घराणं (भाग 3)

दिगंबरपंत घरी जातात, सुभाषची बायको रेखा देवपूजा करत असते. या घरात आल्यापासून देवपूजा नेहमी तीच करत असायची, तिला पाहून दिगंबरपंत म्हणायचे,

“अहो दुसऱ्यांनाही पुण्य मिळु द्या की..”

“काय बाबा, सवय झालीये मला..देवपूजा केल्याशिवाय चैन पडत नाही..”

“आता नवीन सुनबाई आली की करू दे तिलाच..”

हे ऐकताच रेखा चमकते, देवपूजा दुसरं कुणी करणार हे तिला सहन होणार नव्हतं..

“सुनबाई?? कोण??”

“सांगतो..ऋग्वेद… मेघना..परशुराम.. खाली या..”

सर्वजण आपापल्या खोलीतून बाहेर आले.

“मी ऋग्वेद साठी एक मुलगी बघितली आहे, आपल्या घराला शोभेल अशी कर्तृत्ववान मुलगी आहे ती…”

ऋग्वेद आजच दिगंबरपंतांना शुभदाविषयी सांगणार होता..पण त्या आधीच हे ऐकून त्याला धक्का बसला. आणि आता जर सांगितलं तर दिगंबरपंतांना वाईट वाटेल असा त्याने विचार केला.

“बोलणी करून आलात का तुम्ही??” परशुराम ने विचारलं…

“नाही, फक्त मुलगी पाहिलीये…पण माहिती काढून तिच्या घरच्यांपर्यंत नक्की पोचतो लवकरच..”

कोण मुलगी असेल अशी? ऋग्वेद ला प्रश्न पडतो..

“बाबा मुलगी कुणीही करा, पण देवपूजा मात्र मीच करणार..” रेखा म्हणते,

“बरं बाई…कुणाचं काय तर कुणाचं काय..”

दिगंबरपंत शुभदा च्या घराण्याची माहिती काढतात, एका मध्यस्थीला पकडत दिगंबरपंत रावसाहेबांच्या घरी पोहोचतात. शुभदाने सांगितल्याप्रमाणे चार कंपन्यांचे मालक असलेल्या रावसाहेबांचे घर श्रीमंतीला शोभेल असे होते. चकचकीत फर्निचर, रंगेबेरंगी काचेची तावदाने, शुभ्र पडदे, चमकदार फरशी. क्षणभर दिगंबरपंतांना विचार आला, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी उन्हात उभी राहून नेतृत्व करणारी मुलगी इतक्या श्रीमंत घरातली? घर सुरेख तर होतच पण संस्कारांचे ठसे जागोजागी उमटले गेले होते. प्रशस्त देव्हारा, भिंतींवर धार्मिक प्रतिकांच्या फ्रेम्स, धूप अगरबत्ती चा सुगंध.. एखाद्या मंदिरात आल्याप्रमाणे सगळं भासत होतं.

इतक्यात रावसाहेब बाहेर आले आणि दिगंबरपंतांना त्यांनी अभिवादन केलं.

“नमस्कार… मी दिगंबर रत्नपारखी..”

“काय चेष्टा करता, तुम्हाला कोण ओळखत नाही…तुम्ही इथे आलात हे आमचं भाग्य..”

“खरं तर एका कामानिमित्तच आलोय मी, तुमच्या मुलीला मी कॉलेजमध्ये बघितलं. खूपच साहसी आणि नेतृत्वकुशल आहे ती, स्पष्टपणे सांगायचं तर माझी सून म्हणून करून घ्यायला मला आवडेल..”

“काय सांगताय, अहो हे आमचं भाग्यच म्हणायचं..तुमच्या घराण्यात मुलगी देणं म्हणजे मागच्या जन्मात काहीतरी पुण्य केलं असावं मी…”

शुभदाची आई हे सगळं ऐकत होती, तिने हळूच आवाज दिला..

“रावसाहेब…जरा इकडे येता का?”

“दिगंबरपंत, जरा येतो मी हा..”

रावसाहेब हळूच आत जातात.

“काय गं काय झालं??”

“अहो ते घराणं खूप मोठं असलं तरी त्यांची जात वेगळी आहे…असं आंतरजातीय लग्न आपल्याकडे मान्य तरी आहे का?”

रावसाहेब विचारात पडले, त्यांना बायकोचं म्हणणं पटलं. दिगंबरपंत मोठे असले आणि त्यांना नकार देणं शक्य नसलं तरी रावसाहेबांना आपल्या नातेवाईकांना आणि आप्तेष्टांना सामोरं जावं लागणार होतं. त्यांची द्विधा मनस्थिती झाली. दिगंबरपंतांना आता काय सांगावं हे काही त्यांना समजेना. मान खाली घालतच ते दिगंबरपंतांसमोर गेले. रावसाहेबांचे हावभाव पाहून दिगंबरपंत म्हणाले,

“रावसाहेब…हा खुप मोठा निर्णय आहे. तुम्ही वेळ घ्या, खरं तर माझंच चुकलं..जातीबाहेर खरं तर प्रेमविवाह होतात, पण मी स्थळ म्हणून आलो..आमच्याकडे हे मान्य असलं तरी दुसऱ्यांच्या घरी हे मान्य असेलच असं नाही. माफ करा माझं चुकलंच..”

“दिगंबरपंत हा तुमचा मोठेपणा आहे, माफी कसली मागता..”

“तुम्ही वेळ घ्या, निर्णय कळवा मला..”

दिगंबरपंत थोडेसे नाराज होऊन निघून जातात. मनात विचार येतात, आजही दुसऱ्या जातीत लग्न होत नाहीत, पण माझ्या घरात मात्र आधीपासूनच ही प्रथा मोडण्यात आली..खरंच, कोण असेल ती दिव्य स्त्री जिने त्या काळात हा नियम घालून दिला असेल??

रावसाहेब चिंतित होतात, काय करावं आता? एक तर इतकं चांगलं स्थळ चालून आलंय, पण नातेवाईकांचाही विचार करावा लागेल. रावसाहेब त्यांच्या बायकोशी, म्हणजेच सुमनशी बोलतात..

“सुमन…हे काय होऊन बसलंय..”

सुमन आधीच चिंतेत असते..

“रत्नपारखी घराण्यात मुलगी द्यायचं म्हणजे आपलं भाग्यच…पण त्यांच्याशी आपलं एक नातं आहे..”

“कुठलं नातं..?”

“म्हणजे माझी आजी सांगायची, मला पूर्ण माहीत नाही…आजीची आई आणि आणि रत्नपारखी घराण्यातील एक पुरुष.. यांनी त्या काळात लग्नासाठी विचार केला होता..म्हणजे त्या दोघांची ओळख अशीच कुठेतरी झालेली…पण ..”

“पण काय??”

“त्या काळात प्रेमविवाह तोही आंतरजातीय… म्हणजे लोकं जीव घ्यायलाच निघालेली..”

“बापरे…”

“काहीतरी नातं होतं… एक इतिहास आहे आपल्या अन त्यांच्या घराण्याचा..पण आपल्या पिढीला तो पूर्ण माहीत नाही..”

“काय नातं असेल?”

“एक माणूस हे सांगू शकतो…”

“कोण?”

“आपल्या ओळखीतले भाट.. आपले गुरुजी..रुद्रशंकर गुरुजी..आपण त्यांच्याकडूनच सल्ला घेतो नेहमी..”

“त्यांचा सल्ला घेऊ नक्की…चल लगेच जाऊया..”

दोघेही रुद्रशंकर गुरुजींकडे जातात…गुरूजी आणि त्यांची मागची पिढी ही नारायनकर कुटुंबाची सगळी धार्मिक कार्य करत असत. अत्यंत विश्वासू अशी ती माणसं, त्यांच्या चार पिढ्यांपासून नारायनकर कुटुंबाच्या सोबत ते होते..आजही ती प्रथा कायम सुरू होती.

रुद्रशंकर गुरुजी, चेहऱ्यावर एक विलक्षण तेज. त्यांच्या घरी वेदमंत्रांनी भारलेली प्रत्येक वस्तू..पावित्र्याचा सुगंध त्यांच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्याकोपऱ्यातून दरवळत होता. रावसाहेब आणि सुमन त्यांच्यासमोर जाताच त्यांनी गुरुजींना वाकून नमस्कार केला. गुरुजी खुर्चीवर ध्यानस्थ बसले होते. गुराजींचे ध्यान संपायची वाट बघत दोघेही तिथेच खाली चटईवर बसून राहिले.

गुरुजी डोळे बंद ठेवूनच म्हणाले, बोला..मी ऐकतोय..

रावसाहेब आणि सुमन एकमेकांकडे बघतात, रावसाहेब सुमन ला सांगायचा इशारा करतात तसं सुमन म्हणते.

“गुरुजी.. शुभदा साठी एक स्थळ आलंय…खूप मोठं घराणं आहे..सगळं अगदी छान आहे..पण..जात वेगळी आहे..”

“काय नाव घराण्याचं..”

“रत्नपारखी…”

हे ऐकताच गुरुजी डोळे उघडतात. दोघांकडे बघतात आणि चटकन उभे राहतात.

“काय झालं गुरुजी??”

“तुमच्या अनेक पिढ्यांची वाट आम्ही पाहिली, माझ्या पूर्वजांनी सांगितलं होतं, ज्या पिढीत नारायनकर आणि रत्नपारखी घराण्याचे संबंध जुळतील तेव्हा एक अद्वितीय गोष्ट घडून येईल…आणि इतक्या पिढ्यानंतर आज तो योग जुळून आलाय..”

“काय? म्हणजे…हे सगळं..”

“हो. हे सगळं विधिलिखित होतं… कुठल्यातरी एक पिढीत हे होणारच होतं आणि तुमच्या पिढीला हे दिव्यत्व मिळेल…नशीबवान आहात तुम्ही..हे लग्न व्हायलाच हवं..”

“धन्यवाद गुरुजी… मनावरचा मोठा ताण गेला बघा.. ”

“थांबा..”

असं म्हणत गुरुजी आत जाऊन एक पितळाची पेटी घेऊन येतात अन सांगतात.

“माझ्या पिढ्यांनी ही गोष्ट वारंवार सांगितली…की जेव्हा ही दोन घराणं नात्यात बांधली जातील तेव्हा तुमच्या अपत्याकडे हे सुपूर्द करायचं…”

“काय आहे त्यात??”

“ते आम्हाला माहीत नाही, आम्हाला ते बघण्याची मान्यताही नाही आणि नीट पहा, त्याला एक छोटंसं कुलूप आहे…त्याची चावी कुणाकडेही नाही. तीन ते चार पिढ्यांपूर्वी म्हणजेच जवळपास 300 सालापूर्वीचं हे धन आहे… याची जबाबदारी आता शुभदा कडे… तिच्या लग्नात मी तिला हे देईन..”

रावसाहेब आणि सुमन घरी येतात.

“काय प्रकार आहे हो हा? ती पेटी, ती किल्ली, रत्नपारखी कुटुंबाशी संबंध, काहीतरी दिव्यत्व… काय असेल??”

“कसलाच सूर सापडत नाहीये, पण जे काही आहे ते एक दिव्य आहे, काहीतरी दैवी आहे..आणि आपली शुभदा त्याचा एक भाग असणार आहे..”

काय असेल रत्नपारखी आणि नारायनकर घराण्याचा इतिहास?? देव्हाऱ्यातली ती गोष्ट आणि रुद्रशंकर गुरुजींकडे असलेली ती पेटी, यांचा काय संबंध असेल? आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारी कोण असेल ती दिव्य स्त्री?? पुढील काही भागात सर्व उलगडा होईलच…

क्रमशः

भाग 4
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-4-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 5
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-5-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 6
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-6-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 7
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-7-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 8
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-8-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 9
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-9-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 10
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-10-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 11
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-11-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 12
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-12-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 13
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-13-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 14
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-14-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 15 अंतिम
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-15-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82/

5 thoughts on “घराणं (भाग 3)”

Leave a Comment