घराणं (भाग 9) ©संजना इंगळे

एक संपलं की दुसरं संकट शुभदा समोर दत्त म्हणून उभं राही. पुस्तकाच्या अनुवादाला सुरवात होत नाही तोच त्याचा अर्धा भाग गायब होतो. पण जेवढा भाग झाला आहे तेवढ्या भागात मात्र शुभदाला बऱ्यापैकी दुर्गावती देवीबद्दल समजलं होतं. दुर्गावती देवीचं जीवन, त्यांची आपल्या पुढील पिढीबाबत असलेली तळमळ, त्यांच्या वाट्याला जे भोग आले ते पुढच्या स्त्रियांना येऊ नये म्हणून दिलेल्या सूचना..हे खूपच अद्वितीय होतं. त्या पुस्तकाचा अभ्यास पुढील 2-3 पिढ्यांपर्यंत झाला असावा. त्यामुळेच रत्नपारखी घराण्यात स्त्रियांना उच्च सन्मान मिळत होता अन घरण्याचं नाव सर्वदूर पसरलं होतं. पण केवळ अरुंधतीच्या जाण्याने पुस्तकाला बंदिस्त करण्यात आलेलं. कदाचित पुढील कित्येक पिढ्या ते बंदीस्तच राहिलं असतं पण ऋणानुबंध म्हणा किंवा दैवी अविष्कार, शुभदा सारखी स्त्री त्या घराण्यात जाऊन मिळाली जी या पुस्तकाची उकल करेल.

“दिगंबरपंत.. यावेळीही तुमच्या सुनेचं म्हणजेच मीनल चं चित्र प्रदर्शन पुण्यात भरवणार आहोत, यावेळी दिग्गज लोकं येणारेत, मागच्या वेळी लाखोंच्या घरात चित्रांचा लिलाव झाला, यावेळी त्या त्याहून जास्त होईल..”

“कौतुकच आहे आमच्या सूनबाईंचं आम्हाला, त्याही जोरदार तयारीला लागल्या आहेत..”

आर्ट अकादमीचे कार्यकारी अधिकारी दिगंबरपंतांकडे आले होते, मिनलच्या चित्रांसाठी…

“दिगंबरपंत.. एक विनंती आहे, तुमच्या घराण्याचं नाव सर्वदूर पसरलं आहे, तर प्रदर्शनात तुम्हा पूर्ण कुटुंबाचं एकत्र असलेलं पेंटिंग आम्ही मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावणार आहोत..तर तुमच्या सूनबाईला तेवढं एक पेंटिंग बनवायला लावा..”

“चालेल की…होईल ना मीनल??”

मिनलला ज्याची भीती होती तेच झालं, आजवर संपुर्ण कुटुंबाचं एकत्र चित्र तिला बनवताच आलं नव्हतं.. आणि आज अशी मागणी आलीय म्हटल्यावर…तिने फक्त मान डोलावली..

शुभदाला मीनलची घालमेल समजते,

“मीनल..कुठे अडचण येतेय तुला नक्की??”

“शुभदा अगं समजतच नाहीये बघ, मी आजवर इतकी अवघड चित्र काढलीये, सगळी जमली बघ, पण कुटुंबाचं एकत्रित असं पेंटिंग मला जमलंच नाही बघ.. किती प्रयत्न केले, कुणाचा श्राप आहे काय माहिती..”

शुभदाला ही गोष्ट विचित्र वाटली, कारण मीनल हाडाची चित्रकार होती, चित्र जमणार नाही असं शक्यच नव्हतं.. मग का असं व्हावं?? तिने बोललेला एक शब्द मात्र तिला खटकू लागला..”श्राप”…

“श्राप वगैरे काय गं.. असं थोडीच असतं..”

“तू मानणार नाहीस, पण कुठलीही कला म्हणजे सरस्वतीचा वरदहस्त असते, कर्णाची गोष्ट माहितीये ना? ऐनवेळी तुझं ज्ञान तू विसरशील असा श्राप दिला गेला होता त्याला. एखाद्या लेखकाला अचानक काहीतरी स्फुरतं.. अगदी अचानक, न ठरवता..एखाद्या चित्रकाराच्या मनातून अवचित काही रंग मिसळले जातात.. अगदी अनपेक्षित..एखाद्या गायकाचा मधूनच एखादा सुरेल ताल बसतो..अगदी नवीन… कुठून येतं हे?? हाच तो, दैवी स्पर्श.. त्याला जेव्हा एखादी गोष्ट आपल्याकडून करवून घ्यायची असते तेव्हा तो हळूच कानात फुंकर मारतो..आणि अवचितपणे या गोष्टी आपल्या हातातून घडत जातात..अगदी नकळत..जगातली काही नुसत्या रेघोट्या ओढलेली चित्र कोट्यवधी किमतीत का विकली जातात? ती चित्र समजणारी नजर तशी असते, चित्रकार काही गूढ घटना, काही चमत्कारिक गोष्टी त्यात चितरतो..अन त्या चित्रकाराच्या दैवी प्रतिभेचं मोल जेव्हा केलं जातं तेव्हा ते मानवी आवाक्याच्या बाहेर असतं…”

शुभदा मिनलचा एकेक शब्द मनात साठवत असते, मितभाषी अश्या मीनलचं नवीनच रूप तिला दिसून येतं. खरंच, दिगंबरपंतांनी तोलून मापून एकेक स्रीरत्न घरात आणलंय याचं तिला पुन्हा कौतुक वाटतं. रश्मीची मेहनत, मीनलची कलात्मक वृत्ती, सासू मेघनाचं धैर्य आणि मोठ्या सासूबाई जानकीची दूरदृष्टी.. या सगळ्यांसमोर आपण फिके आहोत असं तिला वाटू लागतं. प्रत्येक घरात स्त्रियांमध्ये एकमेकींबद्दल ईर्षा निर्माण होते, पण या घरात ईर्षा होती ती महत्वाकांक्षेची.. विजिगिशु वृत्तीची..

“शुभदा, सासरी गेलीस अन आम्हाला विसरलीच तू..माहेरी ये की काही दिवस…तेवढंच तुला आराम..”

“अगं हे घर म्हणजे स्वर्ग आहे, माहेर अन सासर..दोन्ही गोष्टी वेगळ्या असतात हे ध्यानीमनीही नाही माझ्या..”

“अगबाई, फारच मुरलेल्या दिसताय संसारात…चांगलं आहे, तरीही ये..आमच्यासाठी??”

शुभदा विचार करते, पुस्तकाच्या शोधात शुभदाची खूप मानसिक स्थित्यंतरं झालेली..पराकोटीचा आनंद अन पराकोटीची निराशा हे दोन्ही तिने अनुभवलं होतं.. पुस्तकाचा शोध चालूच ठेवायचा, पण त्या आधी मनाला ताजतवानं करून पुन्हा नव्या उमेदीने शोध सुरू करावा असं तिला वाटू लागतं आणि ती तयार होते..

ऋग्वेद, दिगंबरपंत आणि बाकी सर्वांना निरोप देऊन शुभदा माहेरी पोचते..इतकी वर्षे माहेरी राहूनही तिला घर आता परकं वाटत होतं. हेच तर वरदान आहे स्त्रियांना, जिथे जातील तिथे एकरूप होऊन जातील.
आईशी गप्पा झाल्या, सासरचं कौतुक करून झालं, आईला लेकीचं सुख किती ऐकू अन किती नको असं झालेलं. नंतर आईला अचानक काहीतरी आठवलं,
“अगं रुद्रशंकर गुरुजींनी तुला जी पेटी दिली होती ती उघडून पाहिलिस??”
“अरे देवा…बघ मीपण, घाईगडबडीत मी अगदी विसरून गेलेले..”
“मला वाटलं एव्हाना उघडून पाहिलं असशील..काय असेल पण त्यात??”
“मलाही माहीत नाही, अगं त्याला कुलूप आहे छोटसं, आणि त्याची चावीही नाही कुणाकडे..मग काय, फोडावंच लागेल ते..”
“बरं आता सासरी गेलीस की तोड ते..”
शुभदाला अचानक आठवण येते, पुस्तकाचा दुसरा भाग तर नसेल ना त्यात?? शुभदा घरातल्या नोकर गडीला सासरी पाठवून ती पेटी माहेरी मागवून घेते. पेटी आणताच लगेच तिची आई आणि ती ते कुलुप तोडतात..आत एक जाडजूड अशी दुर्गा मातेची फ्रेम असते. फोटो अन त्याला केलेली फ्रेम बरीच जुनी असल्याची दिसून येत होती.
“अगं आपल्या कुलदेवतेचा फोटो आहे हा…बहुदा आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जपून ठेवलाय…”
“पण मग तो आपल्याजवळ न राहता रुद्रशंकर गुरुजींकडे कसा??”
“एक मिनिट शुभदा, मला त्या गुरुजींची वाक्य आठवताय..नारायनकर आणि रत्नपारखी घराणं जेव्हा एक होईल तेव्हा घराण्यात एक दिव्य कार्य घडेल असं त्यांनी सांगितलं होतं .. कदाचित नियती या दोन्ही घराण्यांची एक व्हायची वाट बघत होती, आणि गुरुजींना त्यांच्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे योग्य वेळेस हे आपल्याकडे सुपूर्द करायचं असं सांगितलं होतं..”
“जय दुर्गामाते…जय अंबाबाई..”
95 वर्षाची म्हातारी एकदम घरात येते..
“निर्मल आजी… एकटी कशी आलीस?? मुलगा कुठेय??”
“आता शेवटच्या घटका मोजतेय बाई, मुलाला तरी किती दिवस ओझं बनणार…अन तुझ्या हातात जे आहे ना, सांभाळून ठेव बरं.. नुसती दुर्गा नाही ही, आपल्या यशाचा मार्ग आहे त्यामागे…”
“धडधाकट आहात आजी तुम्ही…आपल्याला शतक पूर्ण करायचं आहे लक्षात आहे ना??”
निर्मल आजी म्हणजे शुभदाची नात्यातलीच एक आजी..आजीकडे प्रचंड अनुभव होता.. जीवनाचा, माणसांचा, दुनियेचा… आजीला गोष्टी सांगायला फार आवडत..मग आजी आपल्या नातवांना वेगवेगळ्या गोष्टी सांगत असे. नातवांना ही आजी गोष्टींमुळे खूप आवडायची. निर्मल आजी इतकं वय असूनही एकदम टवटवीत वाटायची. चालण्यात, बोलण्यात एक रुबाब होता. काठीही अशी टेकायची जणू समोर आलेल्याला आव्हानच देतेय की काय..शुभदाकडे आजीचं येणं जाणं असायचं नेहमी.
“नाही गं बाई, देव आपल्या कडून ठरवून दिलेल्या गोष्टी करवून घेतो, अन त्या गोष्टी पूर्ण झाल्या की बरोबर आपल्याला घ्यायला येतो बघ..”
“आजी तुम्ही तर इतकं सगळं केलंय सगळ्यांचं.. “
“राहिलं असेल एखादं काम माझ्याकडून, ते झालं की दुसऱ्या मिनिटाला घ्यायला येईल बघ तो..”
“आजी तुपन ना..बरं ये बस, आज कोणती गोष्ट सांगणार??”
“आज ना…तुला एक गोष्ट सांगणार आहे..”
“सांगा की..”
“खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, दोन जिवलग मैत्रिणी अगदी शेजारी शेजारी राहत असत. सोबतच लग्न झाली अन सोबतच मुलं झाली. पहिलीचा मुलगा पांडुरंग अन दुसरीची मुलगी कांता, दोघांनी भातुकलीच्या खेळात स्वतःचच लग्न लावून दिलेलं. बाहुल्यांच्या खेळात दोघेही कधी मोठे झाले कळलंच नाही. लहानपणापासून एकत्र वाढलेल्या दोघांत मैत्री, अन नंतर प्रेम जडलं. पण दोघेही वेगळ्या जातीचे, घरी सांगायची सोय नव्हती, लग्न केलं तर समाज जिणं मुश्किल करून टाकेल इतकं भय होतं. मग पांडुरंग च्या आईने दोघांचं गपचूप लग्न लावून दिलं, दोघेही राजस्थानला गेले अन सुखाने संसार करू लागले..कांताला मुलं झाली, सुना आल्या, नातवंड झाली. धाकल्या सुनेला तिने शिकायला पुण्यात पाठवलं, तेही लग्नानंतर…ती खूप शिकली, पण तिची सासू आजारी पडली अन सर्व सोडून तिला परत यावं लागलं..”
एवढं बोलून आजीला ठसका आला..
“अशी काय गोष्ट आहे??”
“आई आधी पाणी आन बघू आजीला..आजी? काय होतंय गं?? इथे झोप बघू, बरं वाटेल..”
आजी शुभदाच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपी जाते..
“आजी, पाणी घे बरं… तू पडून रहा, थोडी वर हो, माझ्या हाताने पाणी देते तुला… आजी.आजी?? आजी????? आई, आजीला काय झालं? उठत का नाहीये??”
आईने आजीचा श्वास पाहिला, तो केव्हाच बंद झाला होता. आईने तोंडाला पदर लावला. आजीने शुभदाच्या मांडीवर आपला श्वास सोडला होता..
नातेवाईकांना बोलवण्यात आलं, आजीला तिच्या मुलांकडे सोपवण्यात आलं. सर्व सोपस्कार पार पडले.
“राहिलं असेल एखादं काम माझ्याकडून, ते झालं की दुसऱ्या मिनिटाला घ्यायला येईल बघ तो..”
आजीचे हे शब्द शुभदाच्या कानात घुमू लागले,
“खरंच, एवढं सांगण्यासाठी आजी अजून तग धरून होती?? आणि ती गोष्ट काल्पनिक नव्हती, पिढ्यानपिढ्या दुर्गावती असताना घडलेल्या घटना गोष्टीरुपाने समोर आल्या..आजीला जी गोष्ट वाटत होती ती गोष्ट नव्हती, ती एक सत्यघटना होती…”
शुभदाला लक्षात येतं, की दुर्गावतीची शेजारी राहणारी मैत्रीण दुसरी तिसरी कुणी नसून नारायनकर कुटुंबाचे पूर्वज असतील. दुर्गावती ने दोघांच्या लग्नाला पाठिंबा दिला अन दोघांना राजस्थान ला पाठवून दिलं असावं. म्हणूनच पुस्तकात आंतरजातीय विवाहाला मान्यता का हवी अन मुलीचं शिक्षण व्हायलाच हवं अशी ताकीद दिली गेलेली. राजस्थान वरून इथे शिकायला आलेली ती पांडुरंग ची सून असावी, पांडुरंग ची सून आली असता दुर्गावती ने शेवटच्या घटका मोजल्या असतील अन पुस्तक सुनेकडे सोपवलं असेल. त्या सुनेने पुस्तकाचा छडा लावण्यासाठी शिक्षणाचा हट्ट केला असेल…अन कांता आजारी पडली म्हणून…पुस्तकाचं काम अर्धवट सोडून ती परत गेली असेल..”
झालेल्या घटना अन पुस्तकातील संदर्भानुसार असंच घडलं असावं. शुभदाने पुस्तक अर्धवट आहे समजताच शेवटची काही पानं वाचणं सोडून दिलेलं. सासरी परतल्यावर तिने ते पुन्हा मिळवलं आणि शेवटची पानं वाचायला घेतली..
“पांडुरंग मोठा झाला, सगळे व्यवहार उत्तम रीतीने पार पाडू लागला. आज तर त्याने एक मोठ्या इंग्रज साहेबाला घरी आणलं. चित्रकार होता तो, तो म्हणे आमच्या कुटुंबाचं हुबेहूब चित्र काढणार होता. आम्ही सर्वांनी तयारी केली, मी देवपूजा करत होते. शिवलिंगावर 101 तांदुळाचे दाणे अभिषेक केल्याशिवाय माझी पूजा होत नव्हती. नेमका पूजेच्या वेळी तो आला, मला उठायला लावलं. पण पूजा अर्धवट कशी सोडणार? मग मी शिवलिंग सोबत घेऊन एका वाटीत तांदूळ घेऊन बसले. कारण तसबीर साठी तासभर बसायचं होतं. मला असं करताना बघत तो चित्रकार हसू लागला. मला ते काम बंद करायला लावलं. असा राग आला त्याचा मला, हे गोरं गिधाड, याला काय कळणार हिंदूंची श्रद्धा..मनातल्या मनात त्याला श्राप दिला. रत्नपारखी कुटुंबाचं एकत्र चित्र तुलाच काय, यापुढे कुणालाही जमणार नाही.. शिवलिंगाची पूजा मात्र मी सोडली नाही..ते करता करता त्याला चित्र काढायला लावलं..”
शुभदा एकदम चमकली, धावतच ती मिनलकडे गेली..
“मीनल, चल आपल्या सर्वांचं एकत्र असं चित्र काढायला घे…मी सर्वांना बोलावते..”
“अगं शुभदा, ऐक…”
शुभदा काहीएक ऐकत नाही, सर्वांना बोलावून आणते, सर्वजण समोर तयारी करून बसतात अन मिनलला सुरवात करायला लावते. मीनलला समजत नाही ही अशी काय करतेय, पण सगळे जमलेच आहे म्हटल्यावर ती कॅनव्हास अन रंग घेऊन सुरवात करते.
“थांब..”
असं म्हणत शुभदा देव्हाऱ्यात जाऊन शिवलिंग अन तांदुळाची वाटी घेऊन येते , अभिषेक सुरू करते..
“मिनल, काहीही प्रश्न न विचारता चित्र सुरू कर..”
सर्वजण बुचकळ्यात पडतात..मीनल चित्र काढू लागते अन काय आश्चर्य…!!! हुबेहूब अन इतकं सुंदर चित्र बनतं… मिनलचा स्वतःवरच विश्वास बसेना..!!!
क्रमशः

भाग 10
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-10-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 11
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-11-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 12
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-12-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 13
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-13-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 14
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-14-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 15 अंतिम
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-15-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82/

3 thoughts on “घराणं (भाग 9) ©संजना इंगळे”

Leave a Comment