घराणं (भाग 7) ©संजना इंगळे

शुभदा खूप नाराज होते, पुस्तकावर चहा सांडल्याने त्याची बरीचशी पानं खराब होऊन वाचता न येण्यासारखी झालेली होती.

घरात शुभदा जशी पुस्तकाच्या शोधासाठी भारावून गेलेली तसंच रश्मी तिच्या स्पर्धेसाठी तयारी करत होती, मीनल तिच्या नव्या प्रदर्शनासाठी चित्र बनवत होती, मेघना वाढलेल्या व्यापाचे व्यवस्थापन करत होती. ऋग्वेदची बहीण वीणा, जी शिक्षणाकरिता बाहेरगावी होती ती सुट्ट्या असल्याने काही दिवस घरी आली होती.

शुभदाने तर त्या पुस्तकाचा शोध जवळ जवळ सोडूनच दिला होता, इतक्या उत्साहाने तिने हे काम सुरू केलेलं आणि सुरवातीलाच नकारात्मक संकेत मिळाला. वीणा एक हुशार मुलगी होती, आर्टिटेक्ट चं शिक्षण घेण्यासाठी ती बाहेरगावी शिकत होती. नवीन वाहिणीसोबत किती गप्पा मारू अन किती नको असं तिला झालेलं. वीणा खूप बोलकी होती, दोघींमध्ये राजकारण, टेक्नॉलॉजी वर बऱ्याच चर्चा झाल्या. शुभदाही काही क्षणभर तिचं दुःख विसरून वीणाच्या गप्पात गुंतली होती.

गप्पा झाल्यावर सर्वजण जेऊन आपापल्या खोलीत गेले. शुभदाने टेबलवर ते पुस्तक पाहिलं, आता हे इथे ठेऊन उपयोग नाही, देवघरात पुन्हा त्याच्या जागेवर ठेवावं असा विचार तिच्या मनात आला. तिने ते पुस्तक उचललं आणि आजूबाजूला कुणीही नाही हे बघतच देवघरात गेली. लाल कपड्यातील ते जुनं पुस्तक काढून तिने हातातलं पुस्तक पुन्हा त्यात गुंडाळून ठेवलं, खिन्न मनाने ती परतत असताना रेखाने तिला पाहिलं, शुभदा घाबरली..

“शुभदा…हे काय करत होतीस??”

“मी?? काही नाही..”

“मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय, लाल कपड्यातील ती वस्तू तू काढत होतीस..”

“नाही ओ… मी…ते..आपलं..”

आवाज ऐकून घरातले सर्वजण धावत येतात,

“काय झालं? कसला आवाज आहे??”

दिगंबरपंत विचारतात..

“ही तुमची सून शुभदा…देव्हाऱ्यात असलेल्या त्या वस्तूला हात लावायचा नाही असं बजावून सांगितलं असताना तिने ते उघडून पहायची हिम्मत केली..”

“रेखा…ही बोलण्याची पध्दत नाही, आपल्या घराण्यात सुनेला ही अशी वाक्य ऐकवणं म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचा अपमान…पुन्हा असं करू नकोस..आणि शुभदा, काय आहे ते खरं सांग..”

“आजोबा…अहो वहिनीला काय बोलताय, मीच तिला सांगितलेलं, की देवघरात काडीपेटी आहे ती घेऊन ये..”

“काडीपेटी कशाला हवीय तुला वीणा??”

“आजोबा, अहो किती थंडी आहे बाहेर…वहिनीला म्हटलं आपण शेकोटी पेटवू, माचीस सापडेना..म्हणून वहिनीला म्हटलं..”

“वहिनीला कामं सांगतेस? तुझं तूच घ्यायचं की..”

“मी ते सरपण आणत होती ना..म्हणून..”

विणा अत्यंत निरागसपणे सगळं सांगत होती, तिचं ते बाळबोध बोलणं बघून सर्वांना हसू आलं..

“रेखा. ऐकलस?? आता तरी खात्री पटली ना?? चला, आपापल्या कामाला लागा आता..”

रेखाला स्पष्ट दिसलेलं असतं की शुभदा त्या लाल कपड्यातील वस्तू बाहेर काढतेय, पण आता जास्त वाद घालण्यात अर्थ नाही म्हणून तीही शांत बसते. या घटनेने मात्र रेखाच्या मनात शुभदा बद्दल राग निर्माण होतो.

शुभदा मात्र विचारात पडते, वीणा का खोटं बोलली? का वाचवलं असेल तिने मला??

“वहिनी..आत येऊ??”

वीणा शुभदाच्या खोलीबाहेर येऊन विचारते..

“विचारते काय, ये..”

“चला, शेकोटी करायला..”

“वीणा.. तू मला का वाचवलं हेच समजत नाहीये..तुला माहीत होतं ना की मी त्या लाल कपड्यातली वस्तूच काढत होते म्हणून…”

“वहिनी.. आपण गप्पा मारत होतो तेव्हा तुझ्या टेबलवर मला ते पुस्तक दिसलं आणि तेव्हाच मला लक्षात आलं..की तू त्याचा अर्थ शोधतेय म्हणून..”

“म्हणजे, तुलाही माहितीये??”

“हो…अरुंधती आजी शेवटच्या दिवसात हेच पुस्तक धरून बसलेली…पण त्या दिवसात असं काही झालं की सर्वांनी या पुस्तकालाच दोषी धरलं…मीच होते तेव्हा आजीजवळ..”

“वीणा… ही गोष्ट फक्त तुला, मला आणि ऋग्वेद ला माहितीये… माझ्या हातून एक मोठी चूक झालीये..त्या पुस्तकाच्या पानांवर माझ्याकडून चहा सांडला गेलाय…”

“वहिनी…तुला म्हणून सांगते, अरुंधती आजी सांगायची…या पुस्तकाचा अर्थ घराण्यात येणारी एखादी मुलगीच शोधून काढेल असं शेवटच्या दिवसात बरळायची…मी गंभीरपणे त्याला ऐकलं नाही पण आज हे सगळं पाहून माझा विश्वास बसला…जाणारा माणूस कधीच खोटं बोलत नसतो..”

“पण आता पानच नाहीत तर..”

“वहिनी…आम्ही कॉलेजमध्ये वेगवेगळ्या साईट्सला भेट देतो..अश्याच एका ऐतिहासिक वस्तूला भेट दिल्यावर तिथे एका ठिकाणी आम्ही थांबलेलो..तिथे एक भाट होते…त्यांनी त्या वास्तूचा इतिहास सांगितला..आणि राजस्थान सारख्या राज्यात सुद्धा आपलं रत्नपारखी कुटुंब अस्तित्वात होतं हे मला समजलं..”

“काय?? आपले पूर्वज राजस्थान मध्ये??”

“होय…त्यांनी पूर्ण इतिहास सांगितला…त्यातलं थोडक्यात तुला सांगते..त्याकाळात स्त्री शिक्षणाचे वारे वाहू लागलेले.. राजस्थान मध्ये असलेल्या त्या ठिकाणी आपलं घराणं असंच प्रसिध्द होतं…पण घराण्याचे नियम मात्र त्या काळात समाजाला रुचले नाही, लोकं नावं ठेऊ लागली..घराण्यात एका सुनेला त्या काळात चक्क शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवलेलं म्हणे, तेव्हापासून तर घराण्याला एकदम वाळीत टाकलं होतं, मग सर्वजण राजस्थान सोडून इथे आले…”

“बापरे… किती धीरोदात्त होते आपले पूर्वज…हे ऐकून अंगावर काटाच आला बघ, अगं आजच्या काळात जिथे मुलींनाही बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवत नाही, तेव्हा तर किती भयानक परिस्थिती असेल..आणि त्यातही रत्नपारखी घराण्याने सुनेला बाहेरगावी पाठवलं म्हणजे…खरंच, मानलं पाहिजे…”

“वहिनी, आपले पूर्वज खुप उच्च विचारांचे होते, पण ते सगळं या पुस्तकाभोवती फिरत होतं.. मला वाटतं की काही पिढया अगोदर या पुस्तकाचं वाचन आणि अंमल होत असावा…आपल्याच पिढीत ते मागे पडलं असावं…आणि म्हणून अरुंधती आजी मला सारखं हे पुस्तक वाच म्हणून सांगत होती..”

“मग तू ते पाहिलंस??”

“हो..पण वेगळीच भाषा होती त्यात…काहीच समजेना..मग आजीचं असं झालं, आणि मी बाहेरगावी गेली…”

“मोडी लिपी आहे त्यात..मी ती भाषा गेल्या काही दिवसात शिकलीये..पुस्तकाचा पहिला पॅरा सुद्धा मी मराठीत अनुवादित केला पण…”

“वहिनी, होईल सगळं नीट..काहीतरी मार्ग सापडेल..उगाच नाही इथवर सर्व जुळून आलं..”

“तसंच असावं…आणि थँक्स, मला वाचवल्याबद्दल..”

वीणा मिश्किल हसत निघून गेली. शुभदाला माने सरांचा फोन आला..

“शुभदा, कुठवर आलंय भाषांतर??”

“सर..ते…” शुभदाला काय बोलावं समजत नव्हतं..

“बरं एक काम कर, कॉलेजमध्ये भेट…समोरासमोर बोलू..”

शुभदा नाराजीनेच कॉलेजमध्ये जाते, सरांना आता परत सांगावं लागणार की विषय बदलला आहे..मोडी लिपीत आता काही रस नाही म्हणून..आपलं असं सतत निर्णय बदलणं सरांना आवडणार नाही हेही ती ओळखून होती पण नाईलाज होता.

शुभदा स्टाफ रूम मध्ये जाते.. माने सर वर्गात गेलेले असतात, त्यांचा तास संपायला 10 मिनिटे बाकी असतात. ती बाजूला असलेल्या खुर्चीवर बसून वाट बघते..सरांच्या टेबलवर सरांनी मागे एकदा दाखवलेले ते रिसर्च पेपर ठेवलेले असतात. ती ते चाळत बसते. इतक्यात माने सर येतात…ती पेपर खाली ठेऊन देते..

“मग..मोडी लिपीचा चांगला अभ्यास झालेला दिसतोय..”

“नाही…सर..ते…”

“काय झालं?? अवघड वाटतयं? अगं पण तुला सोपी कामं आवडतच नाही ना..हा हा..”

सर बोलत असताना तिचं लक्ष परत त्या टेबलवर असलेल्या पेपर कडे जातं, जुनं मोडी लिपीत असलेले पेपर तिला दिसतात अन त्यातली अक्षरं तिला ओळखीची वाटतात..ती ते हातात घेते, सुरवातीचे अक्षरं वाचते अन ताडकन उभी राहते..

“काय गं काय झालं?? आणि विषय बदलतेय ना??”

“शक्यच नाही सर.. आता तर अजिबात नाही..”

शुभदा आनंदाने घरात येते अन आल्या आल्या वीणाला मिठी मारते..

“वहिनी, अगं काय झालं??”

“अगं हे बघ…काय आहे..”

“भाषा समजत नाहीये..आणि किती जीर्ण झालेले पेपर आहेत..”

“अगं त्याच्या खाली त्याचं भाषांतर आहे..हे आपल्या देव्हाऱ्यात असलेल्या पुस्तकाचंच भाषांतर आहे..”

“पुर्ण??”

“नाही…सुरवातीचं..”

“किती पानं??”

“20..”

“आणि चहा किती पानांवर सांडला??”

“20..” शुभदा बोलता बोलता एकदम सुन्न होतें… काय दैवी चमत्कार आहे हा…माझं काम वाचावं म्हणून त्यावर काय सांडावा.. कॉलेजमध्ये सरांनी मला काय बोलवावं अन ते पेपर तिथेच काय दिसावे..देवा.. तू खरंच कमाल आहेस..”

“वहिनी…तुला भाषांतर मिळालं म्हणून तू खुश आहेस, पण आपलं गूढ पुस्तक कुणाच्या हाती लागलं असेल??”

“मलाही हीच शंका होती, पण माने सर एकदा म्हणाले होते, हे कॉलेज 1800 च्या शतकातील.. आपल्या मागच्या अनेक पिढ्या इथे शिकून गेल्या..”

“म्हणजे, त्या दिव्य स्त्रीने हे पुस्तक लिहिल्यानंतर कुना एक पिढीतील एका सुनेकडून पुस्तकाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न झाला होता?? कोण असावी ती??

“राजस्थान मधून ज्या सुनेला शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवलं… ती तर नसेल??”

क्रमशः

भाग 7
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-7-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 8
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-8-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 9
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-9-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 10
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-10-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 11
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-11-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 12
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-12-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 13
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-13-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 14
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-14-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 15 अंतिम
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-15-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82/

1 thought on “घराणं (भाग 7) ©संजना इंगळे”

Leave a Comment