छोटीशी अपेक्षा



आज पुन्हा एकदा सुषमा काकू मार्केट मध्ये दिसल्या..
“काकू, खरेदी जोरात चाललीये…घरात लग्नकार्य वगैरे आहे का?”
माझ्या प्रश्नाला फक्त एक स्मितहास्य देऊन त्यांनी विषय बदलला..
मी जेव्हा कधीही मार्केट मध्ये गेले की तेव्हा तेव्हा त्या हमखास दिसायच्या..मला प्रश्न पडला, या अश्या किती वेळा मार्केट मध्ये येतात?
एके दिवशी त्यांची मैत्रीण, शोभा काकू त्यांचा मुलाच्या मुंजेचं आमंत्रण द्यायला घरी आल्या..बोलता बोलता सहज सुषमा काकूंचा विषय निघाला…
“काहीतरी आजार आहे वाटतं तिला, सतत मार्केट मध्ये जात असते..खरेदी मात्र काही करणार नाही हा…फक्त तिथे जायचं आणि दुकानदारांशी हुज्जत घालायची, बस.”
“असाही आजार असू शकतो?”
काहीतरी वेगळंच ऐकलं मी शोभा काकुंकडून…
पुढच्या खेपेला पुन्हा त्या मार्केट मध्ये दिसल्या, मला राहवलं नाही, मी हळूच त्यांचा पाठलाग केला..
“चांगल्या वस्तू दाखवा की जरा…तुम्हाला जमत नाही ग्राहकाला कश्या वस्तू दाखवायच्या ते…
तुम्हाला काही समजत नाही यातलं, गेली कित्येक वर्षे असली भांडी वापरतेय मी, आणि तुम्ही म्हणताय की तकलादू आहेत…
झालं की नाही? किती वेळ लावताय?”
सुषमा काकू विनाकारण दुकानदारांशी हुज्जत घालत होत्या…शांत, मनमिळाऊ स्वभावाच्या अश्या या काकू असलं काही बोलू शकतील हे ध्यानीमनीही नव्हतं…
त्यांचा मागोमाग मी त्यांचा घरी गेले..त्यांचा नकळत…
त्यांनी घराचा गेट उघडला आणि मी लांब उभी होते…त्या आत जाताच दारापाशी गेले…दार वाजवून आत भेटायला जाऊ असं ठरवलं आणि तोच आतून आवाज आला…
“आज काय स्वयंपाक करून गेलेलीस? अजिबात जमत नाही तुला…आणि काल ते पोस्टातून पाकीट आलेलं ते का उघडलं? काही समजतं का तुला त्यातलं? अजिबात जमत नाही तुला घरात कसं वागायचं ते…मला चहा आन…झाला की नाही? किती वेळ लागतो तुला?”
एकामागून एक असं घरातल्या पुरुषांचे आरोप सुरू झालेले..दुकानदारांशी हुज्जत घालणाऱ्या काकू मात्र अतिशय शांत…
मी माझा आत जाण्याचा निर्णय बदलला..कारण मला उत्तर मिळालं होतं…
सुषमा काकू कितीतरी वर्षांपासून आदर, सन्मान आणि प्रेमाच्या भुकेल्या होत्या…आजवर त्यांच्यावर आरोप करण्याव्यतिरिक्त दुसरं काहीही त्यांना दिलं जात नव्हतं.. मग याचाच शोध त्या मार्केट मध्ये घेत…कमीत कमी दुकानदार एक ग्राहक म्हणून सन्मान तर द्यायचा…आपल्या मनातलं वादळ त्या कमीत कमी त्यांच्यावर तरी हलकं करायच्या…
“मॅडम, ताई…”अश्या आदरार्थी संबोधनाने ना जाणे त्यांना काय अप्रूप वाटे…कदाचित याच सन्मानासाठी त्या सतत जात असाव्या…पैशासाठी का असेना, पण निदान समोरचा आदर तरी द्यायचा..

तात्पर्य: स्त्रीच्या मान सन्मानात कधीही कमी पडू नये, तिला तुमचा पैसा नको पण आदराची अपेक्षा असते..तिची घुसमट होऊ देऊ नका…तिच्या मनातील भाव वेळीच ओळखा, आदर मिळवण्यासाठी अशी वाट धरायला लागणं हे दुर्दैवच…

1 thought on “छोटीशी अपेक्षा”

Leave a Comment