जोडलेली माणसं.

 घराच्या अंगणात अण्णा येरझारा घालत होते, त्यांचं मन स्थिर नव्हतं..शहरात असलेल्या आपल्या मुलाला ऍडमिट केलंय म्हटल्यावर अण्णांना नुसती चक्कर येत होती. राहुलच्या मित्राचा फोन आलेला..

“काका राहुलला ऍडमिट केलंय, जमलं तर येऊन जा..”

त्याने फार काही माहिती दिली नव्हती, पण अण्णांच्या मनात नको ते विचार येऊन गेलेले..पटकन सदरा चढवून ते तयार झालेले…शेजारच्या बाळूला रिक्षा आणायला सांगितली..तिथून बस स्टॅण्ड वर जाऊन ते बस पकडणार होते..त्यांची बायको मालती बॅग भरत होती..

“आवर गं पटकन..पोरगं तिकडे एकटं आहे…त्याची बायको एकटी काय काय करणार..तरी मी सांगायचो, अरे नातेवाईकांकडे जाणं येणं ठेवायचं..वेळेला तेच कामात येतात…पण या दोघांना फक्त नोकरी एके नोकरी.. कुणाकडे येणं नको अन जाणं नको…मागच्या वेळी मी आजारी पडलो, गावाहून नातेवाईकांची फौजच्या फौज आलेली बघायला..राहुलला काही करायचं बाकी ठेवलंच नाही..”

अण्णांना काळजी आणि राग एकत्रच येत होते. राहुल तसा मितभाषी, अभ्यासात हुशार. अण्णांना लोकसंग्रहाची भारी हौस. जातील तिथे ओळखी करून लोकांना जोडतील. प्रत्येक लग्नाला ते हजर, कारण तिथे नातेवाईक भेटतात, संबंध वाढतात..सणावाराला प्रत्येक नातेवाईकाला फोन करून शुभेच्छा देत, एकही दिवस असा जायचा नाही ज्या दिवशी घरात पाहुणे नाही..अण्णांना वाटे मुलानेही आपल्यासारखं असावं. पण राहुल वेगळाच होता.

अखेर मालतीताई आवरून बाहेर आल्या, देवाच्या पाया पडत रिक्षात बसल्या, हातात जपमाळ घेऊन त्यांचा जप सुरूच होता.. अण्णांना काही शांत बसवेना..ते मालतीला बोलू लागले..

“कसकाय चक्कर आली असेल या मुलाला?? पार्ट्या करत असेल, आता काय, शहरात गेला..मोकळं रान..दारू बिरु ढोसली असेल..दुसरं काय..”

“आपला राहुल नाही हो असा..”

“तरी मी सांगायचो, याला आपल्यासोबत फिरवत जाऊ जरा..पण हा पठ्ठा, कुठे जायचे म्हटले की अभ्यासाचं कारण करून टाळायचा…कुणाशी बोलणं नको अन कुणाशी ओळखी नको..”

“आता कशाला काढताय जुन्या गोष्टी..”

“नाहीतर काय करू? नशीब त्या केतन ने तरी फोन केला…आता तिकडे त्याची बायको काय धावपळ करत असेल देव जाणे, हेच जर जरा माणसात मिसळला असता तर चार लोकं धावून आले असते त्याच्या मदतीला…”

प्रवास करत अण्णा आणि मालती हॉस्पिटलमध्ये पोहोचले… केतनने त्यांच्या हातातली बॅग घेतली अन पेशंटच्या खोलीकडे ते चालू लागले… जसजशी खोली जवळ येत होती तसतशी अण्णा आणि मालतीची धडधड वाढत होती..अखेर बेडवर राहुलला बसलेला पाहिला आणि अण्णांच्या जीवात जीव आला..

“अण्णा? तुम्ही?”

“कसा आहेस पोरा? काय झालं तुला??”
रडवेल्या सुरात अण्णा विचारू लागले..

“केतन अरे मला इतकं काहीही झालं नाही, तू लगेच घरी फोनही केलास…अण्णा मला काही नाही झालेलं..बस थोडा अशक्तपणा आलेला अन चक्कर आली म्हणून..”

शुभदा नारळपाणी हातात घेऊन तिथे आली, अण्णा आणि मालतीला बघून तिने पटकन नमस्कार केला..अण्णांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला..

“पोरी आता आम्ही आलोय, काळजी करू नकोस…डॉक्टर कुठे आहेत? भेटून घेतो त्यांना..”

केतन त्यांना डॉक्टर कडे घेऊन गेला..तिथे राहुलचे 2 बॉस डॉक्टरांशी बोलत होते…

“हे कोण?”

“राहुलचे बॉस..”

राहुलच्या बॉस ला किती काळजी हे पाहून अण्णांना बरं वाटलं..अण्णा डॉक्टरशी बोलले अन काळजीचं कारण नाही असं त्यांनी सांगितलं..

“बरं केतन, बिल वगैरे कुठं करायचं, काही कागदपत्र भरावी लागतात…ते काम करून घेऊ..”

अण्णा काउंटर वर जातात, तिथे राहुलच्या चार मित्रांनी आधीच ते काम केलेले असते आणि पैसेही भरून दिलेले असतात..

अण्णा पुन्हा राहुल जवळ येतात…राहुल त्याच्या मित्रांच्या गराड्यात अस्पष्ट दिसत असतो..

“हे आणि कोण?”..

“राहुलच्या कंपनीतील मित्र..”

“चला, म्हणजे मित्र तरी जोडले याने..”

मालती ताई म्हणाल्या, “सुनबाई, तू दमली असशील…घरी जा, फ्रेश हो, आम्ही थांबतो .घरातली कामही खोळंबली असतील ना..”

इतक्यात डबा घेऊन राहुलचे शेजारी जोशी मावशी येतात…

“शुभदा, घरातलं मी सगळं आवरलं आहे बरं का..कपडे धुवून वाळवून घड्या घालून ठेवल्या, सिंक मधले भांडेही आवरून ठेवले..”

“मावशी कशाला इतकं..”

“असं कसं, तुम्हा दोघांनी आम्हाला पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम दिलं…आई बाप म्हणून आमचं कर्तव्य आम्ही करतोय..”

खोलीत गर्दीच जमलेली..कधी मित्र येत, कधी शेजारी..एक झाले की दुसरे…दिवसभर चालूच होतं… अगदी इस्त्रीवाला अन दूधवाला सुद्धा नारळ घेऊन राहुलला आवर्जून भेटायला आले..

2 दिवसांनी राहुलला डिस्चार्ज देण्यात आला…अण्णा आणि मालती काही दिवस राहुलकडेच थांबले…घराला सूनबाईने अगदी चकचकीत ठेवलं होतं..गॅलरीत लावलेली रोपटी पाहून अण्णांना मालतीची आठवण झाली…

गावाकडे निघतांना मालतीच्या चेहऱ्यावर कौतुकाचं हसू होतं… अण्णांना त्या टोकू लागक्या.

“बघा…माझ्या मुलाला बोलत होते ना, पण शेवटी बापाचाच तो…बापाचे गुण थोडी ना सोडणार..”

“खरंय गं… मला वाटायचं ही पोरं नोकरीवर जातात, ही काय लोकसंग्रह करतील ..पण ही पिढी कामाच्या ठिकाणीही माणसंच जोडतात, मोजकीच पण जीवाला जीव देणारी..आज माझ्या मुलाचं वैभव पाहून डोळे दिपून गेले माझे… आता कसलीही चिंता नाही..”

Leave a Comment