3 वर्ष होत आली तरी तो तिला विसरायला तयार नव्हता..मित्रांनी खूप समजावलं तरी तिची आठवण मध्येच एखाद्या ज्वालामुखी सारखी भडकून वर यायची आणि त्याच्या मनावर, मेंदूवर ताबा घेत भस्मसात करायची. कारणही तसंच होतं, श्रिया आणि तेजस चा सहवासच इतका दीर्घ होता की एकेमकांशिवाय जगणं केवळ अशक्य होतं. त्यांचं कुठलंही काम एकमेकांशिवाय पूर्ण होत नसे..कॉलेज ची कामं असो, खरेदी असो वा कुठला निर्णय घेणं असो…सावलीसारखे दोघे एकेमकांना साथ देत…लग्न नावाचं बिरुद केवळ लागायचं बाकी होतं.. एक शारीरिक सोडलं तर मनाने ते कधीच पती पत्नी बनले होते आणि वागतही तसेच होते…दोघांना एकमेकांच्या साथीने जीवनाला पूर्णत्व आल्याचा भास होत होता…
दोघांत किरकोळ वाद होत, पण एकदा त्याने उग्र रूप धारण केलं… एकमेकांशी ब्रेकअप करण्याच्या धमक्या, सोडून जाण्याच्या धमक्या…आणि दोघेही आपल्या इगो ला पकडून मागे हटले. एकमेकांशिवाय जगणं तर अशक्य होतं, पण माफी मागायला, स्वतःहून बोलायला त्यांचा इगो आड यायचा…
तेजस वाट बघत होता, कधी ना कधी सगळं सुरळीत होईल…आधीसारखं पून्हा एकदा एकत्र येऊ अश्या आशेवर तो होता…पण श्रिया ने टोकाचा निर्णय घेतला…कायमचं नातं तोडण्याचा…तेजस ने वाट पाहून अखेर स्वतःहून माफी मागितली, तिला फोन कॉल्स, मेसेजेस केले…पण व्यर्थ…काहीही उपयोग नव्हता, आता आपल्यात काहीही उरलेलं नाही यावर ती ठाम होती.
तेजस ला प्रचंड मानसिक त्रास झाला…त्याची तब्येत खालावली, तो वरचेवर आजारी पडू लागला…एकदा दवाखान्यात जात असताना त्याला श्रिया दिसते, एका मुलाच्या बाईक वर मागे बसलेली, त्याला घट्ट पकडून.. तेजस च्या हृदयात एकच कळ उठते…डॉकटर ने high bp चे निदान करत औषधोपचार केले…
तेजस आता पुरता कोसळला होता, त्याला वाटलेलं की श्रिया फक्त आपल्यावरच्या रागाने दूर जातेय, पण कारण वेगळंच होतं… श्रिया ने दुसऱ्या प्रेमाचा आधार घेऊन ती पूढेही गेली..आणि मी? मी तिथेच थांबलोय…मीही आता यातून बाहेर येणार, दुसरा आधार शोधणार…
“पण कोण? आणि खरंच?? शक्य आहे तुला श्रिया ला विसरून जाणं? आयुष्यातला एकेक टप्पा तुम्ही सोबत घालवलेला…एकेक क्षण…जेवताना, उठताना, बसताना… प्रत्येक गोष्टीत श्रिया च्या आठवणी होत्या…ती दोघे जिथे जिथे भेटलेली, त्या जागा आता भकास वाटू लागलेल्या, निर्जीव मनाने तेजस फक्त वावरत होता..एका क्षणाला वाटायचं, तिचं प्रेम खोटं होतं, मग का तिचा विचार करून त्रास करून घ्यायचा? आणि दुसरीकडे असं वाटायचं, की ती असं कसं वागू शकते? तिला आठवण येत नसेल का माझी? असं कसं विसरू शकते ती मला? काय काय केलं मी तिच्यासाठी…
टिंग टॉंग…
दारावरची बेल वाजते…
“श्रिया तर आली नसेल? श्रिया…”
कानात प्राण आणून तो कुणीतरी दार उघडायची वाट पाहू लागला, तो अंथरुणालाच खिळलेला होता..
“येऊ का मावशी…”
एका दुसऱ्याच मुलीचा आवाज आलेला…
तेजस पुन्हा दुःखी होतो, किती ती भोळी आशा….
“अगबाई…किती मोठी झालीस….ये ये..तेजस ला भेट..आजारी आहे तो…बोल त्याच्याशी, मी चहा आणते..”
कोणाला पाठवतेय आई? तेजस ला सर्व ऐकू आलेलं…
तेजस ला अजिबात कोणाशी बोलायची ईच्छा नसते…इतक्यात कानाजवळ काहीतरी वळवळ झाली आणि त्याने कानाजवळ फटकारा मारला,
कांचन ओढणीच्या टोकाने त्याचा कानाजवळ वळवळ करत होती…
“कांचे तू??”
“Thank god… ओळखलस मला…”
“कसा विसरेन? शेमड्या, मोटू कांच्याला…”
कांचन उशी घेऊन त्याला मारू लागते…
“भांडू नका रे लगेच….”
आतून आई चा आवाज येतो…
तेजस खुप दिवसांनी आज हसला होता.त्याची बालपणीची मैत्रीण आज भेटायला आलेली..
कांचन चं वरचेवर येणं सुरू राहिलं… तेजस कांचन सोबत जरा बरा वागतो, आनंदी राहतो हे पाहून आई तिला नेहमी घरी बोलावू लागली…
कांचन ने तेजस चं आयुष्य बदलून टाकलं. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला..एक दिवस तेजस ने तिला श्रिया बद्दल सगळं सांगितलं, मनातलं सगळं बाहेर काढलं आणि त्याला हलकं वाटलं.
“हात्तीच्या…एवढंच ना…”
“एवढंच?”
“नाहीतर काय…काय क्षुल्लक गोष्टीचा त्रास करून घेतोय तू…एक काम कर, उद्या माझ्यासोबत चल…”
दुसऱ्या दिवशी कांचन तेजस ला एका अनाथाश्रमात नेते, तिथल्या अनाथ मुलांची स्थिती पाहून तो दुःखी होतो…
त्याला त्या मुलांच्या दुःखाकडे बघून स्वतःचीच लाज वाटते, इतक्या वाईट परिस्थितीतही ही मुलं आनंदी राहू शकतात, आणि आपण मात्र फालतू कारणासाठी दुःखं कवटाळून बसलेलो..
“तेजस, तुला आई वडील आहेत..छान प्रेम करणारं कुटुंब आहे…आयुष्यात एवढं पुरेसं आहे रे…”
तेजस बरा होतो…आनंदी राहू लागतो…त्याचं दुःख विसरतो…
एक दिवस अचानक श्रिया त्याला भेटायला येते…कांचन घरीच आलेली असते..
श्रिया माफी मागत असते, आणि पुन्हा नवीन सुरवात करू म्हणून गळ घालते…
“आता ते शक्य नाही…तू इथून…”
“असं कसं म्हणतोस तू? आपण किती दीर्घकाळ एकत्र होतो, आणि माफीही मागतेय मी तुझी…”
“आपला किती सहवास होता यापेक्षा त्या काळात आपण एकमेकाला किती सोबत केली…आपलं प्रेम किती उत्कट होतं याला महत्व होतं… पण तू.. मला एका क्षणात दूर केलंस, आपला सगळा सहवास विसरली..दुसऱ्या कुणासोबत सूत जुळवळस…सॉरी पण हे प्रेम मला मान्य नाही…खरं प्रेम म्हणजे जे आपल्याला जगणं शिकवतं… दुखातही आपल्याला हसायला लावतं… दुःखाच्या वेळी एकटं सोडून जातं ते प्रेम नसतं…”
श्रिया निघून जाते…
तेजस कांचन चा फोटो हळूच बाहेर काढतो आणि छातीशी धरून बसतो…
बाहेरून कांचन आणि त्याची आई बघत असते, कांचन लाजून आईच्या मिठीत शिरते..
“मिळालं तुला तुझं प्रेम? अगं वेडे लहानपणापासून तू त्याच्यावर प्रेम करत आलीये, मी आई आहे, मला नाही का कळणार? श्रिया चं समजल्यावर तूच त्याच्यापासून दूर झालेली ना? अधूनमधून त्याची खुशाली विचारत होती ना? खरं सांगू, मलाही श्रिया फारशी पटली नव्हती, पण मुलं मोठी झाल्यावर त्यांना काय समजावणार… जाऊदेत, आता एक छान सुरवात करा…”
आईला तिचा मुलगा परत मिळाला, कांचन ला तिचं पाहिलं प्रेम आणि तेजस ला..त्याचं खरं प्रेम…