घराणं (भाग 15 अंतिम) ©संजना इंगळे

एव्हाना पूर्ण घरात या 500 करोडची माहिती समजली. वीणा आजोबांना भेटायला तातडीने दवाखान्यात आली. आजोबांना भेटल्यावर ती आधी शुभदाला भेटली,

“वहिनी..कमाल केलीस हा..”

“कमाल मी कसली, या पुस्तकाने केलीय..बघ ना, रश्मीला या पुस्तकानेच मार्ग दाखवला..मिनलच्या चित्राचा श्राप यानेच दूर केला..दिगंबरपंतांना बरं केलं अन आर्थिक प्रश्न सोडवला तेही यानेच..”

“खरंच गं.. वहिनी पण हेही तितकंच खरं की तू जर या घरात आली नसती तर त्या पुस्तकाची उकल कुणीही केली नसती, ते पुस्तक तसंच पडून राहिलं असतं कित्येक वर्षे, आणि अखेर एखाद्या नास्तिकाच्या पिढीत पूर्णपणे हद्दपार झालं असतं..”

“देवाचा संकेत..दुसरं काय..”

“बरं आता आजोबांना आज घरी सोडताय, सर्वजण घरी जाऊ, जरावेळ आराम करू..संध्याकाळी सर्वजण जमले की पुस्तकाचं सगळं घरच्यांना सांगून टाक..”

दिगंबरपंत घरी येतात. घरातील सर्वजण सुटकेचा निःश्वास टाकतात. दुहेरी संकटातून सर्वजण सुखरूप बाहेर पडले होते. सर्वजण संध्याकाळची आतुरतेने वाट बघत असतात, कारण शुभदाच्या तोंडून या पुस्तकाची उकल सर्वांना ऐकायची असते. यावेळी शुभदा तिच्या आई वडिलांनाही बोलावून घेते.

संध्याकाळ होते, रेखा देवासमोर दिवा लावते. घरातले गडी स्वयंपाकाच्या तयारीला लागतात. विनायक दिगंबरपंतांना घेऊन दिवाणखान्यात येतो. जानकी, रेखा, मेघना, संतोष, परशुराम, मीनल, रश्मी, स्वरा, वीणा, ऋग्वेद सर्वजण एकत्र जमतात. सर्वांचे कान आतुर असतात देव्हाऱ्यातल्या त्या वस्तुबद्दल ऐकायला. शुभदाचे आई वडीलही येतात अन तेही सर्वात जाऊन बसतात.

घरात एक पवित्र शांतता असते, वादळ शमल्यावर मागे कित्येक ओरखडे ठेऊन निसर्ग निपचित पडून असतो तशी अवस्था सर्वांची झालेली असते. मनात अनेक प्रश्न होते, अन सर्वांची उकल शुभदाच्या तोंडून मिळणार होती.

शुभदा मधोमध पुस्तकाचे दोन्ही भाग एकत्र करून ठेवते. हात जोडून नमस्कार करते आणि सांगायला सुरुवात करते.

“आता मी जे तुम्हाला सांगणार आहे, ते आजवर कधी घडलेलं नाही. आपण अश्या एका तेजाचे साक्षीदार आहोत जे तेज पिढ्यानपिढ्या या पुस्तकाच्या रूपाने आपल्याकडे आपल्याजवळ आहे. घराण्याला आज खऱ्या अर्थाने दिव्यत्व प्राप्त झालंय. समोर जे पुस्तक बघताय ना, ते पुस्तक नसून आपल्या घराण्याचा पवित्र आणि अमूल्य असा खजिना आहे. साधारण 1800 चा काळ असेल. आपल्या पूर्वजांमधील एक, दुर्गावती देवी याच शतकातल्या. इंग्रजांच्या गुलामीचा तो काळ, स्त्रियांच्या बंधनाचा काळ. त्या काळात दुर्गावती देवीने गपचूप लिहायला वाचायला शिकून घेतलं. मोडी लिपी तेव्हा अस्तित्वात होती. त्या लिपीत दुर्गावतीने तिच्या काळातल्या सर्व गोष्टी लिहून ठेवल्या.तिला जे स्वातंत्र्य मिळालं नाही ते येणाऱ्या पुढील पिढ्यातील स्त्रियांना मिळावं म्हणून घराण्यासाठी त्यांनीच नियम घालून दिलेत जे आजवर आपण तंतोतंत पाळतोय. जगदिशपंत, दुर्गावतीचे पती. त्यांच्यापासून लपून दुर्गावतीने पुस्तक लिहिले, त्या काळात जेनी नामक एका इंग्रज अधिकाऱ्याच्या बायकोशी तिची ओळख झाली. तिच्या मदतीने दुर्गावतीने BSE मध्ये आपल्याकडे असलेले सर्व पैसे गुंतवले. तिचा मुलगा पांडुरंग, समाजाच्या नियमांना झुगारून आंतरजातीय विवाह तिने लावून दिला. जगदीशपंतांनी पुस्तक जेव्हा फाडून टाकलं तेव्हा मुलगा पांडुरंग अन मैत्रीण पद्मिनी यांनी प्रत्येकी एकेक भाग जतन करून ठेवला. दुर्गावती देवींनी अशी सोय केलेली की पुस्तक योग्य व्यक्तीच्या हातातच पडेल आणि हे शेयर्स योग्य पिढीकडेच जाईल. पद्मिनी, दुर्गावतीची जवळची मैत्रीण, तिच्या मुलाचे वंशज म्हणजे नारायनकर कुटुंब.. आई बाबा, ते आपण. आई तू सांगत होतीस ना की घराण्यात दोन्ही कुटुंबात एकेकाळी आंतरजातीय विवाह झालेला म्हणून? तो विवाह पांडुरंग आणि कांताचा. आपले रुद्रशंकर गुरुजी आणि त्यांचे पूर्वज पिढीजात आपले धार्मिक कार्य बघत आले, पुस्तकाच्या दुसऱ्या भागाच्या संवर्धनासाठी पद्मिनीने त्यांना हे सुपूर्द केलं आणि दोन्ही कुटुंब एक होतील तेव्हाच हे द्यायला लावलं. कारण पुस्तकांचं सामर्थ्य आणि किंमत फक्त या दोन कुटुंबांना होती आणि ती रक्तातच असावी हा यामागचा उद्देश. हे सर्व मी थोडक्यात सांगितलं. पण पुस्तकात इतके गहन विचार आहेत की त्याचा अनुवाद सर्वांनी एकदा तरी वाचावा असं मी सर्वांना सांगेन..”

दिगंबरपंत डोळ्यात पाणी आणून म्हणतात,

“पोरी.. आजवर घराण्याला फक्त दुर्गावती देवीच्या विचारांनी तेजस्वी बनवलं होतं.. पण इतिहास आपल्या पुढच्या कित्येक पिढ्यांना साक्ष देईल..की दुर्गावती देवी नंतर अजून एक स्त्री घराण्यात होती जिने या तेजस्वीतेवर मानाचा तुरा रोवला..”

सर्वजण ऐकून अगदी भारावून गेलेले.

“शुभदा, आता हे एवढंच पुस्तक पुढच्या पिढयांकडे जाणार नाही, यासोबत तू केलेला अनुवादही जोडला जाईल.. आणि त्याचं पालन आपल्या पुढच्या पिढ्या करतील..”

“दुर्गावती देवींची बरोबरी सात जन्मात मला कधी जमणार नाही आजोबा..” शुभदा हात जोडून नम्रपणे सांगते.

सर्वजण आपापल्या खोलीत जातात. ऋग्वेद कौतुकाने आपल्या बायकोकडे बघत असतो.

“काय बघताय..”

“माझा वीक पॉईंट..”

“डाव्या गालावरची तीळ ना?? किती वेळा ऐकवशील..”

शुभदाच्या अचानक ध्यानात येतं. दिगंबरपंतांच्या हॉस्पिटल च्या गडबडीत पुस्तकाच्या शेवटच्या चार ओळी वाचायच्या राहूनच गेल्या.. ती पुन्हा पुस्तकाकडे वळते.

“माझ्या पुढील पिढ्या याचा नीट सांभाळ करतील अशी आशा करते, भाषा बदलेल..पण माझं मन सांगतंय.. कुणीतरी तेजस्वी स्त्री येऊन याचा अनुवाद करून पुन्हा पुस्तकाला जोडेल..”

शुभदा ते वाक्य ऐकून थक्क होते. अगदी तंतोतंत भाकीत दुर्गावतीने केलं होतं..

“कदाचित… मीच पुन्हा जन्माला येउन याची उकल करेन. पुनर्जन्म घेऊन..कुठल्या ना कुठल्या मार्गाने याच घराण्याची सून बनेन..एकदा आरशात बघून घेतेय स्वतःला. पुढच्या जन्मात ओळख पटावी म्हणून माझ्या या डाव्या गालावरची तीळ एक खूण म्हणून लिहून ठेवते. जन्मजात असलेली माझ्या ही डाव्या गालावरची तीळ, जगदिशपंत म्हणायचे, या तिळामुळेच तुझं सौंदर्य खुलून दिसतंय… काय माहित, उद्या कदाचित मीच जन्माला येईल या पुस्तकासाठी..”

शुभदाच्या हातून पुस्तक गळून पडतं. समोर आरसा असतो, आरशात तिच्या डाव्या गालावरची तीळ आज प्रकर्षाने चमकत असते.

समाप्त

(तुम्हा सर्वांना एक वेगळ्या धाटणीची कथा वाचायला मिळावी म्हणून या कथामालिकेचा प्रपंच. कसा होता पूर्ण कथेचा प्रवास? वाचून तुम्हाला काय वाटलं? कुठली गोष्ट सर्वात जास्त भावली?? कमेंट्स मध्ये नक्की कळवा..मी वाट पाहतेय)

अश्याच वेगळ्या धाटणीच्या कथा वाचण्यासाठी माझे पेज नक्की फॉलो करा

https://www.facebook.com/sanjanablogs

25 thoughts on “घराणं (भाग 15 अंतिम) ©संजना इंगळे”

 1. कथा खुप म्हणजे खुपच आवडली.अठराव्या शतकात पुढील पिढ्यांंचा विचार करणारी स्त्री खरचं खुप छान वाटल…मी पुढच्या भागाची अगदी आतुरतेनं वाट पहायची..शेवट तर खुपच सुरेख…

  Reply
 2. खरचं अप्रतिम लिखाण आहे तुमचं… एकेक भाग वाचतांना पुढच्या भागाची ओढ लागे…खरचं तुमच्या दुर्गावती देवींना प्रणाम…Keep it up Mam…

  Reply
 3. कथा व कथानक छान. स्त्री शिक्षणाच महत्त्व पटवून दिले आहे. एकंदरीत सर्व बाजूंनी कथा ऊत्तम.. शेवट ही सुंदर.

  Reply
 4. तुमच्या सर्व कथा मी खछप आतुरतेने वाचते.प्रत्येक कथा अगदीच वेगळ्या धाटणीची असते खूपच सुंदर कथानक आणि संदेश पण कसं सुचतं ना तुम्हाला दैवी देणगी आहे ही असंच लिहित रहा.आमच्या साठी ….Best luck

  Reply
 5. कथा खूप छान आहे, आनंदाचं अश्रू अनावर झाले मला.

  Reply
 6. खरच खूप सुंदर कथा. प्रत्येक भाग वाचल्यावर दुसऱ्या भागाची आतुरता .. आत्ता पुढे काय . कथा वाचताना आपण तिथेच आहोत की काय असं वाटतं राहन .. ही तुमच्या लिखाणाची जादू .. इतक्या सुंदर कथेबद्धल खूप आभार आणि शुभेच्छा तुम्हाला

  Reply

Leave a Comment