घराणं (भाग 5) ©संजना इंगळे

रेखाला शुभदाने देव्हारातल्या त्या वस्तूबद्दल विचारलेलं आवडलं नाही. रेखा शक्य तितक्या शांततेत तिला त्या वस्तूबाबद्दल जास्त चौकशी न करण्याबद्दल खबरदारी घेतली. शुभदाला ऋग्वेद ने आवाज दिला तशी ती तिथून निघाली अन रेखाने सुटकेचा निःश्वास टाकला. विनायकच्या दोन्ही सुनांसोबत ती मिसळून गेली होती. रश्मी, विनायकाची मोठी सून अन दिवाकर ची बायको..सकाळी लवकर उठून जिम ला जायची तिला सवय होती. शुभदाने तिच्यासोबत जिम ला सुरवात केली. रश्मीच्या बॅडमिंटन च्या स्पर्धा दर 3 महिन्यांनी असायच्या, त्यासाठी फिटनेस टेस्ट तिला पार करावी लागत असे. रश्मी आणि तिची धाकली जाऊ मीनल सोबत शुभदाचं छान पटत होतं. दोन्हीही मुलींनी घराण्याचं नाव काढलं, रत्नपारखी घराण्याशी त्या एकरूप झाल्या होत्या.

नेहमीप्रमाणे सकाळी आवरून तिघी सुना देव्हाऱ्यात नमस्कार करायला आल्या तेव्हा शुभदाने रश्मीला विचारलं,

“या लाल कपड्यात काय आहे??”

“आपल्या घराण्यात पूर्वापार ही वस्तू पुढच्या पिढीकडे सोपवण्यात येते..पवित्र वस्तू आहे ती, त्यामुळे आपल्या घराण्याचं पावित्र्य आणि सुखशांती टिकून आहे..”

“हो पण आहे काय त्यात?”

“ते आम्हालाही माहीत नाही..”

प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर उतरवून मगच मान्य करायचा शुभदाचा स्वभाव होता. त्यामुळे मनात सतत त्या वस्तूबद्दल कुतुहल तिच्या मनात जागृत होत असे.

रश्मी पुढच्या स्पर्धेची तयारी करत होती, 2 महिन्यांनी तिची स्पर्धा होती आणि यावेळी तर ती खूपच महत्वाची होती, देशस्तरीय पातळीवर तिला खेळायला मिळणार होतं आणि त्यात विजेती झाली तर देशाचं प्रतिनिधित्व करायला मिळणार होतं. तिच्या तयारीसाठी दिगंबरपंतांनी खास प्रशिक्षक नेमला होता. जानकीबाईंनी खास आहारतज्ञांशी सल्लामसलत करून तिचा आहार काशीला बनवायला सांगितला होता. तिची लहान जाऊ मीनल, म्हणजेच विनायकाची धाकली सून चित्रकार होती. तिने बनवलेल्या चित्रांचे दिगंबरपंत दरवर्षी मेळावा भरवत, घरात ठिकठिकाणी तिने बनवलेल्या पेंटिंगच लावलेल्या असायच्या. सगळी चित्र तिने काढलेली, पण एक चित्र काही केल्या तिला जमेना.. घरातल्या प्रत्येकाचं हुबेहूब चित्र ती काढू शकत होती पण सर्वांचा एकत्र असलेला फोटो तिला बघून काढणंही शक्य होत नसायचं. काढताना काहीतरी सतत चुकायचं, रंगसंगती चुकायची, कधी आकार चुकायचा..इतकी उत्तम चित्रकार असलेल्या तिला याची सल नेहमी वाटत राहायची.

शुभदाचंही कॉलेज सुरू झालं. गळ्यात मंगळसूत्र असलेल्या शुभदाला बघून मैत्रीणी तिला चिडवायच्या, शुभदाही लाजून त्यांना गप करायची. अश्यातच मराठीच्या शिक्षकांनी तिला भेटायला बोलावलं. माने सर, मराठीचे शिक्षक अन त्यांची लाडकी विद्यार्थिनी म्हणजे शुभदा. त्यांनी तिला भेटायला बोलावलं, त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव होते ते शुभदाच्या लक्षात आले..

“सर तुम्ही आज नाराज दिसताय..”

“शुभदा तुझ्याकडून माझ्या खूप अपेक्षा होत्या, मराठी साहित्यात तू खूप पुढे शिकावं, खूप प्रगती करावं…पण तू लग्नाची घाई केलीस असं नाही वाटत तुला?”

“सर पण माझं लग्न आणि माझं शिक्षण याचा काय संबंध??”

“लग्न झाल्यावर शिक्षण सोडलेल्या खूप हुशार मुली पहिल्या आहेत मी..संसाराला लागल्या की स्वतःचं अस्तित्व हरवून बसतात, आणि जेव्हा जाणीव होते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. तुझ्या Phd चं काय?? करणार की नाही पुढे??”

हे ऐकून शुभदा हसायला लागते, रत्नपारखी घराण्याबद्दल ती सगळं सांगते आणि तिला अभ्यास करता यावा यासाठी घरात किती अनुकूल वातावरण तयार गेलं आहे हेही सांगते..माने सर हे ऐकून खुश होतात..

“मनावरचा फार मोठा ताण गेला बघ…Phd साठी ही काही रिसर्च पेपर्स आहेत, ही काही पुस्तकं आहेत, यांचा संदर्भ घे आणि कामाला लाग…”

शुभदा ते पेपर बघते..

“सर यात हे एक अर्धवट रिसर्च आहे, मोडी लिपीतील… कुणाचं आहे??”

“फार पूर्वीचं दिसतंय..”

“तरी किती पूर्वीचं??”

“आपलं कॉलेज अगदी जुनं बघ, अगदी इंग्रजांच्या काळातलं… केलं असेल कुणी तेव्हाच..”

“तेव्हा मोडी लिपी अस्तित्वात होती??”

“1200व्या शतकापासून ते अगदी इंग्रज भारत सोडायच्या वेळीही ती अस्तित्वात होती. सर्व कारभार मोडी लिपीत होत असत. मग इंग्रजांनी मोडी लिपीला हद्दपार करत देवनागरी लिपीला अंतिम मंजुरी दिली..”

“पण मग आता Phd साठी हे काय कामाचं..”

“साहित्याला भाषेचं बंधन ठेऊ नकोस, ऐतिहासिक साहित्य म्हणून तू यावर संशोधन करू शकतेस..”

“खरं तर मला आधुनिक साहित्य आणि समाजमाध्यमं यावर संशोधन करायचं होतं..”

“कर की मग..छान विषय आहे..मोडी लिपीत तुला आवड नसली तरी आपल्या बोलीभाषेतील अभ्यासही चांगलाच की..”

इतक्यात तिच्या डोळ्यावर एक प्रकाश आला आणि तिने डोळे झाकून घेतले. ऊन डोळ्यावर आल्याने ती बाजूला झाली. तिने ते पेपर जमा केले, डोळ्यापुढे अंधारी आली..पण अश्यातही त्या मोडी लिपीतील लिखाण तिला तेजःपुंज दिसत होतं. डोळ्यापुढे अंधारी असताना ते मोडी लिपीतील पेपर तिला स्पष्ट दिसत होते, हा एक दैवी साक्षात्कारच होता.. पण तिला ते लक्षात यायला काही अवधी अजून बाकी होता.

इकडे दिगंबरपंत एका नवीन जागेच्या खरेदी संदर्भात एक मोतीलाल नावाच्या व्यापाऱ्यासोबत चर्चा करत होते. त्यांची टेक्सटाईल कंपनी नवीन जागेत हलवावी असा विचार त्यांच्या मनात होता. कारण सद्य जागेवर कच्चा माल पुरवठा होतांना खूप अडचणी यायच्या, ठिकाण लांब असल्याने कधी माल पोहोचायला वेळ लागे. तशीच एक ऑफर त्यांना एका दुसऱ्या व्यापाऱ्याकडून, सुमनशेठ कडून आलेली. दोन्ही जमिनी मोक्याच्या जागेवर होत्या आणि किमतीही सारख्याच होत्या. पण घेतांना विचारपूर्वक घ्यावी लागणार होती, कारण एकदा का खरेदी झाली की मग नंतर त्याच्या मालकी हक्कावर काही कायदेशीर गदा यायला नको. त्यामुळे दिगंबरपंत विचार करून हा निर्णय घेणार होते.

मेघना, म्हणजेच शुभदाच्या सासुबाईं अजूनही गॅरेज चालवत होत्या. शुभदाला आपल्या सासूबाईंना असं काम करताना पाहून विशेष कौतुक वाटे. मेघनाने हाताखाली माणसं ठेवलेली असली तरी काही मोठा बिघाड झाला की तीच कामात येई. सध्या गॅरेजचा व्याप वाढला होता, बंगल्याच्या जवळच एका मोठ्या हायवे चं काम नुकतंच पूर्ण झालेलं आणि येणारी वाहतूकही वाढली होती, त्यामुळे आता गॅरेजमध्ये बरीच गर्दी असायची.

एक दिवस गावाकडे नातेवाईकांमध्ये एक लग्न निघालं, घरातली काही मंडळी तिथे जाणार होती. सर्व सुनांना आणि मुलांना आपापल्या कामात व्यत्यय नको म्हणून त्यांना घरीच थांबवण्यात आलं. जानकीबाई, रेखा, विनायक, सुभाष आणि परशुराम यांनी जायचं ठरवलं. मेघना गॅरेजच्या कामासाठी इथेच थांबली. रेखाची जायची इच्छा नव्हती पण दिगंबरपंतांच्या शब्दाला मोडण्याचं साहस त्यांना झालं नाही.

ठरलेली मंडळी गावाला निघून गेली. घरी आता तिन्ही सुना, मुलं आणि मेघना फक्त होती. मेघना गॅरेजमध्ये काम करत असताना शुभदा तिथे गेली अन सासुबाईंचं असं मन लावून काम करणं कौतुकाने बघू लागली. मेघनाचं कितीतरी वेळ लक्षच नव्हतं, काही वेळाने त्यांच्या लक्षात आलं तसं त्या हसून म्हणाल्या,

“अगं बाई, तू कधी आलीस??”

“केव्हाची आलीये, पण म्हटलं तुम्हाला डिस्टर्ब नको करायला..”

“ये ये..बस…आज इकडे कशी?”

“सहजच…सासूबाई एक विचारू?? तुम्हाला या क्षेत्रात कसं येऊ वाटलं?? म्हणजे हेच क्षेत्र का??”

“अनवधानाने म्हण किंवा नशिबाने म्हण..गरीब कुटुंबाला हातभार म्हणून पडेल ते काम करण्याची जिद्द ठेवली अन हे काम हाती आलं..”

“पण मग सगळं नीट झाल्यावर हे काम सोडून दुसरं करता आलं असतं की..”

“या कामात एक गंमत आहे, सांगू??”

“कसली गम्मत??”

“लोकांच्या गाड्या जेव्हा चांगल्या असतात तेव्हा ते इकडे फिरकतही नाही..पण काही अडचण आली की बरोबर त्यांचे पाय वळतात.”

“हो..मग??”

“आयुष्यही असंच आहे..लोकांना जेव्हा गरज पडते तेव्हा त्यांचे पाय कुणाकडे वळतात यावरून माणसाची किंमत आपल्याला कळते…इथे खूप इतर गॅरेज आहेत, पण आपण कमी किमतीत आणि चांगल्या मनाने लोकांचा प्रवास सुखकर करतो, म्हणून लोकं इथेच येतात…आयुष्यही असंच जगावं..लोकांना आपल्या चांगल्या स्वभावाने आणि मधुर वाणीने आकर्षित करायचं..त्यांना काही अडचण आली तर केवळ आपला चेहरा आठवावा..हेच तर पुण्य आहे..”

शुभदाला पावलोपावली घराण्याच्या
दिव्यत्वाचं दर्शन होत होतं.

घरात जास्त माणसं नव्हती, अश्यातच शुभदाच्या डोक्यात येतं की देवघरातील ती लाल कपड्यातील वस्तू उघडून पाहिली तर?? ती संधी साधून दुपारी सर्वजण आपापल्या खोलीत गेले असता दबक्या पावलांनी देवघरात जाते. लाल कपड्यातील त्या वस्तूकडे एकदा बघते आणि वेळ न दवडता वस्तू उघडायचा प्रयत्न करते. लाल कपडा बाजूला होताच आत जे दिसतं त्याकडे ती बघतच राहते..एक जीर्ण झालेलं खूप जुनं आणि हाताने लिहिलेलं एक पुस्तक त्यात होतं. शुभदा मागून पुढून ते बघते आणि तिचा काहीसा हिरमोड होतो.. तिला वाटलेलं की काहीतरी भन्नाट असणार, पण निघालं पुस्तक…ती ते तसंच लाल कपड्यात ठेऊन पुन्हा तिच्या कामाला लागते.

“रेखा आई पण ना, सरळ सांगायचं ना की पुस्तक आहे त्यात..उगाच परीक्षा घेतली माझी..”

शुभदाला जरा हायसं वाटलं, नाहीतर कायम त्या लाल कपड्यातील वस्तूचा प्रश्न तिला भेडसावत राहिला असता.

रात्री मात्र शुभदाच्या स्वप्नात विचित्र आकृत्या येऊ लागलेल्या, कॉलेजमधील माने सर, ते मोडी लिपीतील साहित्य, देवघरात सापडलेलं पुस्तक..आणि सरतेशेवटी एक जरिकाठाची साडी घातलेली अन डोक्यावर पदर घेतलेली एक दिव्य स्त्री तिच्या डोळ्यासमोर येते…ती तिला ते पुस्तक सुपूर्द करतेय असं तिला दिसतं अन शुभदा खाडकन जागी होते.

क्रमशः

भाग 6
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-6-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 7
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-7-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 8
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-8-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 9
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-9-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 10
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-10-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 11
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-11-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 12
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-12-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 13
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-13-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 14
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-14-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 15 अंतिम
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-15-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82/

5 thoughts on “घराणं (भाग 5) ©संजना इंगळे”

  1. खुप छान आहे ही कथा पुढचा भाग वाचण्यास खूप उत्सुक आहे लवकर प्रकाशित करा

    Reply

Leave a Comment