जबाबदारी

 सुनीता तावातावाने माहेरी निघून गेली होती. कारण क्षुल्लक होतं.. स्वातंत्र्यात वाढलेल्या सुनीताला लग्नानंतर तिच्या मैत्रिणींना भेटायला जाण्यासाठी नवऱ्याची आणि सासूची परवानगी घ्यावी लागायची. दरवेळी परवानगी देताना आम्ही परवानगी देऊन तुझ्यावर उपकार करतोय अशीच भावना असायची. एकदा कारण नसताना आपला हक्क गाजवण्यासाठी सासूबाईंनी नकार दिला आणि सुनीताचं डोकंच फिरलं.. मग तिने नवऱ्याशी- युवराजशी वाद घातला..

“परवानगी घेतली तर तुला अंगाला भोकं पडतात का? लग्न झालंय तुझं..”

“अरे पण का म्हणून? मी काय लहान आहे का? बरं तुम्ही म्हणतात म्हणून मी तेही करत गेले.. आज किमयाच्या लग्नासाठी ती मला शॉपिंग ला नेणार होती सोबत.. याला परवानगी न द्यायला काय कारण? घरातली सगळी कामं झालेली, कुणी पाहुणेही येणार नव्हते…उगीच मला बांधून ठेवायचं म्हणून नकार??”

वाद वाढला..

मग काय, उचला बॅग अन निघा माहेरी..

“आजकालच्या मुलींना जबाबदारी कळतच नाही.आमच्या वेळी स्वयंपाकघरातून बाहेर निघायलाही आम्ही परवानगी घ्यायचो..आता मुलींना फक्त भटकायला पाहिजे.. आपलं घर आहे, घरात माणसं आहेत याच्याशी काही घेणं नाही..”

आईचं बोलणं ऐकून युवराज अजून चिडला..आईने तर युवराजच्या संतापाच्या आगीत तेलच ओतलं होतं..आता काहीही झालं तरी सुनीताला फोन मेसेज करायचा नाही, तिची अक्कल ठिकाणावर आली की बरोबर करेल फोन असं ठरवून युवराज तावातावाने आत गेला.

घर भकास वाटत होतं, सुनीता शिवाय घराला शोभा नव्हती. पण युवराज आणि त्याची आई कोणत्या तोंडाने चेहऱ्यावर दाखवणार? अश्यातच संध्याकाळी युवराजची मावशी, आईची बहीण कामानिमित्त घरी आली. बहिणीला बघताच आईला आनंद झाला..

“ताई किती दिवसांनी येतेय? कळवलं का नाही?”

“Surprise द्यायचं होतं.. बरं सुनीता दिसत नाहीये..बाहेर गेलीये का?”

युवराज आणि आई एकमेकांकडे पाहू लागले..युवराज म्हणाला..

“माहेरी गेलीये…सहज..”

“अच्छा…बरं मस्त एक कप चहाची सोय करा बरं..”

“आत्ता मिळेल…सुनीता चहा ठेव गं..”

सवयीप्रमाणे आईने हाक दिली आणि नंतर भानावर आली..

“अरेच्या विसरलेच… मी आत्ता आणते..”

युवराजची आई आत जाऊन चहा करून आणते.युवराज त्याच्या खोलीत निघून जातो. दोघी बहिणी चहा घेत निवांत गप्पा मारत बसतात..युवराजच्या आईच्या चेहऱ्यावर असलेले हावभाव बहिणीच्या नजरेतून काही सुटत नाही..

“काही झालंय का? मला मोकळेपणाने सांग..”

“काय सांगू आता..ही सुनीता म्हणजे नुसती कामचुकार मुलगी आहे..एक काम धड करत नाही, आणि वर सतत बाहेर हिंडायला जात असते..”

“सतत म्हणजे?”

“म्हणजे…महिन्यातून..2-4 वेळा..”

“बरं मग?”

“युवराज ला अजिबात आवडत नाही हे तरी तेच करते..लग्न झाल्यावर तरी निदान नवऱ्याचं ऐकायचं ना…हिला कुणाचंच ऐकायचं नसतं.. एवढ्यातच भांडण करून माहेरी निघून गेली..आपल्या वेळी होतं का असं सांग बरं? काही जबाबदारीच नाही आजकालच्या मुलींमध्ये..सून म्हणून तिने तिची कर्तव्य केलेली मला आठवतही नाहीत..”

“खरं बोलतेय? मग सुनीता नाही म्हणून तुझ्या मनात चलबिचल का सुरू आहे? चहा टाकायला सवयीप्रमाणे तिला हाक कशी गेली?”

“ते असच गं..”

“चुकतेय तू…आत्तापर्यंत सुनेची जबाबदारी… सुनेची जबाबदारी म्हणून शंख वाजवत होतीस… पण लग्न झालं म्हणजे जबाबदारी फक्त सुनेवरच येते का?”

“म्हणजे?”

“लग्न झालं म्हणजे नव्या नात्यांची सुरवात होते..एका सुनेचं, एका नवऱ्याचं..आणि एका सासूचं…पण नातं जपायचं ते केवळ सुनेने..तुम्ही काय करणार?”

“अगं अर्थात तिने नाती जपायला हवी ना? नात्यांना मान द्यायला हवा ना?”

“आणि तुम्ही काय केलंत?”

“म्हणजे?”

“एक सासू म्हणून तुझीही एक जबाबदारी आहे, माहितीये का?”

“कुठली?”

“आपल्या मुलाचा संसार सुखाचा व्हावा, दोघांनी गोडीगुलाबीने रहावं, आपापसातले वाद मिटवावे यासाठी कधी प्रयत्न केलेत तू?”

युवराजच्या आईला काही सुचेना ..

“हे बघ..लग्न झाल्यावर नात्यांसाठी सर्वांकडून प्रयत्न व्हायला हवे…सुनीता घर सोडून जात होती तेव्हा तुझं काम होतं तिची समजूत घालायचं, ऐकलं असतं तिने…युवराजला त्याच्या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी सांगायचं काम तुझं होतं..पण तू काय केलं? उलट युवराजसमोर तिच्याबद्दल उलटसुलट बोलून दोघांचं नातं अजूनच तोडलं..आणि सर्वात महत्वाचं, नवरा बायकोच्या निर्णयातून सपशेल निवृत्ती घ्यावी…त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्यायचे..तू प्रत्येक वेळी त्यांचा संसार कंट्रोल करायला गेलीस तर कसं चालेल? तुला आठवतं? तुझ्या सासूने तुला टोमणे मारायला सुरुवात केलेली तेव्हा सहा महिन्यांत नवऱ्याला घेऊन तू बाहेर पडलेलीस…नशीब समज निदान सुनीता तरी तसला काही विचार करत नाही..लग्न झालं तरी मुलाला आपल्या आईचंच खरं वाटत असतं, मग अश्या वेळी त्याच्या मनात त्याच्या बायकोबद्दल सकारात्मक प्रतिमा उभी करून दोघांमध्ये समेट घडवायचा की तिच्याबद्दल वाईट बोलून मुलाच्या मनात तिची प्रतिमा डागाळुन हसता खेळता संसार मोडीत काढायचा…ही जबाबदारी सर्वस्वी सासूची…”

युवराजची आई अंतर्मुख झाली..खरंच जबाबदारी फक्त सुनेची असते का? सासू म्हणून मुलगा अन सुनेचं नातं टिकून राहावं यासाठी मी किती प्रयत्न केले? 

दुसऱ्या दिवशी सुनीता हसतमुखाने दारात हजर ..युवराजला आनंद तर झालाच, पण धक्काही बसला..

“सॉरी युवराज…तुला मी नको नको ते बोलले..पण म्हणून मी असं तडकाफडकी घर सोडायला नको होतं.. सासूबाईंनी फोन करून समजावलं म्हणून आले मी…आणि त्यांनी हेही कबूल केलं की माझ्या बाहेर जाण्यावर त्या कुठलंही बंधन टाकणार नाही..”

युवराजची आई आज खऱ्या अर्थाने सासू झाली होती..

3 thoughts on “जबाबदारी”

Leave a Comment