जुने कपडे-3

 वर्ष सरली,

थोरलीची मुलं फारशी शिकली नव्हती, पण चुकीच्या संगतीत मिसळली.. व्यसनं जडली..

लहानीची परिस्थिती पूर्णपणे बदलली होती, नवरा मोठ्या मेहनतीने मॅनेजर पदापर्यंत पोहोचला होता..मुलं कडक शिस्तीमुळे नम्र बनली होती..उच्च शिक्षण घेऊन खूप पुढे गेली होती..

थोरलीच्या नवऱ्याने फार काही कष्ट घेतले नव्हते, तो तिथेच होता..पुढेही गेला नाही आणि प्रगतीही केली नाही..मौजमस्ती करण्याचा स्वभाव, त्यात वडिलांनी आयतं घर करून दिल्याने जबाबदारी नाही..पण आता हळूहळू झळ बसू लागलेली, मुलं काही कामाची राहिली नाही..कशीबशी त्यांची लग्न करून त्यांना संसाराला लावलं..

एकदा लहानीला भेटायला सहजच थोरली आली,

लहानी म्हणाली,

“ताई कळवायचं तरी की येतेय म्हणून…

काहीतरी गोडधोड केलं असतं..”

“असुदेत गं… साधं काहीतरी कर..”

“हो, माझं एवढं कपाट आवरून झालं की लगेच लागते स्वैपाकाला..”

लहानीने सगळा पसारा काढला होता, थोरली बघत होती..लहानीने काही कपडे घडी करून बाजूला ठेवले, एका पिशवीत भरले..थोरलीने विचारलं,

“हे पिशवीत का भरले?”

“काय सांगू आता, ही मुलं पण ना..खूप जुने कपडे आहेत हे..अगदी मुलं वर्षाचे असतील तेव्हाचे.. सांभाळून सांभाळून वैतागले..आता मीच गपचूप हे बाहेर जाऊन जाळून येते, पसारा तरी कमी होईल..”

थोरलीने पाहिलं, म्हणाली..

“जाळू नकोस, माझ्या नातवाला घेऊन जाते हे कपडे..”

“अगं ताई, पण…हे जुने झालेत, उसवलेही असतील..”

थोरलीच्या कडा पाणावल्या,

“असुदेत, माझ्या नातवाला त्याच्या बापाकडून काही मिळत नाही..

बाप दिवसभर बाहेर असतो, काय करतो त्यालाच माहीत..पेन्शनवर कसंबसं घर चालतंय”

लहान बहिणीला वाईट वाटलं,

थोरलीला मोठी पिशवी भरून अनेक वस्तू त्यात दिल्या… तिला वाईट वाटत होतं.. पण हेही आठवत होतं की लहानपणी याच बहिणीच्या मुलांचे जुने कपडे माझी मुलं वापरत…काळ खूप शक्तिशाली असतो, कोणती गोष्ट कधी तीनशे साठ अंशाने फिरेल काहीच सांगता येत नाही..

जाता जाता बहिणीची कृश देहयष्टी बघून ती मनातल्या मनात म्हणत होती,

“ताई, आता कळलं का, की मी श्रीमंत मुलापेक्षा होतकरु मुलाची स्थळं का म्हणत होते ते?”

4 thoughts on “जुने कपडे-3”

  1. खरच श्रीमंत नवरा शोधण्या पेक्षा होतकरू च नवरा शोधावा

    Reply

Leave a Comment