नवीन कटकट, नवीन वाद. एखाद्या कामात चार जणांचे हात लागले की एकमेकांना दुसऱ्याचं पटेना. अरविंद ची आई मी म्हणेल तेच व्हायला हवं या स्वभावाची. साहजिकच अश्या घरात वादाला तोंड फुटलं अन अरविंद अन त्याच्या बायकोला वेगळं करण्यासाठी घरातले हात धुवून मागे लागले. दिप्तीला तरी कुठे राहायचं होतं अश्या माणसांसोबत. तीही तयारच होती. 

ही गोष्ट नातेवाईकात पसरली, एक काय तो निर्णय घ्यायचा म्हणून जवळच्या काही लोकांना बोलावून घेतलं, एकमेकांवर दोषारोप करून झाले, आरडाओरडा झाला..अखेर रागाची परमोच्च सीमा गाठून आता लग्न मोडायचंच असा सगळ्यांनी चंग बांधला.

अचानक अरविंद चा मामा संतापाने आत आला आणि सर्वांवर ओरडला..

“लग्न म्हणजे खेळ वाटला काय? या दोघांचं लग्न मोडायचं की टिकवायचं हे ते दोघे ठरवतील, तुम्ही का मध्ये तोंड घालताय??”

“दादा तुला घरातल्या गोष्टी माहीत नाही..हिच्या वागण्याने सर्वांना त्रास होतोय..”

“का? ती तुमच्या मनासारखं वागत नाही म्हणून? की हातातील कटपुतली झाली नाही म्हणून??”

“दादा..तुला काही हक्क नाही बोलायचा..” 

“तू जरा शांतच राहा..आज मला बोलू दे. अरविंदा..तुला खरंच त्रास आहे का रे तुझ्या बायकोचा?? की फक्त घरचे तिच्याबद्दल तक्रार करताय म्हणून तुही मनात अढी घेऊन बसलाय??”

स्वतःची बुद्धी न चालवता दुसऱ्याच्या बुद्धीवर फक्त जगणाऱ्या अरविंदाने आज खरोखर विचार केला. दीप्ती पासून त्याला काय त्रास होता? काहीच तर नाही, एक बायको म्हणून ती सगळं काही कर्तव्य करतच होती की, कधी कसली मागणी केली नाही की कसला हट्ट..फक्त आई सांगायची तेंव्हापुरता त्याला राग यायचा, मग घरातले जे सांगतील तशीच छबी त्याच्या मनात बसलेली..लग्न मोडण्याचा निर्णयही आईनेच त्याला सांगितला होता..तुलाही आमचा त्रास सहन होत नसेल, तुझ्या घरच्यांना तुझ्या बायकोमुळे होणारा त्रास तुला बघवत नसेल, सोडून दे तिला..असं आईनेच त्याच्या मनावर थोपवलं होतं. दिप्तीलाही अरविंदची सोबत आवडायची, पण दोघांना असा वेळ तरी किती मिळायचा? एकमेकांबद्दल प्रेम निर्माण होईल असा म्हणावा तसा सहवास त्यांना लाभलाच नव्हता..पूर्णवेळ दिप्तीची उणिदुनि काढण्यातच जाई.

मामांनी मात्र आज मौन सोडलं. 

“अरविंदा..अरे तू तरी कसा तयार झालास रे..पटली नाही म्हणून बायकोला सोडायचं, आणि दुसरी पण तशीच निघाली तर? पुन्हा तिसरी..हाच खेळ खेळायचा आहे का आयुष्यभर? अरे तुझ्या ताईला आजवर कुणीही पटलेलं नाही, सगळ्या माणसात वाईटच दिसतं तिला..”

“बहिणीच्या घरी येऊन तिच्याच घरी आग लावतोस? अरे तू काय सांगतोस लग्नाबद्दल, तू स्वतः स्वतःचं लग्न मोडून घेतलंस..दुसऱ्याला काय शिकवतोय..”

“तीच चूक अरविंदाने करू नये म्हणून सांगतोय, काय कमी होती गं कावेरीत?? सगळ्यात सुंदर, सुशील अन सुगरण बाई होती ती, 2 वर्ष मूल झालं नाही म्हणून तुम्ही माय लेकींनी तिला वांझोटी ठरवत घराबाहेर काढलंच ना? माझेही कान भरले, काय दुर्बुद्धी झालेली मला जे तुमचं ऐकलं..आपली आई अन तू, माझा संसार मोडायला लावून स्वतः मस्त आपापल्या संसारात रमले, इथे माझं काय झालं असेल कुणी विचारलंही नाही. इतकी वर्षे एकटेपणाने जगतोय, तेव्हा दिसलो नाही तुम्हाला.पण जेव्हा बायको सोबत होती तेव्हा कायम माझ्या अवतीभवती तिचे गाऱ्हाणे करत फिरायच्या. ती जशी होती तशी चांगली होती, आज ती सोबत असती तर आयुष्यात मार्गी लागलो असतो, पण तुमच्या बोलण्यात फसलो..पण अरविंदा, तू ही चूक करू नकोस, अरे तू तापट असतास तर तुझ्या बायकोने ठपका ठेवला असता का तुझ्यावर? तुला सांभाळूनच घेतलं असतं ना? असं एकमेकांना संभाळूनच संसार करायचा असतो..एकमेकांसाठी..आयुष्यभर फक्त आपला जोडीदार सोबत राहतो, बाकीची आपापल्या जीवनात व्यस्त असतात…आपल्या जोडीदाराचा विचार फक्त आपण करायचा असतो, दुसऱ्यांच्या सोयीसाठी आपण आपला जोडीदार निवडत नाही..त्यामुळे दुसऱ्यांची गैरसोय होत असेल तर तो प्रश्न त्यांनी सोडवावा..”

मामा खूप काही बोलून गेला. बहीण रागाने त्याच्याकडे बघत होती.. दगड बनून राहिलेल्या अरविंदाने आज मात्र स्वतःची बुद्धी वापरली होती .. दिप्तीच्या शेजारी उभा राहून तिचा हात त्याने घट्ट पकडून ठेवला..अन मौनाच्या या सोहळ्यात सर्वांना सडेतोड उत्तर मिळालं…

9 thoughts on “जोडीदार”

  1. खूप छान गोष्ट आहे.ही गोष्ट वाचल्यावर कोणी आपल्या आयुष्यात अशी चूक करणार नाही.

    Reply
  2. खरयं लग्न आपण आपल्या सोयीसाठी करतो दुसऱ्यांच्या नाही… खूप छान शब्द

    Reply
  3. खरयं लग्न आपण आपल्या सोयीसाठी करतो दुसऱ्यांच्या नाही… खूप छान शब्द

    Reply

Leave a Comment