घराणं (भाग 6) ©संजना इंगळे

शुभदाला रात्रभर झोप लागत नाही, ती पुन्हा त्या पुस्तकाकडे खेचली जाते. रात्रीच्या 2 वाजता ती देवघरात येते. अंधारातही त्या लाल कपड्यातील वस्तू तिला स्पष्ट दिसत होती. ती त्या वस्तूला हात लावणार तोच मागून तिच्या खांद्यावर एक हात ठेवला जातो.

“शुभदा? इतक्या रात्री इथे काय करतेय??”

“ऋग्वेद..झोपला नाहीस??”

“नाही, मलाही झोप लागली नाही…मी खरं तर प्लॅंनिंग करत होतो, आपल्याला कुठे फिरायला जायचं याची…”

“इतक्या रात्री??”

“दिवसभर कुठे वेळ मिळतो..डोळे लावून पडलेलो पण मनात नुसता गोंधळ, मनाली ला जायचं की केरळ ला…”

“इतक्यात नको..”

“का?”

“मला Phd साठी एक पेपर सादर करायचा आहे, त्यासाठी थोडं काम आहे..

“ठीक आहे, ते झालं की मग जाऊ…पण तू इथे काय करतेय सांगितलं नाहीस..”

“मी…सहजच..”

“काहीतरी कारण असल्याशिवाय तू इथे येणार नाहीस हे माहितीये मला…सांग खरं काय ते..”

“ऋग्वेद… हे बघ, माझ्या आयुष्यात गेल्या काही दिवसात अश्या काही गोष्टी घडल्या की माझं आयुष्याचं ध्येयच एकदम बदलून गेलं. तुझ्या घराण्याशी माझा पूर्वापार संबंध आहे असं वाटू लागलंय मला..देव्हाऱ्यात हे पुस्तक ठेवलं आहे ना, यात काय आहे माहितीये??”

“पुस्तक आहे, मोडी लिपीत..”

“तुला कसं कळलं?”

“मला माहित होतं आधीपासूनच..”

“मग…असं का म्हणायचे की कुणालाही माहीत नाही म्हणून..”

“ही गोष्ट फक्त मी, दिगंबरपंत आणि आता तुला माहिती आहे..या पुस्तकाबद्दल अनेकांना चमत्कारिक अनुभव आलेत..काही दुःखदही..या पुस्तकामुळे एकदा अरुंधती आजी आजारी पडली होती, आणि आजाराने ती गेली ती गेलीच..तेव्हापासून आम्ही ते पुस्तक उघडून पाहायला घाबरतो..आणि नवीन येणाऱ्या व्यक्तीलाही बजावून सांगतो..”

“अच्छा म्हणजे हे कारण आहे तर..”

“हो…तुही दूर रहा त्या पुस्तकापासून..”

“अरे नाही…मला स्वप्नात सतत ते पुस्तक दिसतंय, मोडी लिपीत काही अक्षरं दिसताय…पण त्याचा अर्थ कळत नाहीये… मला वाटतं मी त्याचा अर्थ शोधून काढावा..”

“हे बघ शुभदा, आधीच या घराण्याने आजीला गमावलं आहे, आता पुन्हा कुणाला गमावण्याची हिम्मत कुणातच नाही..”

“पण मला तसा दैवी संकेत मिळालाय ऋग्वेद..आपल्या घराण्यात रत्नपारखी आणि नारायनकर कुटुंब एक होतील तेव्हा एक दिव्य कार्य होईल असं रुद्रशंकर गुरुजींनीही सांगितलं आहे..कदाचित, हेच ते असेल..मी त्या पुस्तकातील शब्दांचा अर्थ शोधून काढावा असंच त्या नियतीच्या मनात असेल..रुद्रशंकर गुरुजींनीही हेच सांगितलं आहे..”

“हे बघ, या बदल्यात जर तुझ्या जीवाला धोका निर्माण होणार असेल तर नको कसलाही शोध अन पुस्तक..”

“लग्नाआधी म्हटला असतास तर कदाचित ऐकलं असतं, पण आता रत्नपारखी घराण्याची सून आहे मी..इथली तत्व, इथल्या स्त्रियांच्या रक्तात असलेली कर्तबगारी मी धुळीस नाही मिळू देणार..त्या बदल्यात प्राण गेले तरी बेहत्तर..”

शुभदा एवढं म्हणत निघून जाते..ऋग्वेद ला एका क्षणी आनंदही होतो, की घराण्याला शोभेल असाच हिरा आपण घरात आणलाय, पण सोबतच तिच्या जीवाशी काही खेळ तर होणार नाही ना…म्हणून त्याला भीतीही वाटायला लागते.

दुसऱ्या दिवशी शुभदा तडक आपल्या कॉलेजमधील माने सरांना भेटते.

“सर…माझा Phd चा विषय ठरलाय..”

“अरेवा. साहित्य अन समाजमाध्यमं हाच ना??”

“नाही सर, मोडी लिपी अन साहित्य…”

“काल तर तू नाही म्हणत होतीस त्याला..आज अचानक काय झालं??”

“दैवी संकेत म्हणा किंवा कर्तव्यपूर्ती…”

“तुझ्या मनात काय चाललंय मला माहित नाही, पण तू योग्य निर्णयच घेशील हे मात्र नक्की..पण लक्षात ठेव, मोडी लिपीत तुला संशोधन करायचं असेल तर ती पुर्ण भाषा, तिची मुळाक्षरं शिकण्यापासून तुला सुरवात करावी लागेल. अवघड आहे हा हे..”

“सोपी कामं आवडतच नाही सर मला…काळजी करू नका, मी खूप अभ्यास करेन आणि यात यश मिळवेन..”

“यशस्वी भव..”

शुभदा कामाला लागते. पुस्तकात डोकावण्याआधी तिला पूर्ण मोडी लिपी आत्मसात करायची असते. ती एकेक मुळाक्षर शिकायला घेते, मुळाक्षरांपासून शब्द शिकते अन हळूहळू त्यांचे अर्थ जाणू लागते. इंटरनेट, वाचनालायतील पुस्तकं यांचा संदर्भ ती घेत असते. हे सगळं सुरू असतानाच दिगंबरपंत तिच्या खोलीत येतात..

“सुनबाई, कसा चाललाय अभ्यास..”

“बाबा..या..” शुभदा खुर्चीवरून उठून उभी राहते..

“अगं बस बस, चालू दे तुझा अभ्यास..”

दिगंबरपंतांचं लक्ष टेबलवर असलेल्या मोडी लिपीतील पुस्तकांकडे जातं.

“हे काय? मोडी लिपीची पुस्तकं घेऊन काय करतेय??”

“बाबा..मी मोडी लिपीतील साहित्य यावर एक संशोधन करतेय, Phd मी यात विषयात करणार आहे..”

दिगंबरपंतांना कौतुक वाटतं..

“अगं मग यातील काही पुस्तकं तुझ्या वाचनालयातही आहेत..”

“खरंच?? मी बघितलंच नाही..”

“पूर्वापार आपण जपलेलं वाङ्मय आणि पुस्तकं आपण वाचनालयात ठेवत असतो..तुला नक्कीच त्याचा फायदा होईल…आणि हो, काशीबाई..ओ काशीबाई.. सूनबाईचा नाश्ता कुठाय? अभ्यास करायला ताकद हवी की नको..”

“बाबा झालाय आत्ताच नाश्ता…”

“बरं.. आणि काहीही लागलं तर एका हाकेवर आहे मी इकडे..बरं का..”

“हो बाबा… तुम्ही आहात म्हणून काहीतरी नवीन करण्याची जिद्द आलीये माझ्यात…नाहीतर इतर मुलींसारखं संसाराच्या व्यापात, जबाबदारीत अडकून नात्यांचे गुंते सोडवण्यात आयुष्य गेलं असतं.. नशीबवान आहे मी..”

“या घराण्याची रितच आहे सुनबाई ती…लग्न करून आणलेल्या मुलीवर आपला भार न टाकता तिला नवीन ध्येय द्यायची, माप ओलांडून घरी आणायचं ते नवनवीन शिखर पादाक्रांत करायला, तिला आकाशात उंच भरारी घेऊ द्यायला, अगं लोकं लक्ष्मी म्हणून सुनेला घरी आणतात अन आल्या दिवशी हातात केरसुणी देतात…पण आपल्या घराण्यात आलेल्या लक्ष्मीला..लक्ष्मी नावाला साजेसं एक रणांगण देतात…हो पण या रणांगणात किती विजयी पताका फडकवायच्या ही मात्र आलेल्या सूनबाईची जबाबदारी…”

“बाबा…मी ही जबाबदारी कसोशीने पूर्ण करेन…”

दिगंबरपंत शुभदाला आशीर्वाद देऊन निघून जातात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे शुभदा तिच्या वाचनालयात मोडी लिपीची पुस्तकं शोधत असते. काही वेळाने तिला खूप जीर्ण झालेली, अगदी हात लावला तरी फाटेल अशी पानांची अवस्था झालेली पुस्तकं सापडतात. ती अलगद ते पुस्तकं हातात घेते..त्या पुस्तकांचा स्पर्श, त्यांचा सुगंध आणि त्यातील अक्षरं तिला ओळखीची वाटू लागतात…

3 महिने ती मोडी लिपीचा चांगला अभ्यास करते. आता तिला बऱ्यापैकी ती लिपी लिहिता आणि वाचता येऊ लागलेली असते. आता तिला ओढ लागते ती देव्हारातल्या त्या पुस्तकाचा अर्थ शोधून काढायची. पण ते पुस्तक उचलून आणलं तर सर्वजण विचारतील, देव्हाऱ्यातली वस्तू कुठे हरवली म्हणून…मग शुभदा एक दुसरं पुस्तक घेऊन हळूच त्या लाल कपड्यात ठेवते आणि आतील पुस्तक आपल्या खोलीत घेऊन येते. आधाशीपणे ती पहिलं पान वाचायला घेते…त्यात सुरवातीलाच लिहिलेलं असतं…

“माझी पहिली अक्षरं गिरवतांना माझे हात थरथरत आहेत. कारण मला जर कुणी लिहिताना पाहिलं, किंवा निदान मला लिहिता वाचता येतं हे समजलं तर कदाचित मरणालाही मला सामोरं जावं लागेल, माझा विटाळ धरण्यात येईल,पण हे पाऊल मी सर्व धोका पत्करून स्वीकारतेय. कारण माझ्या जन्मापूरता मी विचार करू शकत नाही, माझ्या येणाऱ्या प्रत्येक पिढीला मला काहीतरी सांगायचं आहे, त्यांना काहीतरी द्यायचं आहे, जेणेकरून त्यांची आयुष्य सुखी होतील..”

शुभदाच्या अंगावर काटाच उभा राहतो, साधारण 1800 च्या शतकात, ज्यावेळी स्त्रियांना शिक्षण तर सोडाच, पण मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवलं जायचं त्या स्त्रीने इतक्या हिमतीने आणि इतकी दूरदृष्टी ठेऊन हा विचार केलाय. आणि या स्त्रीला पुढच्या पिढ्यांसाठी काहीतरी सांगायचं आहे हे स्पष्ट दिसून येतंय, पण घरात मात्र त्याचा कुणालाही पत्ता नाही. देव्हाऱ्यात ठेऊन पूजा केली जातेय फक्त..कदाचित मी याचा अर्थ शोधावा म्हणून मला दैवी संकेत तर मिळाला नसावा ना??

शुभदा तिच्या विचारात गढलेली असताना काशीबाई केव्हा तिच्या समोर चहा ठेऊन जातात तिला कळतच नाही, ती जेव्हा भानावर येते तेव्हा तिचा धक्का कपाला लागुन चहा त्या पुस्तकावर सांडतो.. शुभदा खूप घाबरते, चिडते, हैराण होते.. आधीच जीर्ण झालेली पानं, त्यात चहामुळे जवळपास 15-20 पानं खराब होऊन जातात. त्यातलं काहीच वाचण्यायोग्य उरत नाही. शुभदा प्रचंड नाराज होते.स्वतःलाच ती दोष देत बसते..पानांची जुळवाजुळव केली तरी आता फक्त शेवटची काही पानं वाचण्यायोग्य राहिली होती.

देवाने मला या पुस्तकाचा अभ्यास करण्याचा संकेत दिला, अन त्यानेच असं का करावं?? मला मार्ग त्याने दाखवला अन अडथळाही त्यानेच का आणावा?

या सगळ्या विचारात असताना तिला रुद्रशंकर गुरुजींचा फोन येतो. जुजबी चौकशीत त्यांच्या लक्षात येतं की शुभदा कशामुळे तरी नाराज आहे..ते तिला एकच सांगतात..

“घडणारी प्रत्येक गोष्ट विधिलिखित असते, आणि आलेल्या अडचणी या पुढील पाऊल काय उचलावं याचा संकेत देणारी असतात..”

क्रमशः

भाग 7
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-7-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 8
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-8-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 9
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-9-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 10
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-10-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 11
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-11-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 12
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-12-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 13
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-13-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 14
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-14-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 15 अंतिम
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-15-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82/

6 thoughts on “घराणं (भाग 6) ©संजना इंगळे”

Leave a Comment